
मुंबई : ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेली माहेरघर योजना खऱ्या अर्थाने दुर्गम भागातील महिलांसाठी नवसंजीवनी ठरली. वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याचे समोर आले आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू आहे.
दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकिरीचे बनते. त्यामुळे प्रसूतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेतून सर्वंकष सेवा दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या आदिवासी, डोंगराळ भागातील ९० आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा सुरू आहे. ठाणे परिमंडळातील पालघर जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांमध्ये योजना सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, नंदूरबार जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांमध्ये तर लातूर परिमंडळातील नांदेड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये ही योजना कार्यरत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat