महाराष्ट्राचा 'क्रॉकोडाईल मॅन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2019   
Total Views |




जगविख्यात 'क्रॉकोडाईल हंटर' स्टीव इरविनला आपण सगळेच ओळखतो. आज जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या मातीमधील मराठमोळा 'क्रॉकोडाईल मॅन' रामदास खोत यांच्याविषयी...

 

 मुंबई ( अक्षय मांडवकर) : आपल्या सभोवतालची काही 'माणसं' जगावेगळं काम करत असतात. परंतु, केवळ प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून ती दूर असल्याने अशी माणसं आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. अशीच एक व्यक्ती म्हणजे 'क्रॉकोडाईल मॅन' वनरक्षक रामदास खोत. कोल्हापूरच्या लाल मातीत जन्मलेला हा पैलवान गडी. सध्या वन विभागाच्या चिपळूण परिक्षेत्रात वनरक्षकपदावर कार्यरत आहे. मानवी वस्तीत शिरणार्‍या मगरींना अत्यंत चपळाईने पकडून त्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यामध्ये त्यांचा हातखंडा. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केवळ अनुभवाच्या बळावर त्यांनी मगरींना हाताळण्याची कला अवगत केली. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये त्यांनी मानवी वस्तीत शिरकाव केलेल्या अशा २५ हून अधिक अजस्त्र मगरींची सुटका केली आहे.

 
 

 
 
 

कुस्तीपटूंच्या आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या चांदेकरवाडीतील रामदास खोत यांचा ४ एप्रिल, १९८७ चा जन्म. लाल मातीमध्येच जन्माला आल्याने त्यांच्यावर लहानपणापासून कुस्तीचे संस्कार झाले. त्यामुळे तेथील मातीत हा पठ्ठ्या चांगलाच रमला. कुस्तीचे अनेक आखाडे या मर्दाने गाजवले. राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु, त्यांच्या मनाच्या एका कोपर्‍यात कुठेतरी निसर्गाची आवड रुजत होती. त्याला कारणीभूत होते राधानगरीचे अभयारण्य. खोत आपल्या मित्रांसमवेत राधानगरीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये ट्रेकिंगला जात. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे त्यांनी वन विभागात दाखल होण्याचे निश्चित केले. विभागाच्या २००६ मधील भरती प्रक्रियेमध्ये त्यांची 'क्रीडा' कोट्यामधून निवड झाली आणि कोकण पट्ट्यात ते 'वनरक्षक' म्हणून रुजू झाले. त्यांना चिपळूणमधील मानवी वसाहतींमध्ये सुरू असलेला मगरींचा वावर निदर्शनास आला.

 
 
 

पावसाळ्यात वाशिष्ठी नदीत वाढणार्‍या पाण्याच्या पातळीमुळे या मगरी मानवी वस्तीत किंवा शहरातील छोट्या तळ्यांमध्ये शिरकाव करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. अशा वेळी खोत यांनी मगरींना वाचविण्याचे काम हाती घेतले. चिपळूणच्या मिरजोळी येथे सर्वप्रथम मगर पकडल्याची आठवण खोत सांगतात. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला १० फुटाची अजस्त्र मगर स्थानिकांना आढळून आली. वन विभागाला याची माहिती मिळताच खोत त्याठिकाणी दाखल झाले. ती मगर पूर्ण वाढीची असल्याने हिंस्र आणि चपळाईने हल्ला करण्यात तरबेज होती. शिवाय मगरींना पकडण्याचा अनुभवही खोत यांच्या गाठीशी नसल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडथळे येत होते. मात्र, त्यांनी मोठ्या कष्टाने सहकार्‍यांच्या मदतीने मगरीला पकडले. चिपळूण आणि आसपासच्या परिसरात मगरींचा वावर हा छोट्या तळ्यांपासून अगदी विहिरींपर्यंत आढळतो. खोत यांनी खांदट पाली येथील एका पडक्या विहिरीत आढळलेल्या मगरीची सुटका केली होती. दीड-दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना ही मगर विहिरीबाहेर काढण्यात यश मिळाले होते.

 
 

अशा घटनांमधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे खोत यांनी मगरींना पकडण्याचे तंत्र अंगीभूत करून घेतले. यादरम्यान अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागले. बहुतांश वेळा वन्यजीव बचाव कार्यात निर्माण होणारा अडथळा म्हणजे बघ्यांची गर्दी. मगर बचावाच्या कार्यादरम्यानही अनेक वेळा हाताबाहेर जाणार्‍या बघ्यांच्या गर्दीचा सामना खोत आणि सहकार्‍यांना करावा लागलाकाही वेळा मगरीला दुचाकीवर ठेवून त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रसंगही त्यांच्यावर ओढावला. काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील खडपोलीत एका ग्रामस्थाच्या घरासमोर मगर ठाण मांडून बसली होती. वाशिष्ठी नदीमधील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगरीने घराच्या आवारात आसरा घेतला होता. अशा वेळी चपळाईने व सुरक्षितरीत्या खोत यांनी इतर सहकार्‍यांच्या समवेत मगरीला ताब्यात घेऊन तिला नैसर्गिक अधिवासात सोडले. मगरीला पकडण्याचे काम जोखमीचे असल्याने खोत यांनी पुढाकार घेतं विभागाच्या मदतीने प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. 

 

 
 
 

या कार्यपद्धतीत मगरींना कसे पकडावे, तिची वाहतूक कशी करावी यासंदर्भातील नियम आणि तिचा अधिवास, सवयी यांबाबत माहिती देण्यात आली आहे. मगरीला पकडल्यानंतर बर्‍याचदा तिला गाडीमध्ये ठेवून सुरक्षितस्थळी हलवावे लागते. त्यामुळे खोत यांनी मगरींना ठेवण्यासाठी एक मोठा लोखंडी पिंजरा तयार केला. त्याची रचना कशी असावी याबद्दल अभ्यास करून त्यांनी पिंजरा बनवून घेतला. वन विभागाच्या मदतीने खोत करत असलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. महत्त्वाचे म्हणजे आजवर केलेल्या बचावकार्यात एकदाही मगरीने त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. त्यांच्या बचावकार्याचे हे कौशल्य आहे. त्यांच्या कार्याला दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा !

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@