दिवेआगरात आढळलेल्या व्हेलच्या सांगाड्याचे ऐरोलीत जतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019   
Total Views |


 


कुवियर्स बीकड् व्हेल'चे राज्याच्या किनाऱ्यावर प्रथमच दर्शन ; सांगाडा विलग करण्याच्या कामाला सुरूवात

 

मुंबई ( अक्षय मांडवकर) : गेल्या आठवड्यात दिवेआगरच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आलेल्या कुवियर्स बीकड् व्हेल'च्या शरीराचे तुकडे करून त्यामधील हाडांचा एकसंध सांगाडा 'कांदळवन संरक्षण विभागा'ने ( मॅंग्रोव्ह सेल) शनिवारी रात्री मुंबईत आणला. हा सांगडा ऐरोतील सागरी आणि किनारा जैवविविधता केंद्रा'त ठेवण्यात आला आहे. राज्याच्या किनाऱ्यावर प्रथमच अत्यंत दुर्मीळ असा 'कुवियर्स बीकड् व्हेल' वाहून आला आहे. त्यामुळे या सागरी सस्तन प्राण्याचे ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या सागरी जीवांच्या संग्रहालयात जतन करण्यात येणार आहे.

 

 
 

रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या किनाऱ्यावर ९ जुलै रोजी 'कुवियर्स बीक्ड व्हेलवाहून आला होता. तज्ज्ञ सागरी संशोधकांनुसार खोल समुद्रात वास्तव्यास असणारा हा जीव प्रथमच राज्याच्या किनाऱ्यावर वाहून आला आहे. दिवेआगर वासियांना ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आल्याचे आढळून आले. त्यामुळे दिवेआगरचे सरपंच उदय बापट यांनी लगोलग व्हेलसारखा दिसणारा जीव किनाऱ्यावर वाहून आल्याचे मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस आणि प्रांत अधिकाऱ्यांना कळविले. मात्र, मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात झटकत या सागरी जीवाची पाहणी करण्यासाठी येण्यास नकार कळविला. त्यामुळे गावकऱ्यांनी पोलीस आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या मदतीने जेसीबी मागवून या जीवाला किनाऱ्यावरच साधारण ८ फूट खड्डा करुन त्यात पुरून टाकले.

 

 
 

मात्रहा सागरी सस्तन प्राणी दुर्मीळ प्रजातीचा असल्याने मॅंग्रोव्ह सेलने त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी या कामाला सुरूवात करण्यात आली. मॅंग्रोव्ह सेलचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांच्या आदेशानंतर पुरलेल्या व्हेलला पुन्हा बाहेर काढून त्यामधील हाडांचा एकसंध सांगाडा वेगळा करण्याचे काम करण्यात आल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली. या कामासाठी अलिबाग येथील काही कामगारांना पाचारण्यात आल आहे. दहा कामगारांच्या मदतीने व्हेलच्या शरीरातून हाडांचा सापळा विलग करण्यात आले. गेल्यावर्षी जून महिन्यात अशाच प्रकारे उरणच्या केगाव किनाऱ्यावर वाहून आलेल्या ४३ फुटी ब्राईडच्या देवमाशाचा सांगाडा वेगळा करण्यात आला होता.

 
 
 

दिवेआगरच्या किनाऱ्यावर वाहून आलेला 'कुवियर्स बीकड् व्हेल' हा १६ फुटांचा असल्याची माहिती ' मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी दिली. या सागरी सस्तन प्राण्याच्या सांगाड्याला ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या जायन्ट आॅफ सीया सागरी जीवांच्या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'मरिन मॅमल नेटवर्क आॅफ इंडिया' या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नोंदीप्रमाणे 'कुवियर्स बीकड् व्हेल' २०१४ मध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यावर तर २०१५ मध्ये गुजरातच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून आला होता. तर २०१५ मध्येच कर्नाटकच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या या व्हेलबद्दल एक संशोधन पत्रिका उपलब्ध आहे. महाराष्ट्रात आजवर हा जीव वाहून आल्याची कुठेही नोंद नसल्याची माहिती तज्ज्ञ सागरी संशोधिका दुराणी सुतारिया यांनी दिली.




 

'कुवियर्स बीकड् व्हेल' साधारण समुद्राच्या २,९९२ मीटर खोलीपर्यंत वास्तव्यास असतो. हा सागरी सस्तन प्राणी खोल समु्द्रातील स्क्विड आणि माशांवर उपजिविका करतो. यामधील मादी ८.५ मीटर व नर ९.८ मीटर लांबीपर्यत वाढतो. त्यांचे वजन साधारण ३ हजार किलोपर्यंत असते. हा सस्तन प्राणी २ ते ७ जणांच्या छोट्या गटात राहणे पसंत करतो. याचे वास्तव्य साधारणपणे जगातील सर्वच सागरी परिक्षेत्रात आढळते.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@