तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत संमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |


तृणमूल, वायएसआर, टीआरएसचे विधेयकाच्या विरोधात मतदान

 



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सातत्याने लावून धरलेला मुद्दा म्हणजेच तिहेरी तलाकविरोधी विधेयक गुरुवारी लोकसभेत संमत झाले. विधेयकाच्या बाजूने 303 तर विरोधात 82 मते पडली. तृणमूल काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस व जनता दल युनायटेड आदी पक्षांनी विधेयकाविरोधात मतदान केले तर बिजू जनता दलाने विधेयकाच्या बाजूने मतदान केले.



 

 

यावेळी लोकसभेत विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, “हे विधेयक म्हणजे राजकारण, धर्म वा समुदायाचा प्रश्न नाही.” महिलांचा सन्मान करण्यासाठी व महिलांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच सरकारने हे विधेयक आणले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रसाद यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला. विरोधक मतपेटीच्या राजकारणासाठी या विधेयकाला विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली. “1986 मध्ये शाहबानो प्रकरणात काँग्रेसने मतांचे राजकारण केले नसते तर आज संसदेत हे विधेयक आणण्याची वेळच आली नसती,” असाही टोला प्रसाद यांनी लगावला.




 

 

मी राजीव गांधी सरकारचा मंत्री नसून नरेंद्र मोदी सरकारचा मंत्री आहे. त्यामुळेच मी मुस्लीम महिलांना न्याय देण्याच्या भूमिकेबाबत ठाम आहे,” अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट करत प्रसाद यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. “जगात वीसहून अधिक मुस्लीम राष्ट्रांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी असताना धर्मनिरपेक्ष भारतात मात्र यावर बंदी का नाही?”, असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अर्थातच या विधेयकाला विरोध केला. हे विधेयक हे भारतीय घटनेच्या विरोधात असून हा कायदा आणून सरकार मुस्लीम महिलांवर अत्याचार करत असल्याची टीका ओवेसी यांनी केली.

 


पत्नीला गोळी घालण्यापेक्षा तलाक बरा!

या विधेयकाबाबत बोलताना समाजवादी पक्षाच्या ए. टी. हसन या खासदाराने संसदेबाहेर भलतेच वादग्रस्त वक्तव्य केले. “पत्नीला गोळी घालण्यापेक्षा तिला तलाक दिलेला केव्हाही बरा,” असे निर्लज्ज वक्तव्य करत हसन यांनी विधेयकाला विरोध केला. त्यांच्या या वक्तव्यावर समाजमाध्यमांतून असंख्य नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती.


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@