‘ती’ मजेत आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019   
Total Views |



आता ‘ती’ सध्या काय करते?

‘ती’ सध्या शेताच्या बांधावर आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात.. वा...वा!

‘ती’ सध्या मजेत आहे...

 

खरेच ‘ती’ सध्या मजेत आहे. कारण, आपण नकोसे आहोत, आपण मरावे असे आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या जन्मदात्रीलाच वाटते, हे तिला माहिती नाही. त्यामुळे ‘ती’ मजेत आहे. तिला माहिती नाही की मुलगी म्हणून जन्माला येऊन तिने गुन्हा केला. मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष वगैरे वगैरे लिंगभेद तिला अजून कळायचे आहेत. त्या लिंगभेदातून विषमतेच्या नरकयातना देणारे समज-गैरसमज तिला माहिती नाहीत. त्यामुळे ‘ती’ मजेत आहे. सर्वात महत्त्वाचे तर तिचे वय वर्ष एक-दोन तास इतकेच आहे. त्यामुळे जग, दुनियादारी, माणूसपण वगैरे वगैरे काय असते, हे तिला माहितीच नाही. माणसूपण, माया-ममता नातीगोती यांचे संदर्भ तिला माहिती नाहीत की, त्यांच्याकडून तिला काही अपेक्षाही नाहीत म्हणून ‘ती’ मजेत आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील काठापूर शिंगवे गावच्या शेताच्या बांधावर तिला कुणीतरी सोडून गेले. आपण कोण आहोत? इथे का आहोत? याचा इतिहास कदाचित तिला सहजासहजी सापडणारच नाही. पण, भविष्यातही टाकून दिलेली ‘नकोशी’ची आठवण करून द्यायला समाज कमी पडणारच नाही, हे तिला माहिती नाही म्हणूनही ती मजेत आहे. भयाण आहे, पण वास्तव आहे. या नुकत्याच जन्मलेल्या बालिकेला शेताच्या बांधावर मरायला सोडणार्‍या पापी लोकांना काय म्हणावे? शब्दच नाहीत. ‘जाको राखे साईयाँ, मार सके ना कोय’ असे म्हणतात. याचा प्रत्यय या मुलीवरून येतो. पण, तरीही उकिरड्यावर, बांधावर, गटारात, अडचणीच्या जागी फेकण्यात येणार्‍या या नवजात बालिकांचा काय गुन्हा असतो? कुणी सांगेल का? तूर्तास इतकेच समाधान मानायचे का? की तिला कोणा कुत्र्या-लांडग्याने फाडून खाल्ले नाही की बांधावर एकटी असतानाही तिच्यावर कुण्या राक्षसाला लैंगिक अत्याचार करता आला नाही, म्हणून ‘ती’ मजेत आहे. तिच्यासाठी प्रार्थना आहे की, यापुढे तिला आयुष्यात खरोखरच्या माणूसपणाचे भवताल लाभो. आशा आहे, जग खूप चांगले आहे, सुंदर आहे. या चांगल्या जगात या मुलीला उज्ज्वल जीवन लाभो, तिला पाहून सगळ्यांनी म्हणावे, ‘ती’ मजेत आहे!

अर्थ कळेल का?

प्रश्न ‘ती’चा आहे. पण तो तसा ‘ती’चाच नसतो, तर तो सगळ्यांचाच असतो. वर्तमानपत्राच्या प्रत्येक घडीवर गुन्ह्यांची मालिका तिच्याच संदर्भातली असते. काय काय गुन्हे घडतील आणि कशा कशाप्रकारे तिचा बळी जाईल याची गणतीच नाही. पण, या सगळ्यांमध्ये ‘तो’च असतो असेही नाही. तिच्याच सारखी ‘ती’ सुद्धा सामील असते. त्याला विचारा, त्यालाच काय कोणत्याही विनोदी, तिरकस, खुसखुशीत चर्चेत किंवा अगदीच अश्लाघ्य संवादामध्येही त्याची सगळी नकारात्मक मदार तिच्यावरच अवलंबून असते. पण, ‘असे का?’ असे विचारण्याची सोयच नाही. कारण, ‘ती’सुद्धा चूपचाप हे सगळे मान्यच करत आली आहे. विनोदाचा भाग सोडा, तरीही जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये सगळ्या भाषेतून शिव्या फक्त तिच्या अवतीभवतीच आणि तिला अधोरेखित करूनच असतात. ‘आई’ आणि ‘बहीण’ या दोन नात्यांच्या शारीरिकतेवरून लैंगिक अपशब्द वापरले म्हणजे आपण खरे ‘तो’ झालो, असा समजबिमज आहे की काय? माहिती नाही. मात्र, नुकतीच मिसरूडं फुटलेला मुलगाही आपणही पुरुष आहोत, हे दाखविण्यासाठी आणि लहानपण मागे टाकून थोराड झालेलेही आपण मर्द आहोत, हे दाखविण्यासाठी असले शब्द वारंवार वापरत असतात. हे शब्द वापरताना वेळ-काळ-स्थळ याची अजिबात मर्यादा नसते. ‘भ’ची बाराखडी सुरू होते, तीच आई-बहिणीवरून आणि संपतेही आई बहिणीवरच! पण, ते सुरू होणे आणि संपणे यातच तिच्या संदर्भातल्या नकारात्मतेचे बीज आहे. या बिजाचे रोपटे वाढत वाढत हळूहळू स्त्रीवर होणार्‍या अन्यायाचा वटवृक्ष होतो. असो. तिच्या शारीरिक अवयवांची इतकी घृणा किंवा तिरस्कार खरेच त्याला आहे का? नसावीच. नाहीच. कारण, ‘तो’ या ना त्या नात्यातून तिच्यावर खरे प्रेम आणि मनापासूनच स्नेहही करतो. मात्र, तरीही, ‘क्या करू ओ लेडी, मै हूँ आदत से मजबूर’ असेच असते का? त्यामुळेच की काय, प्रत्येकजण आपल्या सोबतच्या आपल्यासारख्याच ‘त्या’ला दाखविण्यासाठी मुद्दाम ‘तिची’ अवहेलना करतात. ‘तिला’ लाज वाटेल असे करतात, असे वाटते. अर्थात ‘तो’ आणि ‘ती’ची कहाणी जगाच्या आधीपासून आहे. मरणाच्या वेणा पार करत ‘ती’ ‘त्याच्या’ जन्माचा सोहळा भोगतेच आहे. ‘तिच्या’वर अत्याचार करणार्‍यांना हा अर्थ कळेल का?


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@