'परिवर्तना'ची 'विद्युल्लता'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |
 



समाजातील उपेक्षित वनवासी महिला व बालकांसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या वर्षाताई परचुरे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...

 

समाजातील बदलांची सुरुवात नेहमी स्वतःपासून करणे आवश्यक आहे, हा मंत्र आयुष्यभर जपून वर्षा परचुरे गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड कार्यरत आहेत. मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात 'परिवर्तन महिला' या संस्थेसाठी दिवसरात्र झटणार्‍या वर्षा परचुरे यांच्या सामाजिक कार्याची ओळख आज करुन घेऊया.

 

एक सर्वसामान्य-मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वर्षाताईंनी ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. समाजकार्याचे लक्ष्य निर्धारित केलेल्या वर्षांताईंनी मग पुण्यातून 'सामाजिक कार्य' या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. त्यानंतर १९९७ पासून त्यांनी स्वत:ला समाजकार्यात अक्षरक्ष: झोकून दिले. 'जनसेवा', 'अपनालय', 'प्रसादचिकित्सा' यांसारख्या समाजकार्यात अग्रेसर संस्थांसोबत त्यांनी कामाचा व्यापक अनुभव घेतला. या संस्थांमध्ये काम करत असताना जंगलात, वनवासी पाड्यांवर काम करण्याचा पक्का निर्धार करून २०१० पासून त्या 'परिवर्तन संस्थे'शी जोडल्या गेल्या. वनवासींचा विकास हेच ध्येय स्वीकारून त्यांनी मोखाडा तालुक्यातील हिरवे घनवळ, मोरंडा, निळमाती, आसे या वनवासी ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणार्‍या गावात समाजकार्यास प्रारंभ केला.

 

हा वनवासी भाग शिक्षण, आरोग्य, वीज, असा पायाभूत सोईसुविधांबरोबरच रोजगारापासूनही वंचित होता. म्हणूनच, वर्षाताईंनी तरुणांना गावातच रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी ग्रामपंचायत कायदा, माहितीचा अधिकार, मनरेगा, वनहक्क इ. विविध कायदे आणि सरकारी योजना यांची वनवासी बांधवांना माहिती दिली व हाताला रोजगार मिळवून दिला. महिला सक्षमीकरणासाठी गावातील दीड हजार महिलांना एकत्र करून त्यांचे ५० बचतगट तयार केले. वामाज कंपनीच्या माध्यमातून या महिला ब्लाऊज शिवण्याचे काम करू लागल्या. यादरम्यान त्यांनी 'अपनालय' या संस्थेमार्फत कचरावेचकांना संघटित केले.

 

तसेच, काही वर्षांपासून मोखाडा येथील गावात त्यांनी 'परिवर्तन महिला संस्थे'च्या वतीने 'खेळवाडी' नावाची शाळा चालविण्यास सुरुवात केली. त्यातील खेळ व अभ्यासक्रम वनवासींना नजरेसमोर ठेवून आखला गेला त्यासाठी लागणारी साधने व प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी वर्षा परचुरे कार्यरत आहेत. यात अभ्यासाच्या अनुषंगाने खेळांची निवड केली जाते. यात मुलांना आकडेमोड शिकवायची असेल तर दगडांचा वापर केला जातो, तर जमिनीच त्यांची पाटी ठरते. तसेच मुलांना आणि मोठ्या व्यक्तींना मातीत अक्षरे रेखाटून शिकवले जाते.

 

'हमारे गाव में मिलेगा काम, हर काम का मिलेगा सही दाम' असे म्हणत गावकर्‍यांनी 'मनरेगा' योजनेची अंमलबजावणी स्वत:च्या गावात करायला सुरुवात केली. वर्षानुवर्षे गावात वीज नव्हती. वर्षाताईंनी 'रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल'च्या मदतीने गावात सौरऊर्जेवर वीज निर्माण करून पिढ्यान्पिढ्या अंधारात राहणार्‍यांचे जीवन प्रकाशमान केले. पाण्यावाचून त्रासलेल्या गावासाठी याच संस्थेच्या माध्यमातून नळयोजना सुरू केली. अशा या सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून प्रेरणादायी काम करणार्‍या वर्षाताईंना समाजसेवेचा वारसा वडिलांकडून मिळाल्याचे वर्षाताई सांगतात. समाजसेविका ज्योतीताई पाटकर यांना आदर्श मानून त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांचा मानस आहे.

 

वर्षा परचुरे यांनी 'अपनालय' या सामाजिक संस्थेतही 'समाज विकास अधिकारी' म्हणून २००२ साली प्रवेश केला. त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणार्‍या महिलांच्या सबलीकरणासाठी स्वसहाय्यता गट स्थापणे, प्रशिक्षण देणे, कायदे समजावणे अशा विविध गोष्टी केल्या. वर्षा परचुरे संस्थांसाठी विविध प्रकल्प, उपक्रम राबवताना अनुभवसंपन्न होत गेल्या. पुस्तकी ज्ञानाबरोबर कार्यशाळांचा अनुभवही महत्त्वाचा असतो. त्या पुन्हा सहा वर्षांनी २०१० मध्ये 'अपनालय' या संस्थेत साहय्यक संचालक या पदावर रुजू झाल्या. तेथील अडीच-तीन वर्षांच्या काळात संस्थेच्या आरोग्य, विकास, प्रशिक्षण, शिक्षण, आहार, स्त्रियांचे सक्षमीकरण अशा अनेक उपक्रमांची जबाबदारी त्यांच्याकडे होती.

 

हे सर्व करत असतानाच, वर्षाताई 'अपनालय'ला निरोप देऊन 'महिला परिवर्तन संस्थे'सोबत काम करू लागल्या. त्यांनी स्वत:ला त्या कामात अक्षरश: झोकून दिले. त्या तेथे संस्थेच्या तीन प्रमुख उपक्रमांची व्यवस्था पाहतात. त्यानुसार त्यांच्याकडे 'मुक्ता बालिकाश्रम', 'दिलासा' हे वृद्धांसाठीचे केंद्र आणि 'मोखाडा प्रकल्प' या उपक्रमांची जबाबदारी आहे. वर्षाताईंना परचुरे यांना नृत्य व नाटकाची आवड आहे. शिवाय, त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायलाही आवडते. गुजराती, तामिळ आणि जर्मन भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. 'रोटरी क्लब'तर्फे 'रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड'ने २०१५-१६ त्यांचा गौरव करण्यात आला. २०१६ साली 'विद्युल्लता पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

वर्षा परचुरे यांचा कुटुंबात आई-वडील, भाऊ-वहिनी आणि दत्तककन्या शुभ्रा असा छोटासा परिवार. त्यांची आई गृहिणी आहे. बाबा 'ठाणे जनता सहकारी बँके'तून निवृत्त झाले आहेत. ते सध्या 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'चे काम करतात. कुटुंबाच्या प्रेरणेनेच वर्षाताई आज समाजसेवेचे काम अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या समाजकार्याला अनेक शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@