संशोधनात भारताचे 'गगनदीप' यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2019
Total Views |




तोंडावाटे दिल्या जाणार्‍या 'रोटाव्हायरस' लसीच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांच्या 'एफआरसी' यादीत भारताचे नाव उंचावणार्‍या पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरलेल्या डॉ. गगनदीप कांग यांच्याविषयी...

 

गहन संशोधन आणि शास्त्रीय चिकित्सा हे कुठल्याही वैज्ञानिकामधील दोन महत्त्वाचे गुण. मग विषय कोणताही असो, शास्त्रज्ञांचे यशस्वी प्रयोग पुढे संपूर्ण मानवजातीला उपकारक ठरतात. मग तो विजेचा शोध असो वा पोलिओ लसीचा, अशा सर्व प्रकारच्या शोधांनी मानवी जीवनमान उंचावण्यात मोलाची भर घातली. भारतालाही पुराणकाळापासून अशाच शास्त्रज्ञांची एक संपन्न परंपरा लाभली आहे. शून्यापासून ते अगदी हल्लीच्या रोबोपर्यंत भारतीय शास्त्रज्ञांची कामगिरी ही वाखाणण्याजोगीच. भारतीय शास्त्रज्ञांच्या या मानाच्या परंपरेत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

 

कारण, लंडन येथे प्रतिष्ठीत वैज्ञानिकांच्या 'फेलो रॉयल सोसायटी'च्या (एफआरसी) यादीत एका भारतीय महिला शास्त्रज्ञाची झालेली निवड. डॉ. गगनदीप कांग यांची नुकतीच प्रतिष्ठीत शास्त्रज्ञांच्या 'एफआरसी' यादीत निवड झाली. ही बाब निश्चितच समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद म्हणावी लागेल. डॉ. गगनदीप कांग यांनी 'रोटाव्हायरस'च्या विषाणूंमुळे होणार्‍या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष लस तयार केली. या लसीमुळे 'रोटाव्हायरस'पीडित नागरिकांना जीवदान मिळत असून जगभरातील अनेक देशांत त्याचा वापर केला जात आहे. ही लस तयार करण्यासाठी त्यांनी केलेल्या जगावेगळ्या संशोधनाची दखल 'एफआरसी'ने घेत त्यांचा प्रतिष्ठीत वैज्ञानिकांच्या यादीत समावेश केला.

 

लंडनमधील 'रॉयल सोसायटी' या विज्ञान क्षेत्रातील नामवंत संस्थेची स्थापना १६६० साली झाली. यात जगभरातील वैज्ञानिकांचा समावेश आहे. मात्र, यात एकाही महिलेला स्थान नव्हते. महिलांना या यादीत स्थान मिळविण्यासाठी तब्बल २८५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. १९४५ सालापर्यंत एकाही महिलेला या संस्थेच्या यादीत समावेश झाला नव्हता. त्यानंतरच्या काळात १३३ महिलांना तो मान मिळाला, पण तरी त्यात अद्याप एकाही भारतीय महिलेचा समावेश नव्हता. यंदा तब्बल ३५९ वर्षांनंतर तो मान वैद्यक क्षेत्रातील संशोधक असलेल्या डॉ. गगनदीप कांग यांना मिळाला आहे.

 

डॉ. गगनदीप या मूळच्या हरियाणातील फरिदाबादच्या. ३ नोव्हेंबर, १९६२ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते, तर आई शिक्षिका होती. आई आणि वडिलांच्या नोकरीत होणार्‍या वारंवार बदलीमुळे भारतातील वेगवेगळ्या शहरांत त्यांचे शिक्षण झाले. त्या लहानपणापासूनच हुशार. त्यामुळे संशोधन क्षेत्रातच करिअर करण्याचे त्यांचे ध्येय. विज्ञान शाखेतून महाविद्यालयीन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेल्लोर येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयामधून एमबीबीएसची पदवी मिळवली. डॉक्टर झाल्यानंतरही त्यांनी आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होऊन सूक्ष्मजीवशास्त्रात आपली पीएच.डीही पूर्ण केली. पीएच.डीची पदवी संपादित केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली.

 

कौटुंबिक जबाबदार्‍या आणि संशोधनाचा एकत्र समतोल साधणे ही फार कठीण जबाबदारी. पण, जर कामांच्या वेळात आपण लवचिकता ठेवली, तर कोणत्याही क्षेत्रात यश गाठता येते, या मताच्या असणार्‍या डॉ. गगनदीप कांग यांनी संशोधन क्षेत्रातील हीच अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. यामुळेच आज जगभरात त्यांचे नाव शास्त्रज्ञांच्या यादीत जोडले गेले. डॉ. गगनदीप कांग यांनी 'रोटाव्हायरस' विषाणूंमुळे पीडित नागरिकांसाठी संजीवनी ठरणारी लस तयार केली. भारतात 'रोटाव्हायरस'मुळे दरवर्षी मृत पावणार्‍यांची संख्या जवळपास एक लाखांच्या घरात आहे. 'रोटाव्हायरस'मुळे पीडित असणार्‍यांना तोंडावाटे देता येईल, अशी लस त्यांनी संशोधनातून तयार केली.

 

भारतातील मुलांमध्ये होणार्‍या पोटातील संसर्गावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे ठरले. आतड्यातील संसर्ग हा मेंदूवरही परिणाम करीत असतो, त्यातून अनेक वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे मानवी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर संशोधन करत त्यांनी लस तयार केली. ही लस अनेकांसाठी संजीवनी ठरत असून त्यांच्या या संशोधनाची दखल 'एफआरसी'ने घेतली. डॉ. गगनदीप कांग यांनी आत्तापर्यंत जवळपास ३०० शोधनिबंध लिहिले आहेत. याआधी कांग यांना 'वुमन बायोसायन्टिस्ट ऑफ दी इयर' (२००६) पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट लंडन'चे सदस्यत्व त्यांना मिळाले आहे.

 

'इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस' आणि 'इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी' या संस्थांचेही सदस्यत्व त्यांना मिळाले आहे. 'रोटाव्हायरस' लस उत्पादकांसाठी त्यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून केवळ भारतच नव्हे, तर सातासमुद्रांपलीकडील देशांत त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. दै. 'मुंबई तरुण भारत' परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.

 
 
- रामचंद्र नाईक  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@