नृशंस हत्याकांडाचे राजकीय भांडवल कशाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019   
Total Views |



उत्तर प्रदेश सरकारने विविध पावले उचलली असताना, या दुर्दैवी घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांकडून सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव आलेल्या विरोधी पक्षांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी काहीतरी निमित्त हवेच असते. पण, अशा नृशंस हत्याकांडाचे निमित्त करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे, त्याला काय म्हणायचे?

  

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील उम्भा गावामध्ये जमिनीच्या वादातून गोंड जमातीच्या दहा जणांची हत्या करण्याची जी अमानुष घटना घडली, त्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. उम्भामध्ये घडलेल्या या घटनेत अन्य २८ लोक जखमी झाले. या अमानुष घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही. पण, या घटनेचे राजकीय भांडवल करण्याची जी खेळी खेळली जात आहे, ती नक्कीच निषेधार्ह म्हणावी लागेल.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेस कारणीभूत असणार्‍यांवर कारवाई करण्यास प्रारंभही केला आहे. ज्या भागामध्ये ही घटना घडली, तेथील भूमाफियाविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल. तसेच अतिरिक्त मुख्य महसूल सचिवांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती स्थापण्यात आली असल्याचे आणि ही समिती पुढील दहा दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. १९५५ पासून १९८९ पर्यंतच्या काळात ज्या चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या, त्या या हत्याकांडाच्या मुळाशी असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

 

उम्भा या गावात घडलेल्या हत्याकांडानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या रविवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यानंतर सोनभद्र जिल्ह्याच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत, या हत्याकांडाची पाळेमुळे अनेक वर्षांपासून रुजली असून त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ग्रामसभेची नापीक असलेली जमीन काँग्रेस पक्षाशी संबंधित नेत्याच्या ट्रस्टच्या नावाने हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा १८८९ मध्ये काँग्रेसचीच राजवट असताना ही जमीन त्या ट्रस्टवरील नातलगांच्या नावाने करण्यात आली. काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत जी पापकर्मे केली, ती या घटनेच्या मुळाशी आहेत. असे असताना या घटनेवरून काँग्रेसची नेतेमंडळी आज नक्राश्रू ढाळत आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

 

तसेच, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी यज्ञदत्त हा समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत सत्तेचा कसा गैरवापर होत होता, त्याचा अनुभव जनतेने घेतला आहे. या हत्याकांडात सहभागी झालेल्यांना आपले हेतू साध्य करणे शक्य न झाल्याने अखेर त्यांनी हे ‘गोलीकांड’ घडवून आणले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उम्भा हत्याकांडप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने अनेकांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी वापरलेल्या बंदुका आणि ट्रॅक्टर जप्त केले आहेत. काही अधिकार्‍यांना निलंबित केले आहे. "या हत्याकांडास जबाबदार असलेल्या कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही," असे सरकारने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने विविध पावले उचलली असताना, या दुर्दैवी घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांकडून सुरू असल्याचे दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव आलेल्या विरोधी पक्षांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी काहीतरी निमित्त हवेच असते. पण, अशा नृशंस हत्याकांडाचे निमित्त करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे, त्याला काय म्हणायचे? लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या आणि ज्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सोपविण्यात आली होती, त्या प्रियांका गांधी यांना या घटनेचे निमित्त करून उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारची बदनामी करण्याची आणि काँग्रेस पक्षाचे घोडे पुढे दामटण्याची आयती संधी चालून आली असल्याचे वाटले. उम्भा गावास भेट देऊन तेथील पीडित व्यक्तींची भेट घेण्यास त्या निघाल्या. पण, या सर्वामागे तेथील पीडितांबद्दल वाटणारा कळवळा किती होता आणि राजकारण किती होते, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.

 

उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांना तेथे जाण्यास प्रतिबंध केल्याने प्रियांका गांधी यांनी वाटेतच ठाण मांडून सगळ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. माध्यमांतील काँग्रेसधार्जिण्या प्रतिनिधींना या घटनेवरून एकदम इंदिरा गांधी यांनी १९७७ साली बेलछीला भेट देण्यासाठी जो मार्ग हाताळला होता, त्याची आठवण झाली! प्रियांका गांधी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी करण्याचा मोह माध्यमांना आवरता आला नाही. एखाद्या घटनेचे भांडवल करून काँग्रेस पक्ष आपल्या नेत्यांची नसलेली उंची वाढविण्याचा कसा प्रयत्न करीत आहे, ते या निमित्ताने दिसून आले!

 

उत्तर प्रदेशमधील घटनेच्या निमित्ताने भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची संधी चालून आल्याचे लक्षात घेऊन प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही उम्भा गावाकडे धाव घेण्याचे ठरविले. पण, उत्तर प्रदेश सरकारने त्यांचे मनोरथ यशस्वी होऊ दिले नाही. ममता बॅनर्जी यांना आपल्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था नीट सांभाळता येत नाही. त्या राज्यात विरोधकांच्या हत्या होत आहेत. सत्ताधारी नेत्यांचे हात भ्रष्टाचारात लडबडले आहेत. असे असताना ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने उत्तर प्रदेशातील घटनेत नाक खुपसण्याचा केलेला प्रकार म्हणजे आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होता, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. उम्भा येथील घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या रविवारी त्या गावास भेट दिली. पीडितांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा दिला. पण, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना त्यावरून मुख्यमंत्र्यांवर उपहासात्मक टीका करण्याची उपरती झाली, याला काय म्हणायचे?

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेस जबाबदार असलेल्यांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेच्या मुळाशी एक मोठे ‘राजकीय षड्यंत्र’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्य विधानसभेत बोलताना, "या घटनेस जबाबदार असलेली कोणीही व्यक्ती, कितीही मोठी असली तरी तिच्याविरुद्ध कारवाई केली जाईल आणि पीडितांना न्याय मिळवून दिला जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. "१७ जुलैच्या घटनेचा पाया १९५५ मध्येच खोदला गेला होता," असे ते म्हणाले. त्यावेळच्या तहसीलदाराने ग्रामसभेची जमीन बेकायदेशीरपणे आदर्श सहकारी संस्थेकडे हस्तांतरित केली होती. १९८९ मध्ये ही जमीन त्या संस्थेकडून काही व्यक्तींच्या नावे हस्तांतरित करण्यात आली. या दोन्ही वेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्या सरकारकडून, प्रशासनाच्या संगनमताने एका मोठ्या समुदायाचा हक्क चुकीच्या मार्गाने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला (‘एक बडे समुदाय के हक को हडपने का कार्य किया गया’), असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

 

उम्भा गावात ज्या जमिनीवरून हे हत्याकांड घडले, ती जमीन गेली कित्येक वर्षे तेथील आदिवासी गोंड समाजाकडून कसली जात होती. त्यांना तेथून हुसकावून लावण्याच्या हेतूने भूमाफियांनी जे अमानुष हत्याकांड घडविले, त्याची उत्तर प्रदेश सरकारकडून सखोल चौकशी केली जात आहे. त्यानंतर त्यामागील सत्य काय ते जनतेपुढे येईलच. पण, या घटनेच्या निमित्ताने राजकीय पक्ष विशेषत: काँग्रेस पक्ष या घटनेचे भांडवल करण्याचा कसा प्रयत्न करीत आहे, याचे दर्शन देशवासीयांना झाले असे म्हणता येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@