जंगलातला 'शिक्षक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |
 


एरवी शिक्षणापासूनही वंचित असणार्‍या वनवासींसाठी केरळच्या एका अवलियाने मात्र चक्क ग्रंथालय सुरु केले. अशा या 'जंगलातले शिक्षक' म्हणून ओळखल्या जाणार्‍या पी. व्ही. चिन्नातम्बी यांची ही प्रेरणादायी कहाणी...

 

दि. ३० जून, २०१९ मध्ये केरळच्या जंगलातील ग्रंथालयाविषयी 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केला होता. हे ग्रंथालय चालवणारे ७३ वर्षीय गृहस्थ म्हणजे पी. व्ही. चिन्नातम्बी. तेव्हा, जनमानसातील वाचनाची गोडी एकीकडे कमी होत असताना, पी. व्ही. चिन्नातम्बी यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. केरळमधील इडककी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मुथावर या वनवासी समाजाची वस्ती. या वस्तीत चिन्नातम्बी आपल्या उपजीविकेसाठी चहाचे दुकान चालवितात. या वनवासी भागातही वाचनाची आवड जोपासता यावी, म्हणून त्यांनी ग्रंथालय सुरु केले.

 

या दुर्गम भागात पट्टीमुडी या त्यांच्या गावातून जवळजवळ १८ किलोमीटर पायपीट करतच यावे लागते. या ग्रंथालयात चिन्नातम्बी आपल्या घरातून दोन गोण्यांमधून पुस्तके खास वनवासींसाठी घेऊन येतात. या ग्रंथालयातून गरीब वनवासी पुस्तके नेतात आणि वाचून पुन्हा आणून देतात. या वाचनासाठी चिन्नातम्बी वनवासींकडून एक दमडीही घेत नाहीत. पुर्णपणे मोफत असणारे ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे. ग्रंथालय सुरू करण्याची प्रेरणा मुथावर समाजासाठी कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्ते मुरली यांच्याकडून चिन्नातम्बी यांना मिळाली आहे. मुरली यांनी गरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या वनवासी समाजासाठी व शिक्षणक्षेत्रात समाजासाठी खूप काम केले आहे.

 

दररोज सकाळी चहाचे दुकान उघडल्यावर समोरच एका चादरीवर चिन्नातम्बी पुस्तकांची मांडणी करतात. त्यामध्ये केवळ रोमांचक पुस्तके नसून देशासाठी प्राणपणाने लढणार्‍या महान स्वातंत्र्यसेनानींची व्यक्तिचरित्रे आणि सामाजिक विषयांच्या पुस्तकांचाही समावेश आहे. यामुळे वनवासींना त्यातून बरीच माहिती मिळते. मुथावर समाज हा खूपच मागासलेला असून या समाजात अजूनही शिक्षणाविषयी जागृती नाही. ग्रंथालयाची व्यवस्था टिकून राहण्यासाठी चिन्नातम्बी नोंदवहीत पुस्तके नेणार्‍यांची नोंद ठेवतात. या जंगल भागात पायवाटांनी लांब भागातून दमून-भागून वनवासी पुस्तके नेण्यासाठी येतात.

 

या थकलेल्या वनवासी बंधूंना चिन्नातम्बी मोफत चहा आणि नाश्ता देतात. त्यामुळे अनेक गरीब वनवासींना पोटाला आधार मिळून त्यांची वाचनाची आवडही कायम राहते. या ग्रंथालयाच्या कमालीच्या प्रसिद्धीमुळे पत्रकार पी. साईनाथन एक दिवस आपल्या केरळ प्रेस अकादमीच्या पत्रकारितेच्या तीन विद्यार्थ्यांसह या ग्रंथालयाला भेट देण्यास गेले. पी. साईनाथन त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात की, "या जंगलात उच्च गुणवत्तेचे साहित्य वाढत आहे, जे येथील वनवासी समाजाद्वारे खूप वाचले जाते. आजच्या काळात शहरी वातावरणात वाचण्याची सवय समाप्त होत असताना येथील वाचनाचे वातावरण नक्कीच प्रेरणादायी आहे."

 

या दुर्गम आणि सुविधांअभावी असणार्‍या भागातही अशा प्रकारचे ग्रंथालय हे चिन्नातम्बीचे वाचनाविषयीचे प्रेम दर्शवते. या भागाची लोकसंख्या अडीच हजारांपेक्षाही कमी आहे. इरुप्पुलकल्लाकुडीमध्ये फक्त शंभर लोक राहतात. या लोकांसाठी शिक्षणाचा देवदूत बनून चिन्नातम्बी शिक्षणप्रसारासाठी कार्यरत आहेत. या ग्रंथालयात अनेक सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे या ग्रंथालयात अजून नवीन पुस्तके आणून ग्रंथालय मोठे बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी ते आपल्या चहाच्या व्यवसायातून पैसे गाठीशी बांधत आहेत. आपल्यासारख्या शहरी लोकांना या ग्रंथालयाचे इतके अप्रूप वाटणार नाही, मात्र येथे राहणार्‍या वनवासींसाठी बाहेरील जगाशी जोडणारी ती एक आशेची खिडकी आहे, ज्यातून ज्ञानाचा प्रकाश मिळतो.

 

अशा कठीण परिस्थितीत काम करणे चिन्नातम्बीसाठी खूप जिकिरीचे होते. अगदी चार-पाच पुस्तकांनी सुरू केलेल्या ग्रंथालयात आज जवळजवळ २०० पुस्तके आहेत. आपल्या उतारवयामुळे आणि बायकोच्या आजारपणामुळे चिन्नातम्बी अनेकवेळा पुस्तके घेऊन जात नाहीत, त्यावेळी येथील वाचकवर्ग त्यांची चातकासारखा वाट पाहत असतो. कोणतीही व्यापक साधने उपलब्ध नसताना वनवासी समाजाला सुशिक्षित करण्यासाठीचा चिन्नातम्बीचा हा खटाटोप सर्वांसाठीच आश्चर्याचा विषय आहे.

 

कोणती ऊर्जा या गरीब माणसाला इतके चांगले काम करण्याची प्रेरणा देते, याचे कोडे मात्र अद्याप कुणाला उलगडलेले नाही. या प्रकारच्या अनेक ग्रंथालयांची वंचित वनवासींना गरज आहे. चिन्नातम्बी यांच्या कामाची अनेक संस्थांनी, पत्रकारांनी दखल घेतली आहे. त्यांचे कार्य जगासमोर येण्यासाठी लेख लिहिले आहेत. अनेक संस्थांनी पुस्तकांच्या भेटी पाठवून ग्रंथालयाला अजून समृद्ध करण्यास मदत केली आहे. केरळ सरकारने त्यांच्या या कामाची दखल घेतली असून ग्रंथालयाच्या जागेवर नवीन वास्तू उभारण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, या प्रकारच्या ग्रंथालयांची मदत करण्याची तयारीसुद्धा दाखवली आहे. यामुळे चिन्नातम्बींचे काम अजून बहरणार आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होऊन हजारो वनवासींच्या आयुष्यात शिक्षणाचा दिवा प्रज्वलित केला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@