राज्य सरकारकडून शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ

    26-Jul-2019
Total Views |

 

 
मुंबई: महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. आता ही मदत ५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात आल्याचे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यापूर्वीही महाराष्ट्र शासनामार्फत शहीद कुटुंबियांना २ एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमीन खरेदीवर स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. हा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आला आहे.
 
 

राज्य शासनाने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी शहीद कुटुंबियांना सन्मानपूर्वक शासकीय कार्यक्रमांना बोलावण्याची पद्धत सुरु केली. ऑपरेशन विजयमध्ये पाकिस्तानला वाटले होते की, भारतीय सैनिक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. पण भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ऑपरेशन विजय यशस्वी केले. त्यामुळेच ऑपरेशन विजय हा शौर्याचा अभिलेख आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

 
 

कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांना देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘देशभरात २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिनम्हणून साजरा केला जातो. कारगिल विजयाला २० वर्ष पूर्ण होत असून आपल्या भारतासाठी आज गौरवाचा दिवस आहे. आजच्या दिवशी ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्या शहिदांचे बलिदान आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat