सर्वांगीण अभिनयाचा 'सुहासित' प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019   
Total Views |

 

 
 

प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशींच्या अभिनयाच्या प्रदीर्घ आणि भरीव कामगिरीबद्दलच २०१८ चासंगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

 

कधी भेदक नजरेने खलनायकी अभिनयाची छाप, तर कधी सुहास्य पसरवणारा एक साधा निरागस चेहरा. ही वर्णने ऐकली की एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचा. १९७० च्या दशकामध्ये मराठी व्यावसायिक नाटकांच्या प्रगतीचा काळ होता. या काळात मराठी रंगभूमीला अनेक गुणी कलाकार मिळाले. या काळात अनेक अभिनेत्रींची सशक्त फळी उभी राहिली. या कलावंतांमध्ये एक नाव प्रखरपणे समोर येते ते म्हणजे सुहास जोशी अर्थात, सुहासिनी सुभाष जोशी यांचे.

 

भक्ती बर्वे, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर यांच्यातीलच हे एक प्रकाशित नाव. गौर वर्ण, टपोरे डोळे, माध्यम बांधा आणि शब्दांवर विशिष्ट पकड आणि संवाद फेकण्याची लकब यामुळे त्यांचा रंगभूमीवरील वावर लक्षवेधी ठरत होता. मराठी तसेच हिंदी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून कधी आई, कधी गृहिणी, तर कधी एक प्रचलित महिला उद्योजिका अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. कधी कडक शिस्तीची सासू, तर कधी प्रेमळ आई असा दोन टोकावरच्या छटादेखील त्यांनी रंगवल्या. साधारण ४५ वर्ष त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या याच कार्याला सलाम करत त्यांना प्रतिष्ठीत २०१८ चा 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर झाला आहे. कसा होता त्यांचा प्रवास जाणून घेऊया त्याबद्दल...

 

सुहास जोशी यांचा जन्म दि. १२ जुलै, १९४७ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यात झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि संस्कृत याविषयांमध्ये पदवी घेतली. याचदरम्यान त्यांनी चार-पाच नाटकांमध्ये कामे केली होती. त्यातील एक संस्कृत 'मालविकाग्निमित्र' होते. हे नाटक घेऊन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा एक गट मुंबईला राज्य नाट्यस्पर्धेसाठी गेला होता. मात्र, सुहास जोशींनी काम केलेल्या या नाटकाला कुठलेही पारितोषिक मिळाले नव्हते. पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय संगीताची 'मध्यमा' ही परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. पुढे त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यांचा खरा अभिनयप्रवास हा १९७२ पासून चालू झाला. प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित 'बॅरिस्टर'मध्ये त्यांनी भूमिका साकारली. तसेच, काशिनाथ घाणेकर यांच्यासोबत 'आनंदी गोपाळ' या नाटकामधील त्यांची भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यांनी गंभीर तशाच विनोदी भूमिका सहजपणे पार पडल्या.

 

'बॅरिस्टर'मधील त्यांची राधा, सई परांजपेंच्या 'सख्खे शेजारी'मधील मध्यमवर्गीय गृहिणी या दोन वेगवेगळ्या भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. पुढे १९८० च्या दशकात आलेल्या तेंडुलकरांच्या 'कन्यादान' या नाटकात त्यांची व्यक्तिरेखा होती. या नाटकात डॉ. श्रीराम लागू प्रमुख भूमिकेत होते. सुहास जोशींनी श्रीराम लागू यांच्याबरोबर केलेली 'अग्निपंख,' 'नटसम्राट,' 'एकच प्याला' ही नाटके गाजली. त्या येऊर येथील आपल्या घरी हौशी-प्रायोगिक नाट्यप्रयोगाचे दर महिन्याला आयोजन करीत असत. मराठी चित्रपटांमधल्या 'तू तिथे मी'ने सुहास जोशींना चार पुरस्कार मिळवून दिले.

 

पुढे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतील चित्रपटांतून त्यांनी मोठ्या प्रमाणात भूमिका केल्या. हिंदीतील 'चाँदनी,' 'तेजाब' हे बॉक्स ऑफिसवर गाजलेले चित्रपट त्यांनी केले. दूरचित्रवाणीवरील मालिकांचे युग सुरू झाल्यानंतर तेथेही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी 'अग्निहोत्र,' 'एक धागा सुखाचा,' 'ऋणानुबंध,' 'किमयागार,' 'कुंकू' आणि अशा इतर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली. सुहास जोशी यांनी त्यांच्या चोखंदळ अभिनयासाठी अनेक पुरस्काराने नावाजले गेले. चित्रपट, मालिका तसेच नाटक या तिन्ही क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीला अनेक पुरस्कारांनी गौरविले. परंतु, चित्रपट आणि मालिकांपेक्षा त्यांना नाटकांमध्ये रमायला आवडत असे.

 

उत्तम नाट्याभिनयासाठी १९७५, १९७७ आणि १९८३ या तीन वर्षात त्यांना नाट्यदर्पणचे तीन पुरस्कार मिळाले. तसेच, त्यांनी केलेल्या रंगभूमीच्या सेवेसाठी त्यांना 'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे'तर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे पती सुभाष जोशी हेदेखील प्रायोगिक नाट्यचळवळीतील कलावंत असल्यामुळे सुहास जोशी या व्यावसायिक नाटकामध्ये रमल्या. तरीही त्यांना प्रायोगिक रंगभूमीविषयी विशेष आस्था आहे. वयाच्या ७२व्या वर्षीही त्यांची काम करण्याची ऊर्जा ही तरुण कलाकारांना प्रेरणा देते. अभिनयासोबतच त्यांच्या सामाजिक कार्याचीदेखील तेवढीच दखल घेतली आहे. अशा या चिरतरुण आणि सुहासित अभिनेत्रीला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@