स्वच्छ - निर्मळ मनाचा माणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019
Total Views |



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी, २२ जुलै रोजी ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, तर येत्या ऑक्टोबरमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. एक व्यक्ती आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून गेल्या २५ वर्षातील त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म एका सुसंस्कारीत, खानदानी श्रीमंत घरात झाला. फडणवीस कुटुंब मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील ‘मूल’चे. तेथील ते मालगुजार. वडील गंगाधरराव फडणवीस व काका बाळासाहेब फडणवीस संघाचे स्वयंसेवक. आई सरिताताई या अमरावतीच्या कलोती या राजकीय घराण्यातील. त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीसांना संघ संस्काराबरोबरच राजकीय वारसाही लाभला. एक कुशाग्र बुद्धीचा मुलगा म्हणून शाळा-महाविद्यालयामधून त्यांनी आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. महाविद्यालयीन निवडणुका, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धातूनही त्यांनी आपल्या वक्तृत्वाची व नेतृत्वाची झलक दाखवायला सुरुवात केली होती. विद्यार्थी परिषद व भाजप युवा मोर्चात काम करताना, अनेक भाजप कार्यकर्ते व नेते त्यांच्याकडे आकर्षित होत. त्यांचा शांत, संयमी तरीही कणखर स्वभाव सर्वांनाच आवडायचा. त्यामुळे पक्षपदाबरोबरच नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यासारखी पदे देवेंद्र फडणवीसांना आपसूक मिळाली.

 

पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा, अभ्यासूवृत्ती यामुळे फडणवीसांची विधानसभेतील कामगिरी सर्वांच्याच नजरेत भरली. विचारांशी, पक्षाशी तडजोड न करणारा प्रामाणिक मेहनती नेता असा त्यांचा लौकिक होताच. म्हणून पक्षाने अत्यंत कमी वयातही त्यांच्यावर महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाची म्हणजे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. युती तोडण्याचा अवघड निर्णय विधानसभा निवडणुकीनंतरच्या निकालाने सोपा झाला. मात्र, शिवसेना सुरुवातीला विरोधात आणि नंतर सत्तेत सहभागी होऊनही सतत सरकारला विरोध करत राहिली. विरोधक आणि सत्तेतील सहभागी मित्र यांचा सततचा विरोध झेलत महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीमुळे अनेक विरोधातील आमदारही खाजगीत त्यांचं कौतुक करतात. ते कधीच कोणावर चिडत नाहीत, कोणतेही काम घेऊन गेलेला माणूस त्याचं काम होणार असो अथवा नसो तो नाराज होऊन कधीच परतत नाही.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यशैलीची भीती विरोधकांना सतत वाटत असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व सरकारबद्दल नाराजी कशी निर्माण होईल, याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्यांनी जितका विरोध केला तितका देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आणि ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समित्या, जिल्हापरिषदा, महापालिका, नगरपालिका अगदी लोकसभेच्या निवडणुकांत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाले. चौथ्या क्रमांकावर असलेली भाजप महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आली.

 

नेतृत्वाचा फार मोठा अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीबद्दल सुरुवातीला अनेकांच्या मनात शंका होती. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवार, विठ्ठलराव देशमुख यासारख्या दिग्गज मराठा नेत्यांनी ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व केले, त्यांच्या तुलनेत फडणवीस ब्राह्मण आणि नवखे होते. विरोधक आणि शिवसेनेने सुरुवातीला विरोध सुरू केल्यानंतर फडणवीसांचे सरकार फार काळ टिकणार नाही, टिकू देणार नाहीत, असे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत होते. परंतु, सर्वच निवडणुकांमधील यश मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ यासारखे विषय ज्या हातोटीने त्यांनी हाताळले, त्यामुळे सारेच विरोधक मूग गिळून बसले. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फडणवीसांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे.

 

दूरदृष्टीचा नेता

१५ वर्षे विधानसभेत विरोधकाची भूमिका पार पाडताना फडणवीसांनी महाराष्ट्राचा पुरेपूर अभ्यास केला. प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याची त्यांची अभ्यासूवृत्ती मुख्यमंत्रिपदासाठी कमी आली. सत्तेतील लोक किती शहाणे आणि प्रामाणिक आहेत, याचाही त्याकाळात त्यांचा अभ्यास झालेला होता. विरोधकांची बलस्थाने व उणिवा यांची फडणवीसांना जाणीव होती. १५ वर्षे विरोधकांचा भ्रष्टाचार उघड करण्यात फडणवीस कायम अग्रेसर होते. भ्रष्टाचार कुठे आणि कसा होतो हे त्यांना त्या काळात नीट उमजले होते. म्हणून त्यांनी सत्तेवर येताच भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. ऑनलाईन टेंडर प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे रिंग करून मंत्री अधिकारी आणि कंत्राटदार सरकारची लूट करायचे ते थांबले. आघाडी सरकारमध्ये ५० ते १०० टक्के अधिकच्या असणार्‍या निविदा १० ते ३५ टक्के कमीने भरल्या जाऊ लागल्या. जलसंपदा विभागातील ९४ टक्के निविदा या अंदाजित किंमतीपेक्षा कमी दराने मंजूर झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राची हजारो कोटींची लूट थांबली.

 

पूर्वी दहा लाखांपर्यंतची कामे निविदा न मागविता जवळच्या व्यक्तीला देण्याची मुभा होती. ती मर्यादा तीन लाखांपर्यंत खाली आणली. याला अनेक आमदारांनी विरोध केला. परंतु, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी व कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांचेही म्हणणे ऐकले नाही. निर्णय घेताना जवळच्या दूरच्या पक्षाचा आमदारांचाही विचार केला नाही. त्यामुळे त्यांना बेकायदेशीर कामे सांगण्याची आमदारांची अथवा पक्षनेत्यांची हिंमत होत नाही. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

 

भ्रष्टाचार बंद व्हावा, सरकारी यंत्रणेचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी सेवा कायदा निर्माण केला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली. भ्रष्टाचाराला आळा बसला. शासकीय योजनेत संगणकाचा अधिक वापर सुरू केल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणे, लाभार्थ्याला मिळणारी मदत थेट त्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे जनतेची सोय झाली व भ्रष्टाचारही कमी झाला. शेतकर्‍यांच्या सात-बारा यासारख्या गोष्टी ऑनलाईन केल्यामुळे शेतकर्‍यांची छळवणूक थांबली. शासकीय मदतीसाठी पूर्वी जनतेला बँकेचे उंबरठे झिजवावे लागत, आता थेट खात्यात पैसे जमा होत असल्यामुळे जनतेचा पैसा आणि वेळ वाचला. हे बदल अत्यंत साधे वाटत असले तरी त्यांचा जनतेला फार मोठा फायदा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खूश आहे.

 

देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे पदवीधर आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन विषयात ‘मेथड्स अ‍ॅण्ड टेक्निकल ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ या विषयात बर्लिन येथील पदविका उत्तीर्ण असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पाचे नियोजन व व्यवस्थापन त्यांनी उत्तम केले आहे. त्यांच्या या ज्ञान व अनुभवामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांनाही त्यांची आदरयुक्त भीती वाटते. त्यामुळे अधिकार्‍यांच्या फेकुगिरीलाही आळा बसला आहे.

 

कार्यकर्ता आणि निर्मळ नेता

निर्मळ स्वच्छ मनाचा कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री नेता असा फडणवीसांचा राजकीय प्रवास अवघ्या २५ वर्षांचा आहे. या २५ वर्षांच्या काळात फडणवीसांना पक्षातील प्रदेशाध्यक्ष पद ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पद त्यांच्यातील गुणामुळे, कर्तृत्वामुळे, प्रामाणिकपणामुळे तसेच त्यांच्या मितभाषी, मृदू संयमी व संतुलित स्वभावामुळे मिळाली आहेत. फडणवीसांना कमी वयात लाभलेल्या या पदांचा गर्व अहंकार यांचा लवलेषही त्यांच्या वागण्या-बोलण्यातदिसत नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, गेलेले वैभव महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी त्यांना गेली पाच वर्षे अनेक कायदे केले निर्णय घेतले व त्याच्या अंमलबजावणीसाठी अथक मेहनत केली. सकाळी ७ वाजता उजाडलेला दिवस कधी रात्री १२ वाजता, तर कधी पहाटेच्या ३ वाजता संपतो.

 

कमालीचा ऊर्जा असलेला देवेंद्र फडणवीस हा माणूस कोणी काहीही म्हटले तरी आणि कधीही कुठेही भेटले तरी स्मितहास्य करीत समोर असलेल्या कागदावर आपला ‘शेरा’ उमटवत समोरच्याला समाधान देतो. वय कमी असले तरी अनेक वयस्कर बड्या नेत्यांनाही फडणवीसांच्या निर्णयाचे व कामाचे कौतुक वाटते. स्वकीयांप्रमाणेच विरोधकांनाही फडणवीसांबद्दल आदर वाटतो. आता तर नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानले आहे, तर उद्धवनी देवेंद्र फडणवीसांना लहान भावाचा मान दिला आहे. त्यामुळे युतीचा रथ महाराष्ट्रात चौखुर उधळत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत कोणाचे काय होणार, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज आहे असे वाटत नाही. त्यासाठी महाराष्ट्राच्या यशस्वी मुख्यमंत्र्याला स्वच्छ, निर्मळ मनाच्या सुस्वभावी नेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!

- गणेश हाके

 

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते व ‘मनोगत’ पाक्षिकाचे संपादक आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@