‘पैसा वसूल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2019   
Total Views |



क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळम्हटलं जातं, ते उगाच नाही. इथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. क्रिकेटच्या पंढरीत सुरू असलेला एकदिवसीय विश्वचषकदेखील याला अपवाद नाही. या स्पर्धेत यंदा राऊंड-रॉबिन लीगपद्धतीने सामने खेळवण्यात येत असल्याने ही बाब आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. यामध्ये पहिल्या फेरीत सर्व संघ सर्वच संघांशी एकेक सामना खेळतात. त्यामुळे यंदाच्या साखळी फेरीतील 10 संघ हे प्रत्येकी नऊ सामने खेळत आहेत. याचा परिणाम असा की, प्रत्येक संघाला शेवटपर्यंत आपला फॉर्मटिकवण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतोय. शिवाय, दर सामन्यानंतर मालिकेचं चित्र बदलतानाही दिसत आहे. म्हणजे, स्पर्धेच्या सुरुवातीला जे विश्वचषकाचे प्रबळ दावेदारमानले गेले, ते पहिल्या तीन-चार सामन्यांनंतर संकटाच्या गर्तेत सापडले. ज्यांना पहिल्या तीन-चार सामन्यांत फारसं काही यश मिळालं नाही, ते पुढच्या दोन-तीन सामन्यांत पुनरागमन करून उपांत्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. इंग्लंड, द. आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशी काही उदाहरणं यासाठी ग्राह्य धरता येतील. आपल्या मायभूमीवर खेळत असलेला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला इंग्लंडचा संघ श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लागोपाठ दोन पराभवांनी संकटाच्या गर्तेत सापडला. द. आफ्रिकेसारखा प्रबळ संघ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पालापाचोळ्यासारखा बाजूला सारला गेला. पाकिस्तान, श्रीलंकेने सुरुवातीच्या मानहानिकारक पराभवाने तोंड दिल्यानंतर अचानकपणे पुनरागमन केले. बांगलादेशसारखा कायमच दुबळा मानला गेलेला संघदेखील आज उपांत्य फेरीच्या स्पर्धेमध्ये आहे. या सार्‍या अप्स अ‍ॅण्ड डाऊन्समुळे या स्पर्धेची रंगत कमालीची वाढली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड या तीनच संघांना सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलं असलं तरी या तिघांनाही कधी ना कधी पराभवाची चव चाखावी लागलेलीच आहे. ऑस्ट्रेलियाला भारताने सहजपणे हरवलं, न्यूझीलंडचा पाकने धक्कादायक पराभव केला. भारताला इंग्लंडने पराभूत केलं. आता शेवटच्या सामन्यांवर उपांत्य फेरीतील तीन जागांचा निर्णय होईल. असे छातीची धडधड वाढवणारे रंगतदार क्रिकेट पाहायला मिळत असल्याने क्रिकेटरसिक सध्या भलतेच खुशीत आहेत.

 

अब की बार...

 

भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर भारताने या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला, यात शंकाच नाही. ज्या एकमेव सामन्यात भारत पराभूत झाला, त्या इंग्लंडविरुद्धही भारताने चांगली कामगिरी केली. इंग्लंडसारख्या तगड्या संघाने दीडशेहून अधिक धावांची सलामी दिल्यानंतर इंग्लंड 375-400 पर्यंत मजल मारणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. तरीही भारताने यजमानांना 7 बाद 337 वर रोखलं. धावांचा पाठलाग करताना जिंकण्याचाया स्पर्धेतील अनुभव जराही चांगला नसताना, प्रचंड दबावाखाली खेळूनही भारताने 5 बाद 306 पर्यंत मजल मारली. भारताने प्रत्येक सामन्यात निर्भेळ यश मिळवावं, अशी अपेक्षा असणार्‍या चाहत्यांची निराशा जरूर झाली असेल. परंतु, साखळी सामन्यांतच भारताच्या वाट्याला एक अवघड पेपर आला, हे एकाअर्थी बरंच झालं. भारतीय गोलंदाजी इतक्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे की, तिने समोरच्या संघाला सव्वातीनशेचा पल्ला गाठण्याची संधीच दिलेली नाही. भारताने जिंकलेल्या पाचपैकी चार सामन्यात प्रथम फलंदाजी केली. ज्या पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेच्या सामन्यात भारताने दुसरी फलंदाजी केली, तेव्हा समोर 228 धावांचं किरकोळ आव्हान होतं. त्यामुळे इंग्लंडच्या भूमीवर प्रतिस्पर्धी संघाने तीनशेहून अधिक धावांचं आव्हान दिल्यास त्याचा सामना कसा करायचा, त्यात काय करायचं आणि काय करायचं नाही, याचा सराव भारताला इंग्लंडच्या सामन्यातून मिळाला आणि त्याचा उपयोग उपांत्य किंवा अंतिम फेरीत अशी स्थिती उद्भवल्यास होईल, अशी आशा करायला हरकत नाही. एकीकडे मधल्या फळीतील फलंदाजासाठी शोधाशोध करावी लागते, तर दुसरीकडे उत्कृष्ट दर्जाच्या गोलंदाजांना संघात खेळवायला जागा नाही, अशी विचित्र स्थिती भारतीय संघात आहे. त्यात धवन जखमी झाल्यामुळे पहिल्या फळीत मोठी पोकळी जाणवत असून चौथ्या, पाचव्या क्रमांकासाठी एवढ्या सामन्यांनंतरही कुणीही स्थिरस्थावर होऊ शकलेलं नाही. एवढी एक उणीव सोडता विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासध्या नेत्रदीपक कामगिरी करत असून त्यामुळे तमाम भारतीय चाहतेही आता अब की बार...म्हणत विराटसेनेला खुणावू लागले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@