अश्वत्थाम्यास उपरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2019
Total Views |
 


अर्जुन आणि राधेय युद्धास तयार होत आहेत, हे अश्वत्थामा पाहत होता. त्याने दोघांकडे पाहिले व त्याचे हदय रणांगणावरील प्रत्येक योद्ध्यासाठी करुणेने भरून आले. अश्वत्थाम्याने दुर्योधनाचाहात आपल्या हातात घेतला व घट्ट दाबला. दु:शासनाचा आपल्या डोळ्यांसमोर भीषण वध झालेला दुर्योधनाने नुकताच पहिला होता म्हणून तो अजूनही दु:खाने हुंदके देत होता.

 

अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणाला, "दुर्योधना, एकमेकांना ठार करण्यासाठी सिद्ध झालेल्या अर्जुन व राधेय यांच्याकडे पाहा, हे युद्ध तू त्वरित थांबव! तू पांडवांशी सलोखा करून शांततेचे संबंध प्रस्थापित कर. पांडव भली माणसं आहेत. अरे, माझे पिताश्री द्रोण यांचा मृत्यू झाला. भीष्मांचा पण पाडाव झाला. आता काही काळातच हा राधेय पण मारला जाईल. तू हे युद्ध थांबव. वाटले तर मी तुझ्यावतीने अर्जुनाला विनंती करतो. माझी विनंती तो नक्की मान्य करील. मी चिरंजीव आहे, मी मारला जाऊ शकत नाही. परंतु, तरीही तू ही लढाई हरणार हे नक्की. त्या युधिष्ठिरालाही युद्ध नकोसेच आहे. भीम, नकुल, सहदेव हे आपल्या ज्येष्ठ बंधूच्या आज्ञेत आहेत. तेही मान्यता देतील. आता हा मानव संहार थांबू देत.

 

हे सर्व वैरभाव विनाशाकडे नेणारे आहेत. यातून काही निष्पन्न होणार नाही. तू जर आता माझे ऐकले नाहीस, तर माझी खात्री आहे तू आणखीन दु:खाला आमंत्रण देतो आहेस. या दु:खात बुडून जाण्यापेक्षा तू पांडवाशी सलोखा कर. मित्रत्व प्रस्थापित कर. अशी मैत्रीसारखी चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नाही. आता उशीर करू नकोस. स्वतःला वाचव आणि या सैन्यालाही! माझे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. हे तुला ठाऊक आहे. इतकं प्रेम मी कोणावरही केले नाही. तू जीवंत राहावास, सुखी राहावास, अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी हे तुला करण्यास सांगतो आहे. आज हे निकाराचे युद्ध होणार आहे. त्यात तुझा सुहृद राधेय मारला जाईल. हे दुःख तुझ्या वाट्यास येऊ नये, असं मला वाटतं. युद्धाच्या गेल्या १७ दिवसांत दोन्ही बाजूच्या सैन्यांचा किती संहार झाला, ते तू डोळ्यांनी पाहिला आहेस. माझ्या बोलण्यावर जरा तरी विचार कर. हे युद्ध थांबव, अशी मी तुला कळकळीची विनंती करतो.'

 

दुर्योधनाने त्याचे हे बोलणे ऐकले. काही काळ तो निःशब्द उभा राहिला व नंतर बोलला,'अश्वत्थामा, तू जे कथन करतो आहेस, सांगतो आहेस, ते सत्य आहे. मला ते पूर्णपणे उमजते आहे, समजते आहे. परंतु, आता त्याला खूप उशीर झाला आहे. माझ्या लाडक्या भावाला दुःशासनाला भीमाने हालहाल करून माझ्या डोळ्यांसमोर ठार केले. त्या क्षणापासून तर युद्ध आणि युद्ध हा एकच विचार माझ्या मनात घोंगावत आहे. दुसरा कोणताही विचार मनात येत नाही. आपण सर्व इतक्या दूर गेलो आहोत की, पाठी फिरणं शक्यच नाही. जे अशक्य आहे, त्याचा विचार मी कशाला करू? हा प्राक्तनाचा निर्णय आहे. हे असे घडावे, हे नियतीचे म्हणणे आहे. तसेच सारे घडत जाणार. राधेय अगदी खरं बोलतो. प्राक्तनाचा हल्ला परतवणारं, त्यापासून जीव वाचवणारं, चिलखत अजून तयार झालेले नाही. मला आता पुढेच गेले पाहिजे. मी थांबू शकत नाही आणि मागेही येऊ शकत नाही. मित्रा, तू जे माझ्यावर प्रेम केलेस त्यासाठी मी तुझा ऋणी आहे. परंतु, आता हे युद्ध थांबवणे शक्य नाही. मला क्षमा कर. अखेरचा सैनिक या रणभूमीवर असे तोवर हे युद्ध सुरूच राहील.'

 

मग दुर्योधनाने राधेयच्या भोवती त्याचे रक्षण करण्यासाठी सैन्य उभे केले. अर्जुनाच्या भोवतीसुद्धा पांडवांचे सर्व सैन्य खडे होते. भारतवर्षातील दोन महान योद्ध्यांचे युद्ध पाहण्यास सारेच उत्सुक होते. राधेय व अर्जुन यांचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले. दोघेही भाले व बाण यांचा कुशलतेने वापर करत होते. राधेयचे बाण जवळ येण्यापूर्वीच अर्जुन तो मोडून काढत होता. अर्जुनाने अचानक दिव्यास्त्रे वापरण्यास आरंभ केला. अर्जुनाने ‘आग्नेयास्त्र’ सोडले व त्याचे खंडन करण्यासाठी राधेयने ‘पर्जन्यास्त्र’ सोडले. आकाश काळ्या मेघांनी व्यापून गेले. अर्जुनाने निर्माण केलेला अग्नी राधेयने आपल्या अस्त्राने विझवून टाकला. आता अर्जुनाने ‘इंद्रास्त्र’ सोडले. त्यातून कौरव सैन्यावर बाणांचा पाऊस पडू लागला.

 

राधेय खूप संतापला. त्याने एक बाण हाती घेऊन ‘भार्गवअस्त्रा’चा मंत्र सुरू केला. हे अस्त्र महाभयंकर होते. त्याचे गुरू भार्गव यांनी त्याला हे दिले होते. अर्जुनाचे सारे बाण त्या अस्त्राने नाहीसे केले. हा पराक्रम पाहून सगळेत थक्क झाले. परंतु, या दोन्ही परस्पर विरोधी अस्त्रांनी दोन्ही बाजूच्या सैन्याचे अतोनात नुकसान झाले. ‘भार्गवअस्त्र’ जास्त प्रभावी होत. त्यामुळे पांडव सैन्याची अपरिमित जीवहानी झाली. कौरव त्यामुळे खूश झाले. भीम रागावला. तो म्हणाला, 'अर्जुना, राधेयच्या बाणांनी तुला जखडून टाकले आहे व तुझी ही असाहाय्य परिस्थिती पाहून तुला सर्वजण हसत आहेत. तू काहीच कसे करत नाहीस. तुला जमत नसेल, तर मला सांग. मी माझ्या गदेच्या एका प्रहारात या राधेयला ठार मारीन.' त्याचे हे वक्तव्य ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, 'अर्जुना, भीम म्हणतो हे खरं आहे. असे वाटतेच की, या राधेयच्या बाणांमधून आपली सुटका होणारच नाही. अर्जुना, तू का माघार घेतो आहेस?'

 

'अर्जुना तू हवं तर ‘ब्रह्मास्त्र’ सोड. या राधेयच्या दंभ मोडून काढ! तू त्याचा वध केलाच पाहिजे. तू कोण आहेस? तुझा या पृथ्वीवर कशासाठी जन्म झाला आहे याचे भान ठेव. तुझा निद्रिस्त आत्मा जागा कर आणि त्वरित योग्य ती कारवाई कर!' अर्जुनाने ‘ब्रह्मास्त्रा’ला आवाहन केले. बाणांनी चारही दिशा दाटून गेल्या. त्या बाणांनी अर्जुनाने राधेयचा रथ वेढून टाकला. काही क्षण राधेय दिसेनासा झाला. सर्वांना वाटले राधेय मारला गेला. कौरवांनी शोकाने आक्रोश करण्यास सुरुवात केली. परंतु, राधेय अगदी सहजपणे या बाणांच्या वेढ्यातून बाहेर आला. दोन्ही योद्धे एकमेकास तुल्यबळ होते. हे युद्ध बघण्यास देवांनीही आकाशात गर्दी केली. आपापल्या मुलाची बाजू घेऊन इंद्र आणि सूर्यच जणू एकमेकांशी लढत होते. राधेय व अर्जुन यांच्या धनुष्याच्या टणत्काराशिवाय अन्य कोणताही आवाज युद्धभूमीवर येत नव्हता. राधेयच्या तीक्ष्ण बाणांनी भीमसुद्धा जखमी झाला होता.

 

अर्जुनाच्या धनुष्याचा दोर राधेयने कापून टाकला. क्षणाचाही वेळ न दवडता अर्जुनाने पुन्हा नवीन दोर बांधला. राधेयने तोही कापला. असे ११ वेळा झाले. अर्जुन इतक्या सफाईने व कमी वेळात दोर बांधत असे की, राधेयला मनोमनी त्याचे कौतुकच वाटत होते. त्याला आपल्या धाकट्या भावाचा अभिमान वाटत होता. अर्जुनाने पुन्हा राधेयला बाणांनी वेढून टाकले. मग राधेय संतापला. त्याने पाच सर्पाकृती बाण कृष्णावरती सोडले. ते पाहून अर्जुन संतापला. दोघेही प्राणांची पर्वा न करता क्रोधाने लढत होते. (क्रमश:)

 
- सुरेश कुळकर्णी  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@