भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री

    25-Jul-2019
Total Views |


 
 
लंडन: कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे (हुजूर पक्ष) नेते बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार काल स्वीकारला. त्यांच्या कॅबिनेटमध्ये प्रीति पटेल यांना गृहमंत्री नियुक्त केले आहे. प्रीति पटेल या मूळ भारतीय वंशाच्या आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या बॅक बोरिसअभियानाच्या प्रमुख सदस्य होत्या. ब्रिटनच्या गृहमंत्री बनणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
 
 

ब्रिटनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसक म्हणून त्यांची ओळख आहे. मूळच्या गुजराती असलेल्या प्रीती पटेल भारतीय वंशाच्या लोकांच्या सर्व मुख्य कार्यक्रमांमध्ये अतिथी म्हणून उपस्थित असतात. त्यामुळे तेथील भारतीयांमध्ये त्या लोकप्रिय आहेत. ब्रिटनने यूरोपीय संघातून (ईयू) बाहेर पडण्याच्या बाजूने जनमत घेण्यासाठी जून २०१६ मध्ये वोट लीवमोहीम चालवली होती; त्या मोहिमेचे नेतृत्व प्रीति पटेल यांनी केले होते.

 
 

४७ वर्षीय प्रीति पटेल पहिल्यांदा विटहॅम येथून २०१० मध्ये खासदार निर्वाचित झाल्या. २०१५ आणि २०१७ मध्येही विटहॅम मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्या डेव्हिड कॅमरन सरकारमध्ये रोजगार राज्यमंत्री होत्या. त्यांचे आई-वडिल मूळचे गुजरात आहेत. ते युगांडामध्ये रहात होते आणि साठच्या दशकात इंग्लंडमध्ये आले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये प्रीती यांनी इस्राइलच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकीबाबत राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat