जनताजनार्दनाच्या मनातील प्रतिमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019   
Total Views |



प्रदेश कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकले आणि वाचल्यानंतर या भाषणावरदेखील लेख लिहावा असे वाटले. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची स्तुती केली पाहिजे, वगैरे वगैरे लेख लिहिण्याचा हेतू नाही. महाराष्ट्राच्या एका यशस्वी राजनेत्याचे भाषण म्हणून या भाषणाकडे पाहावे लागते.

 

मुंबईतील गोरेगाव येथे भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक झाली. राज्यात आणि केंद्रात भाजपच सत्तेत असल्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी या बैठकीला भरपूर प्रसिद्धी दिली. दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवरून प्रमुख नेत्यांची भाषणे जनतेपर्यंत पोहोचली. राजकीय पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा म्हणजे राजकीय उत्सवच असतो. उत्सव म्हटला की उत्साह खूप, हे ठरलेले आहे. ज्या ज्या देशात लोकशाही आहे, राजकीय पक्ष आहेत, त्या त्या देशात पक्षांचे मेळावे असेच उत्सवांसारखे होत असतात. लोकशाही पद्धतीचा तो एक अपरिहार्य भाग आहे.

 

अपेक्षेप्रमाणे या मेळाव्याचे खरे नायक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ठरले. महाराष्ट्र विधानसभेच्या अखेरच्या सत्रात 'मी पुन्हा येईन...' हे त्यांचे भाषण गाजले. या भाषणावर एक लेख लिहावा असे मलादेखील वाटले आणि तो मी लिहिला. प्रदेश कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकले आणि वाचल्यानंतर या भाषणावरदेखील लेख लिहावा असे वाटले. ते मुख्यमंत्री आहेत, त्यांची स्तुती केली पाहिजे, वगैरे वगैरे लेख लिहिण्याचा हेतू नाही. महाराष्ट्राच्या एका यशस्वी राजनेत्याचे भाषण म्हणून या भाषणाकडे पाहावे लागते.

 

हे भाषण ऐकत आणि वाचत असताना माझ्या डोळ्यापुढे महाराष्ट्रातील समकालीन अनेक राजनेते आले. पगडी आणि पागोट्यावर ताशेरे ओढणारे शरद पवार आले, "धरणात पाणी नाही, तर मी त्यात मुतू काय?" असे उद्दामपणे म्हणणारे अजित पवार आले, कोट्यवधी रुपयांचा 'मफलर' गळ्यात घालणारे छगन भुजबळ दिसू लागले, 'आदर्श'चे अशोकराव चव्हाण दिसू लागले आणि बडी बेगमसाहेबांना पुष्पगुच्छ देणारे राज ठाकरे दिसू लागले. या मालिकेत देवेंद्र फडणवीस कुठेच दिसत नाहीत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अखिल भारतीय नेतृत्व त्यांना मान्य आहे, पण ते मोदींचे हुजरे नाहीत. मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून ते आपली जात विसरले आहेत, त्यामुळे त्यांना 'पगडीची जात' दिसत नाही आणि 'पागोट्याची जात' दिसत नाही. लाखो-कोट्यवधी रुपयांचा महाराष्ट्राचा व्यवहार करताना नागपुरात त्यांनी आलिशान बंगला बांधल्याचे ऐकिवात नाही. मुंबईत पॉश लोकॅलिटीत हजारो चौरस फुटांचे फ्लॅट घेतल्याचे नाव कुठे आले नाही. कपड्यावर डाग नाही, चेहर्‍यावर डाग नाही, असा बेडाग मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्यच.

 

मुख्यमंत्र्यांविषयी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "मुख्यमंत्र्यांकडे दैवीशक्ती आहे." "होय, दादा, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. माझे दैवत समोर बसले आहे. महाराष्ट्रातल्या नागरिकांची दैवीशक्ती माझ्याकडे आहे. मला गमावण्यासारखे काही नाही. मला महाराष्ट्राकरिता कमवायचे आहे. ज्याला गमवण्यासारखे काही नसते, त्याला समाजाकरिता काही करायचे असते." मुख्यमंत्र्यांकडे दैवीशक्ती आहे. ही दैवीशक्ती कोणती आहे? मुख्यमंत्री संघस्वयंसेवक आहेत. संघाच्या कामाची मांडणी करताना डॉ. हेडगेवार म्हणत, "संघकार्य ईश्वरी कार्य आहे." संघस्वयंसेवक ज्या क्षेत्रात जातो, तेथे ईश्वरी कार्य घेऊन जातो. ईश्वराचे काम म्हणजे धर्म, न्याय, नीती यांचे काम आणि जेथे धर्म असतो तेथे विजय ठरलेला असतो. धर्म सांगून उपयोगाचा नसतो, तो जगून दाखवायचा असतो.

 

राजनीतीचा धर्म लोकनीतीचा आहे, लोककल्याणाचा आहे. यामध्ये आपल्या संस्था, आपले धंदे, आपले कारखाने कसे पुढे न्यायचे, याचा विचार करायचा नसतो. असा विचार हा स्वकल्याणाचा विचार असतो. लोककल्याणाच्या विचारात सर्वांचे भले होईल असे काम करावे लागते. असे काम त्यांनी करून दाखविले. म्हणून ते आत्मविश्वासाने म्हणू शकले, "मराठा, धनगर, आदिवासी, विविध अनुसूचित जाती अशा सर्व समाजघटकांचे प्रश्न आपण सोडवले आहेत. आपल्याला बोलायची गरज नाही, आपले काम बोलते आहे. त्यामुळे सगळे काही नीट होईल."

 

ज्याला 'जनी जनार्दन वसे' हे उमगले आहे, तो जनताजनार्दनाची सेवा करू लागतो. जनताजनार्दन सेवेकर्‍याला कधीही रिक्त हाताने परत पाठवत नाही. त्याची निरपेक्ष सेवा पाहून तो प्रसन्न होतो आणि त्याच्या झोळीत भरपूर टाकतो. लोकसभा निवडणुकीत जनताजनार्दनाने दोन्ही हातांनी भरभरून दान केले आणि भाजप-शिवसेनेचे बहुतेक सर्व उमेदवार निवडून आणले. जनतेतील जनार्दनाला साद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, "आपली लढाई ही आधीच पराभूत झालेल्या पक्षांशी आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पराभूत झाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच पराभूत झाले, ते घाबरून निवडणूक लढलेच नाहीत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष पराभूत झाले. अशा पराभूत लोकांसमोर आपण लढतो आहोत, त्यामुळे महाविजय आपलाच आहे."

 

मुख्यमंत्र्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील. निवडणुकीत उतरणारा कोणताही नेता 'मी विजयी होणार आहे,' असेच म्हणत असतो. खेळातील दोन प्रतिस्पर्धी खेळाडू विजयासाठीच खेळत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विजयाचा विश्वास हा खरोखरच विजयाचा विश्वास आहे की त्या प्रसंगी असे बोलायचे असते म्हणून बोललेले वाक्य आहे? पण, हे कार्यक्रमासाठी बोललेले वाक्य नाही. याचे कारण असे की, हे वाक्य बोलत असताना त्यामागे ठाम आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वास, आपण केलेल्या कामाच्या परिणामावर असावा लागतो. निवडणुका एकट्याला जिंकता येत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांचे बळ असावे लागते. कार्यकर्त्याला कामाची प्रेरणा लागते. प्रेरणा पैशांतून निर्माण होत नाही. पैशातून हमाल निर्माण होतात. प्रेरणा निर्माण होण्यासाठी नेतृत्व तसे असावे लागते. कार्यकर्त्याला जपणारे, त्याला जवळ करणारे आणि त्याच्यासाठी केव्हाही वेळ देणारे, पाठीवर हात ठेवून 'ऊठ, लढ' म्हणणारे नेतृत्व असावे लागते.

 

देवेंद्र फडणवीस यांना या बाबतीत शंभरपैकी शंभर गुण द्यायला पाहिजेत. "गेल्या पाच वर्षांत काही न मिळता, कोणतीही अपेक्षा न करता ज्या कार्यकर्त्यांनी काम केले, त्यांना त्रिवार वंदन. मला तर खुर्ची, मानमरातब, हार-फुले मिळाली. पण, असंख्य कार्यकर्ते असे आहेत, ज्यांना एक हार किंवा फूलही मिळाले नाही, त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो." राजकीय पक्ष ही दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती असते. तिच्यात सातत्य असते. कालची पिढी भरपूर काम करून जाते. आजची पिढी काम करीत राहते. उद्याची पिढी तिची जागा घेणार असते. म्हणून ज्या शिडीने वर आलो, त्या शिडीला कुणी ठोकर मारत नाहीत. देवेंद्रजींनीं भावुकपणे मागच्या पिढीचे स्मरण केले. "आज प्रमोदजी आणि गोपीनाथजी यांची आठवण येते. ते गेले, तेव्हा आता हा पक्ष चालवायचा कसा, असा प्रश्न पडला होता. पण, ते गेल्यानंतर पक्षाला मिळालेले यश पाहण्याकरिता प्रमोदजी, गोपीनाथजी असते, तर अधिक आनंद झाला असता." याला म्हणतात संस्कार. नाहीतर 'कोण यशवंतराव? कोण वसंतराव? कोण शंकरराव? मीच एकमेव नेता आहे, पार्टी माझ्यामुळे आहे, माझाच जयजयकार करा.'

 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? म्हणजे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मे महिन्यापूर्वी पंतप्रधानपदाच्या मुंडावळ्या बांधून राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती बसले होते. तेव्हा मला पंचतंत्रातील घुबडाच्या राज्याभिषेकाची गोष्ट आठवली. प्राण्यांना सिंह राजा आहे. माणसांना माणूस राजा आहे. देवांना इंद्र राजा आहे. माशांना देवमासा राजा आहे. पक्ष्यांनाच राजा का नाही? असा प्रश्न पक्ष्यांसमोर निर्माण झाला. त्यांनी सभा बोलविली. कुणाला राजा करायचे यावर चर्चा झाली आणि घुबडाला राजा करायचे ठरले. कुणाचे काही म्हणणे आहे का, असे विचारले. तेव्हा एक कावळा म्हणाला, "घुबडाला राजा करू नये. त्याचे तोंड फार अशुभ मानले जाते, ते विद्रुप आहे आणि त्यात याला दिवसा दिसत नाही, असला राजा काय करायचा?"

 

घुबड आपल्या ढोलीत थाटात राज्यभिषेकाची वाट बघत बसला होता. कावळ्याचे म्हणणे ऐकून सर्व पक्षी आपल्या घरी गेले. पक्ष्यांनी आपल्या विरुद्ध मतदान केले आणि आपल्याला घरी बसविले, याचा घुबडाला खूप राग आला. आणि असे म्हणतात की तो हा राग कावळ्यावर काढीत असतोमहाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय जनताजनार्दनानेच करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांची आजची स्थिती, संस्कृत सुभाषिताचा आधार घेऊन सांगायची तर, सिंह हा जंगलाचा राजा असतो. कारण त्याचे सामर्थ्य इतके प्रचंड असते की सर्व प्राणिमात्र त्याला आपणहून राजेपण देतात. राजेपणाची भीक त्याला मागत फिरावी लागत नाही. 'मी मुख्यमंत्री होणार,' 'मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल' अशा वल्गना ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याला कराव्या लागत नाहीत. त्याचे 'सिंह'पण स्वयंसिद्ध असते. ज्याची प्रतिमा जनताजनार्दनाच्या अंतकिरणात विराजमान झाली आहे, तो महाराष्ट्राचा स्वयंभू मुख्यमंत्री असेल. आपण सर्व जनताजनार्दनाचे अंग असल्यामुळे आपल्या- म्हणजे जनताजनार्दनाच्या मनात कुणाची प्रतिमा आहे, हे सांगायलाच पाहिजे का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@