भारताने संरक्षण दिलेल्या 'जायन्ट गिटारफिश'चे अस्तित्व धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019   
Total Views |


 


'आययूसीएन'च्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत राज्यातील सहा मत्स्यप्रजातींचा समावेश


मुंबई (अक्षय मांडवकर) : जगातील सर्वात संकटग्रस्त मत्स्यप्रजातींमध्ये महाराष्ट्राच्या सागरी परिसंस्थेत आढळणाऱ्या 'ऱ्हायनो रे' गटातील सहा 'गिटारफिश / वेजफिश'चा समावेश झाला आहे. 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर' (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेने ही बाब जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत संरक्षित असलेल्या 'जायन्ट गिटारफिश' या माशाची नोंद 'असुरक्षित' (व्हल्नरेबल) श्रेणीमधून 'संकटग्रस्त' (क्रिटिकली एनडेंजर्ड) श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. राज्यात या माशांच्या वार्षिक मासेमारीचे प्रमाण ३० हजार टनांपेक्षा अधिक असून बेसुमार मासेमारी या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे मत सागरी संशोधकांनी मांडले आहे.

 


 
 

आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या 'आययूसीएन' संस्थेकडून दरवर्षी संकट प्रजातींची 'रेड लिस्ट' जाहीर केली जाते. गेल्या आठवड्यात या संस्थेच्या 'शार्क स्पेशालिस्ट गुप्र'ने (एसएसजी) 'ऱ्हायनो रे' गटामधील संकटात सापडलेल्या ३५ मत्स्यप्रजातींची यादी जाहीर केली. या गटामध्ये 'गिटारफिश' 'वेजेफिश'च्या प्रजातींचा समावेश होतो. आम्ही केलेल्या मूल्यांकनानुसार 'ऱ्हायनो रे' या गटातील प्रजातींचे अस्तिव गेल्या ३० ते ४५ वर्षांमध्ये ८० टक्क्यांनी घटल्याने त्यांचा समावेश 'क्रिटिकली एनडेंजर्ड' या श्रेणीत केल्याचे 'एसएसजी'चे सदस्य डाॅ. पीटर कॅने यांनी सांगितले. या यादीमधील सहा प्रजाती महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रातही आढळतात. त्यामध्ये शार्पनोज, विद्नोज, बाॅवमाऊथ, जायन्ट गिटारफिश आणि बाॅटलनोझ व स्मूथनोज वेजेफिश या प्रजातींचा समावेश आहे. आजतागायत या सहा प्रजाती 'व्हल्नरेबल' श्रेणीमध्ये मोडत होत्या. मात्र, नव्याने झालेल्या अभ्यासानुसार बेसुमार मासेमारी आणि परांसाठी (फिन) होणाऱ्या तस्करीमुळे त्यांचे समुद्रातील अस्तित्व संकटात सापडले आहे. त्यामुळे 'आययूसीएन'ने या प्रजातींचा समावेश 'क्रिटिकली एनडेंजर्ड' श्रेणीमध्ये केला आहे.

 

 
 

या सहा प्रजातींमधील 'जायन्ट गिटारफिश' ही प्रजात 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. म्हणजेच तिची मासेमारी करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, ही प्रजात देखील 'क्रिटिकली एनडेंजर्ड' म्हणून घोषित करण्यात आली आहे. जी पूर्वी 'व्हल्नरेबल' श्रेणीमध्ये समाविष्ट होती. राज्यात 'ऱ्हायनो रे' या गटातील माशांच्या मासेमारीचे प्रमाणही अधिक आहे. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार २०१८ मध्ये राज्यात 'ऱ्हायनो रे'ची मासेमारी ३८. ७३ टन झाल्याची माहिती 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'तील एका शास्त्रज्ञाने दिली. यामधील ८२ टक्के मासेमारी ही ट्राॅल बोट आणि १७ टक्के गिलनेटमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 
 

'ऱ्हायनो रे' गटामधील मत्स्यप्रजाती या समुद्राच्या तळाशी अधिवास करतात. ट्राॅल बोट ही समुद्र खरडवून मासेमारी करत असल्याने या प्रजाती मोठ्या संख्येने जाळ्यात अडकत असल्याचे 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'चे सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांनी सांगितले. शिवाय या प्रजाती लुप्त होण्यास त्यांच्या परांची छुप्या पद्धतीने होणारी तस्करीही कारणीभूत असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तर आशियाई देशांमध्ये 'ऱ्हायनो रे'च्या परांपासून बनविलेल्या सूपला मोठी मागणी आहे. त्यामुळे परांसाठी या प्रजातींची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. या माशांची मासेमारी अनावधाने होत असली तरी, त्यांना मोठी किंमत मिळत असल्याने ट्राॅलरचे मच्छीमार त्यांना किनाऱ्यावर घेऊन येत असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन फिशरमन वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने बोट किनाऱ्यावर आल्यावर त्यांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@