फेसअ‍ॅप वापरत असाल तर 'सावधान’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019
Total Views |



मुंबई : सोशल मीडियावर कोणता ट्रेंड कधी ट्रेण्डिंगमध्ये येईल याची खात्री नाही. असाच एक ट्रेंड सध्या तुफान व्हायरल होत असून तुम्ही तुमच्या म्हातारपणी कसे दिसाल?, हे दाखवणारे अ‍ॅप जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलही झाले असेल. 'फेसअ‍ॅप' असे या अ‍ॅपचे नाव असून 'वायरलेस लॅब' या रशियन कंपनीने डेव्हलप केले आहे. जर तुम्ही हे अ‍ॅप वापरत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण अल्पावधीतच या अ‍ॅपने 15 कोटी युजर्सचा आकडा गाठला असून या प्रत्येकाचे नाव व चेहर्‍यासोबत युजरची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याची शक्यता फोर्ब्सने व्यक्त केली आहे. फोर्ब्सच्या या शक्यतेने जगभरात एकच खळबळ माजली असून फेसअ‍ॅपचे धाबे दणाणले आहेत.

 

युजरच्या चेहर्‍यावरील भाव आणि वयानुसार दिसणारे रूप बदलण्याचे फीचर या अ‍ॅपमध्ये दिले आहे. आपण पुढे जाऊन कसे दिसू, या उत्सुकतेतून युजर हे अ‍ॅप डाऊनलोड करतो आणि त्या अ‍ॅपला आपल्या फोनचा ताबा देऊन मोकळा होतो. मात्र हे अ‍ॅप तुमच्या जिज्ञासूवृत्तीचे भांडवल करून तुमचा महत्त्वाचा डेटा गोळा करतो आहे. एकदा तुम्ही या अ‍ॅपला तुमचा ताबा दिलात की त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील माहितीवर तुमचा काहीही अधिकार राहत नाही. या अ‍ॅपला तुमच्या माहितीचा ताबा मिळाल्यानंतर तुमच्या माहितीवर हे अ‍ॅप आपला हक्क सांगतो. तुमच्या अपरोक्ष ही माहिती ते दुसर्‍या कोणालाही हस्तांतरित करू शकतात, असे या अ‍ॅपच्या वापराच्या अटीमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, आमच्याकडे माहितीची साठवणूक करण्यासाठी सर्व्हर नसून युजरचा फोटो व इतर माहिती आम्ही ४८ तासांत डिलिट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

 

धक्कादायक म्हणजे, अलीकडच्या काळातील केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका, फेसबुक डेटा चोरी प्रकारानंतरही अशाप्रकाचे अ‍ॅप्स युजर्सला भुरळ घालत असून जगप्रसिद्ध कलाकार, खेळाडूही याला भुलले आहेत. याच आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाखाली येऊन अनेक युजर त्यांचे अनुकरण करत या अ‍ॅपचा वापर करत आहेत. तुमच्या माहितीचा वापर करून तुमचे बँक अकाऊंट व इतर महत्त्वाच्या गोष्टींवर सायबर हल्ला होऊ शकतो. शिवाय तुमच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे तुम्हाला ब्लॅकमेलही केले जाऊ शकते, असे सायबर तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे कोणतेही अ‍ॅप तुमची वैयक्तिक माहिती मागत असेल तर तुमच्या मोबाईलचा अ‍ॅॅक्सेस त्या अ‍ॅपला देताना शंभर वेळा विचार करा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@