
मुंबई : विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. यानंतर देशामध्ये जणू पत्रयुद्धच सुरु झाले आहे. या ४९ दिग्गजांच्या पत्राला उत्तर देत देशभरातील ६१सेलिब्रिटींनी खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. झुंडबळीविरोधात ४९ दिग्गजांनी लिहिलेले पत्र हे 'सिलेक्टिव्ह आउटरेज' (निवडक बाबींमध्येच आक्रोश व्यक्त करणे) आणि 'फॉल्स नॅरेटीव्ह्ज'चा (खोटे कथन) प्रयत्न करणारे असल्याचे ६१ प्रतिभावंतांच्या खुल्या पत्रात सांगितले आहे.
पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अभिनेत्री कंगना रणौत, गीतकार प्रसून जोशी, क्लासिकल डान्सर आणि खासदार सोनल मानसिंह, वाद्य पंडित विश्वमोहन भट्ट, दिग्दर्शक मधूर भंडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे. या खुल्या पत्रात पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ४९ दिग्गजांना 'स्वयंघोषित रक्षक' असा टोलाही लगावला आहे. या ४९ दिग्गजांचा उद्देश निव्वळ राजकीय असल्याचेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात म्हटले आहे. नक्षलवादी हल्ल्यात जेव्हा आदिवासी आणि गरिब मारले जातात, तेव्हा हे सर्व गप्प असतात असेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात नमूद केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat