गंगा पवित्र राहिली पाहिजे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2019   
Total Views |



ज्या पिढीने आणि या पिढीच्या अगोदरच्या पिढीने पक्षवाढीसाठी जे अफाट कष्ट उपसले आहेत, त्या सर्वांची इच्छा हीच आहे की, आपला प्रवाह गंगेचा प्रवाहच राहिला पाहिजे. गंगेत अनेक प्रवाह येऊन मिळतील, पण गंगोत्रीला उगम पावलेली गंगा बंगालच्या उपसागराला मिळतानादेखील गंगाच असते. तसे आपले स्वरूप शुद्ध, निर्मळ आणि पवित्र असले पाहिजे.


भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकातील बारा आमदारांनी राजीनामा दिला. त्यातील नऊ आमदार काँग्रेसचे आहेत आणि तीन जेडीएसचे आहेत. गोव्यातील दहा काँग्रेसच्या आमदारांनी पक्षबदल करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्येदेखील अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पेश ठाकोर हे त्यातील प्रमुख आमदार होते. १४ जुलैची बातमी अशी आहे की, पश्चिम बंगालमध्ये विविध पक्षांतील १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मध्य प्रदेशात आणि राजस्थानमध्येदेखील राजकीय भूकंप होण्याची वेळ आलेली आहे. फक्त तो कधी होणार, कोणत्या महिन्यात होणार, एवढेच निश्चित व्हायचे राहिले आहे. जहाजं बुडू लागली की, त्यातील उंदीर पाण्यात उड्या मारू लागतात. काँग्रेसचे जहाज बुडण्याच्या वाटेवर असल्यामुळे आणि काँग्रेसच्या जहाजाला कप्तानही नसल्यामुळे या जहाजातील सगळे खलाशी जहाज सोडण्याच्या वाटेवर आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने हा अतिशय चिंतेचा विषय आहे आणि त्याहून अधिक चिंतेचा विषय संसदीय लोकशाहीतील प्रभावी विरोधी पक्षाच्या अस्तित्त्वाचा आहे. या दोन्ही विषयावर वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल. तूर्त, हे दोन्ही विषय बाजूला ठेवून काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्याची जी रीघ लागली आहे, तिचा भाजपवर काय परिणाम होईल, याचा विचार करायला पाहिजे. काँग्रेसमधून भाजपमध्ये जे राजकीय नेते काल आले, आज येत आहेत आणि उद्या येणार आहेत, त्यांना भाजपची विचारसरणी पटली आहे, यामुळे ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले, असे समजण्याचे कारण नाही. त्यांना एकच गोष्ट फार उत्तमप्रकारे समजली. ती म्हणजे सत्तेच्या वर्तुळात राहायचे असेल तर काँग्रेसचा आता काही उपयोग नाही. राहुल गांधी यांच्याकडे मते खेचून आणण्याची शक्ती नाही. २०१४ साली तो अपघात आहे असे मानले, तर २०१९ साली वस्तुस्थिती झाली आहे. जे राजकारणात असतात त्यांना राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतात हे फार लवकर समजते. समाजाचा विचार करता, समाजात राजकारणाची आवड असणारा, सत्येची आवड असणारा, सत्ता राबविण्याची उपजत क्षमता असलेला एक वर्ग असतो. सगळ्याच लोकांना ती आवड असते, असे नाही. कुणाला खेळाची आवड असेल तर कुणाला संगीताची, कुणाला शास्त्राची, कुणाला सेवाकार्य करण्याची, असे वेगवेगळे वर्ग समाजात राहतात. सत्येची आवड असणारा वर्ग, लोकशाहीत राजकीय पक्षांच्या माध्यमातून संघटित होतो आणि काम करू लागतो. लोकशाहीमध्ये लोकमत अनुकूल करून मते मिळवावी लागतात. हे काम पक्षातील चार/दोन वरिष्ठ नेते करतात. उदा : शिवसेनेत हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. काँग्रेसमध्ये हे काम नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी केले. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी हे काम केले. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग आणि मायावती यांनी हे काम केलेले आहे.

 

ज्या पक्षात आपल्या महत्त्वाकांक्षेला वाव मिळेल, सत्तेच्या पायऱ्या चढून जाता येईल, त्या पक्षात राजकारणाची आवड असणारी मंडळी जातात. एकमेकांपासून अंतर ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. त्यासाठी तत्त्वज्ञानाचा आधार घेतला जातो. ऐतिहासिक महापुरुषांना आदर्श मानले जाते. शिवसेनेने शिवाजी महाराजांना आदर्श मानले, काँग्रेसने महात्मा गांधी, नेहरू यांना आदर्श मानले. भाजपने पं. दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांना आदर्श मानले. पक्षाच्या तत्त्वज्ञानाचा विचार करता या देशात तत्त्वज्ञानावर आधारित फक्त दोनच पक्ष आहेत. पहिल्या गटात साम्यवादी पक्ष येतात आणि दुसऱ्या गटात भाजप येतो. काँग्रेसकडे तत्त्वज्ञान आहे किंवा काँग्रेसच्या प्रतिकृती झालेल्या प्रादेशिक पक्षांकडे तत्त्वज्ञान आहे, असे जर कुणी म्हणत असेल तर ते खरे नाही. काँग्रेसची स्थिती सर्व विचारधारांना पक्षात जागा देऊन एका छत्रीच्या रूपात उभे राहण्याची होती. काँग्रेसमध्ये हिंदुत्त्ववाद आहे, समाजवाद आहे, साम्यवाद आहे, आंबेडकरवाद आहे आणि गांधीवाददेखील आहे. असे सगळे वाद जेथे असतात तिथे निर्विवाद काही नसते. कधी सेक्युलॅरिझमचा उदोउदो करायचा, कधी गांधीवादाचा, कधी समाजवादाचा, तर कधी आंबेडकरवादाचा. वारा जसा फिरेल तशी पाठ फिरवायची. भारतीय जनता पक्षाचे तसे नाही. भारतीय जनता पक्षाचा जन्म जनसंघातून झाला आणि जनसंघाचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म 'हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू समाज राष्ट्रीय समाज आहे, आपली एक जीवनपद्धती आहे, आपली स्वतंत्र विचारधारा आहे, ही विचारधारा विश्वाचा एकात्मिक विचार करणारी आहे. सर्वांचे कल्याण हे तिचे लक्ष्य आहे.' या सिद्धांताच्या संवर्धनासाठी झाला. भाजपचे कामदेखील राजकीय क्षेत्रात या सिद्धांताचे संवर्धन करणारे आहे. भाजपला तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचे काम पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेले आहे. त्यांचे एकात्म मानव दर्शन हे दुसरे-तिसरे काही नसून संघाला जे अभिप्रेत आहे, ते राजकीय क्षेत्रात कसे आणायचे, हे सांगणारे दर्शन आहे. हे तत्त्वज्ञान साम्यवादी तत्त्वज्ञानापेक्षा फार वेगळे आहे. साम्यवादी, समाजवादी आणि सेक्युलॅरिझमच्या तत्त्वज्ञानात ईश्वराला स्थान नाही, धर्माला स्थान नाही, धर्माला स्थान नसल्यामुळे धार्मिक नीतीतत्त्वांना स्थान नाही. धार्मिक नीतीतत्त्वांना स्थान नसल्यामुळे मनुष्य आर्थिक प्राणी आहे. खा, प्या, मजा करा, माझा देह माझा आहे, त्याचे काय करायचे हे मी ठरवणार, हा विचार प्रबळ झालेला आहे. हा विचार भारतीय नाही. भारतीय आत्म्याची ती हाक आणि भूकही नाही. भारतीय जनता पक्षाचे तत्त्वज्ञान पुस्तकी तत्त्वज्ञान नाही. तत्त्वज्ञान पुस्तकी असू नये, ही संघाची शिकवण आहे. तत्त्वज्ञान जगायचे असते. पुस्तकातले तत्त्वज्ञान पुस्तकी पंडितांच्या उपयोगाचे असते. त्यावर ग्रंथ लिहिता येतात, प्रबंध लिहिता येतात, डॉक्टरेट मिळवता येते. जीवन जगण्याशी त्याचा काही संबंध नसतो. हे तत्त्वज्ञान राजकीय क्षेत्रात जगण्याचा प्रवास म्हणजे जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचा प्रवास आहे. हे तत्त्वज्ञान पं. दीनदयाळ उपाध्याय जगले, अटलजी जगले, सुंदरसिंग भंडारी जगले, कुशाभाऊ ठाकरे जगले, आज लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी हे तत्त्वज्ञान जगत आहेत. ज्या पक्षात तत्त्वज्ञान जगणारी माणसे आहेत, त्या पक्षाला लोकमान्यता मिळणार, हे ठरलेले आहे.

 

भाजपमध्ये येण्याची ज्यांची रांग लागली आहे, ते आजपर्यंत कोणते तत्त्वज्ञान जगत आले? ते तत्त्वज्ञान जगत होते, असे म्हणण्याचे धाडस मी करू शकत नाही. सत्ता मिळवण्याचे तंत्रज्ञान ते जगत होते. त्यात ते फार तज्ज्ञ होते आणि आजही आहेत. त्यांच्या येण्यामुळे भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल. संख्याबळ वाढल्यामुळे सत्ताबळदेखील वाढेल, पण विचारबळाचे काय होणार?, नैतिक बळाचे काय होणार? हा आमच्यासारख्यांचा पुढचा चिंतेचा गंभीर विषय आहे. जनसंघाच्या प्रारंभीच्या काळात 'पडण्यासाठी मला उभे राहायचे आहे.' हे उमेदवाराला माहीत असे. त्याचे डिपॉझिट जाई, पण त्याचा आशावाद, चिकाटी, धैर्य, कणभरदेखील कमी होत नसे. तो म्हणे, 'अगली बारी अटल बिहारी' एवढा दुर्दम्य आत्मविश्वास विचारधारेच्या निष्ठेतून निर्माण होतो. आज जरी आम्ही वेडे ठरलो, तरी उद्याचा दिवस आम्हाला जनता डोक्यावर घेईल, असा येईल आणि त्या कालखंडातून आपण आज जात आहोत. जी बाहेरची भरती आत होत आहे, ती गंगा दूषित करणार नाही, हे पाहिले पाहिजे. गंगा दूषित व्हायची नसेल तर गंगेला शुद्ध ठेवणारा प्रवाह अधिक बलवान करावा लागेल. लोकशाही राजवटीत ज्याची सरशी त्याच्याबरोबर राहण्याची धावपळ, असे होत राहते. अमेरिकेच्या पक्षीय राजकारणाचा इतिहास असाच आहे. भाजपकडे सत्तेची आकांक्षा असणारा मोठा वर्ग येत जाणार, जोपर्यंत प्रभावी विरोधी पक्ष उभा राहत नाही, तोपर्यंत हे चालूच राहणार. तंबूत उंट आला आणि अरब बाहेर गेला, अशी एक म्हण आहे. ही म्हण भाजपच्या बाबतीमध्ये तंतोतंत लागू होणार नाही, परंतु बाहेरून जे सगळे पक्षात येत चालले आहेत, ते पक्षाची मोठ्या कष्टाने जी प्रतिमा उभी केली आहे, ती उज्ज्वल करतील की मलीन करतील, अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. शेवटी चिंता ज्यांना भारतीय जनता पक्ष चालवायचा आहे, त्यांनाच करायची आहे. काठावर बसून नको ते उपदेश करण्यात काही अर्थ नसतो, हे जितके खरे तेवढे हेदेखील खरे की, ज्या पिढीने आणि या पिढीच्या अगोदरच्या पिढीने पक्षवाढीसाठी जे अफाट कष्ट उपसले आहेत, त्या सर्वांची इच्छा हीच आहे की, आपला प्रवाह गंगेचा प्रवाहच राहिला पाहिजे. गंगेत अनेक प्रवाह येऊन मिळतील, पण गंगोत्रीला उगम पावलेली गंगा बंगालच्या उपसागराला मिळतानादेखील गंगाच असते. तसे आपले स्वरूप शुद्ध, निर्मळ आणि पवित्र असले पाहिजे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@