राजकुमारांचा अहंकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019   
Total Views |



देवाधिदेव प्रवास करता करता महाराष्ट्र नामक स्थळी येतात. इथे कुणाचाही आकांत नाही, वाद नाही, परप्रांतीय वगैरे वगैरे मुद्द्यावरून खळ्ळ्खट्याक् नाही. देव अचंबित. नारदाला विचारतात, "नारदा सांप्रतकाळी इथले सगळे प्रश्न संपलेत का? काही वर्षांपूर्वी इथेच पररप्रांतीय, बेरोजगारी, भूमिपुत्र, मी दलित-तू मनूवादी वगैरे वगैरेच्या वादांनी कान किटले होते. पण आता काय झाले?" यावर नारद आठवून म्हणतात, "हो ना, दिल्लीचे राहुल हे मोठे राजकुमार, मधले राजकुमार प्रकाशबापू आणि तिसरे धाकले राजकुमार तर माझ्याच कुळाचे... त्यांना निवडणूक लढवायची नव्हती तरी पण ते 'लावा रे तो व्हिडिओ' म्हणून सगळीकडे माझ्यासारखे भ्रमण करत होते. कहाँ गये वो लोग..? तसे मधल्या आणि धाकल्या राजकुमारांच्या समाज अशांत करण्याच्या क्रियेत सध्या कशाने तरी अडथळा आला आहे. त्यामुळे या राजकुमारांच्या मते देशाचे सगळे प्रश्न संपले आहेत वाटते." यावर देव आश्चर्यचकित. आता हा कोणता अडथळा आहे, ज्यामुळे विरोधकांना सगळे प्रश्न सुटल्यासारखे वाटते आहे. नारद म्हणतात, "देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असा काहीसा मंत्र या राज्यातले लोक सारखे म्हणतात. यामुळे राजकुमारांची शक्ती क्षीण झाली आहे. इतकी वर्षे लोकांनी राजाचा मुलगा म्हणून राजकुमारांना डोक्यावर घेतले. पण आता लोकांनी सामान्य घरचे लोक सत्तास्थानी बसवले. जनतेचा हा कौल राजकुमारांना मान्य नाही. राजकुमारांचा अहंकार हे सत्य स्वीकारूच शकत नाहीत. लोकांनी या सामान्यांना का प्रेम द्यावे? का राजसत्ता द्यावी? त्यामुळे ते स्वतःच्या मनाची समजूत घालतात की, लोकांमुळे नाही तर इव्हीएममुळे ही सामान्य घरची माणसं जिंकली आहेत. त्यामुळे तिघेही राजकुमार सध्या नवीनच मंत्र जपत आहेत. तो मंत्र आहे इव्हीएम इव्हीएम. देव, नारदमुनी दोघेही विचारमग्न. तसे त्यांनाही माहिती आहे की, कौरवांचा अहंकार, रावणाचा अहंकार कलियुगातही आहे. फक्त अहंकाराची बरीच अधोगती झाली आहे. कौरवांनी आणि रावणाने शेवटी कबूल तरी केले की आपण हरलो. इथे तर हरले तरी अहंकार तसाच आहे. इव्हीएमच्या आड हरलेल्या राजकुमारांचा लोकमताला तुच्छ लेखण्याचा अहंकारच आहे.

 

चालू द्या थयथयाट...

 

९ ऑगस्ट. हा दिवस 'चले जाव' चळवळींसाठी अगदी योग्य. या दिवसाला स्मरून कोण काय करेल, याची खात्री नाही. तर मधल्या आणि धाकल्या राजकुमारांनी या दिवशी इव्हीएमच्या विरोधात चले जाव करायचा पण केला आहे. लोकसभा निवडणूक संपली, आता विधानसभेचे वेध आहेत. इव्हीएम माणसाने बनवलेली मशीन असली तरी वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत करत, त्यातल्या त्यात बिनचूकपणा जपणारी यंत्रणा असते, असे म्हटले जाते. पण या दोन्ही राजकुमारांचा इव्हीएमला विरोध आहे. म्हणजे त्यांचा इव्हीएमला विरोध आहे, असेही म्हणू शकत नाही. या इव्हीएम मशीनमुळे भाजप जिंकली, म्हणून त्यांचा इव्हीएमला विरोध आहे. तेच जर मोठे राजकुमार, मधले राजकुमार आणि धाकल्या राजकुमारांना पाठबळ देणारे घड्याळकाका जिंकले असते तर इव्हीएम चांगले असते. मुद्दा लक्षात घ्या, इव्हीएमला विरोध का? खरे म्हणजे हे दोन्ही राजकुमार जनतेला मूर्ख बिर्ख समजत असावेत. कारण निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणेसंदर्भात काही आक्षेप आहेत का? अशी विचारणा केली होती. त्यावेळी दोघेही राजकुमार निवडून निवडून येणारा कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? या स्वप्रतिमेच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेला, आवाहनाला अजिबात प्रतिसाद दिला नाही. मात्र, निवडणुकीनंतर निकाल पाहून या दोन्ही राजकुमारांवर आकाश कोसळले. 'मेरा सुंदर सपना तूट गया,' असेच काहीसे म्हणत त्यांचे मन आक्रंदत होते. तो आक्रोश स्वार्थाचाच होता. तो आक्रोश मला का नाही, त्यालाच का मिळाले, या मत्सराचा होता. त्या स्वार्थातून आणि मत्सरातूनच मग सगळे विरोधक एक झाले. एक होण्यासाठी मुद्दा तर हवाच. मग तो मुद्दा उठवला गेला इव्हीएमचा. अर्थात ज्यांनी इव्हीएमपूर्वीची निवडणूक पाहिली आहे, त्यांना माहिती आहे की, ती निवडणूक अतिशय खर्चिक, वेळखाऊ, तितकीच असुरक्षित असायची. बॅलट पेपरवर निवडणूक घेतल्यावर धनदांडग्यांनी बाहुबलींनी मतदानाच्या पेट्याच्या पेट्या पळवल्याच्या बातम्या त्याकाळी सामान्यच होत्या. या पार्श्वभूमीवर मधल्या आणि धाकल्या राजकुमारांना पुन्हा बॅलट पेपरवर निवडणुका हव्या आहेत. या इच्छेमागे काय दडले आहे, हे सुज्ञ नागरिकांना सांगायलाच हवे का? बाकी राजकुमारांनो इव्हीएमचा थयथयाट चालू द्या...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@