इम्रान खान यांची फजिती : नेटीझन्सने केले ट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019
Total Views |


अमेरिका दौर्‍यात विमानतळावर स्वागतास कुणीच नाही !

 
 

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान अमेरिकेकडून अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. इम्रान खान यांचे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील विमानतळावर आगमन झाले असता त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कोणताही मंत्री अथवा शासकीय अधिकारी उपस्थित राहिला नाही. पाकिस्तानचेच परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यानंतर इम्रान यांना चक्क मेट्रोने आपल्या निर्धारित स्थळी जावे लागले.


 

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून सोमवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. इम्रान यांचे वॉशिंग्टन विमानतळावर कतार एअरवेजच्या विमानाने आगमन झाले. राजशिष्टाचाराप्रमाणे विदेशी राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाचे आगमन होत असताना विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी यजमान देशाचा परराष्ट्र मंत्री, राजशिष्टाचार मंत्री किंवा पंतप्रधान / अध्यक्षांनी जबाबदारी दिलेला कोणताही मंत्री, तसेच, राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख अधिकारी, यजमान देशाने पाहुण्या देशामध्ये नियुक्त केलेले राजदूत इ. प्रमुख व्यक्ती उपस्थित राहतात. परंतु, इम्रान यांचे आगमन झाले असता अमेरिकेचा परराष्ट्र किंवा कोणत्याही विभागाचा मंत्री, अधिकारी यावेळी स्वागतासाठी उपस्थित नव्हता. उलट पाकिस्तानचेच परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इम्रान यांचे स्वागत केले. याबाबतचा व्हिडिओ अनेक माध्यमांमधून व्हायरल झाला आहे.

 

विमानतळावर उतरल्यावर इम्रान खान मेट्रोने अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूतांच्या निवासस्थानी रवाना झाले. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला असून त्यामुळे पाकिस्तानातून व विदेशातून सहानुभूती मिळवण्यासाठी इम्रान सध्या साधी राहणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अमेरिकेतही ते हॉटेलवर मुक्कामास न जाता आपल्या राजदूतांच्या निवासस्थानी गेले आहेत. दरम्यान, इम्रान यांना मिळालेल्या या वागणुकीबाबत ट्रम्प प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



 

 

‘नेटीझन्स’नी केले ट्रोल!

इम्रान यांच्या या फजिती आणि अपमानाबद्दल जगभरातून त्यांना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अमेरिका, पाकिस्तानसह भारतातील नागरिकांनी या प्रकाराबद्दल इम्रान यांची चांगलीच खिल्ली उडवली असून असंख्य विनोद, मीम्स यांचा पाऊस फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांवर पडताना दिसत आहे.



 

 

ओमार अब्दुल्ला मात्र इम्रानच्या पाठीशी

जगभरातून इम्रान खान यांची खिल्ली उडवली जात असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मात्र इम्रान यांचे समर्थन केले. ट्विटरवरून ट्विट करताना ओमर म्हणाले की, इम्रान यांनी आपल्या देशाचा पैसा वाचवला. बहुतेक नेत्यांसारखे ते आपल्यासोबत अहंकार घेऊन जात नाहीत, अशा शब्दांत ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांची प्रशंसा केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@