झाले मोकळे आकाश...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



प्रतिबंधामुळे दररोज शेकडो प्रवासी आणि व्यापारी उड्डाणांवर विपरित परिणाम करणारे पाकिस्तानी हवाई वाहतूक क्षेत्र आता पुन्हा पहिल्यासारखे विमानांनी गजबजून जाईल. दुसरीकडे पाकिस्तानी प्रतिबंधाचा प्रभाव केवळ भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांवरच झाला असे नाही, तर पाकिस्तानवरही त्याचा विपरित प्रभाव पडला. एका अंदाजानुसार प्रतिबंधांमुळे पाकिस्तानला जवळपास १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६८८ कोटींचे नुकसान झाले.

 

पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने (सीएए) मंगळवारी पाकिस्तानचे हवाई वाहतूक क्षेत्र भारतासाठी तत्काळ खुले करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर पाकिस्तानने आपले हवाई वाहतूक क्षेत्र भारतासाठी प्रतिबंधित केले होते. ‘सीएए’च्या संकेतस्थळावरही यासंबंधीची नोटीस प्रकाशित करण्यात आली आहे. नोटिशीनुसार, हवाई मार्गाने प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई वाहतूक क्षेत्र सर्व प्रकारच्या दळणवळणासाठी मुक्त असल्याचे म्हटले आहे. परिणामी, गेल्या चार महिने, १९ दिवसांपासून बंद असलेल्या पाकिस्तानी हवाई वाहतूक क्षेत्राचा उपयोग आता भारतही करू शकतो.

 

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. पुलवामातील फिदायीन हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान हुतात्मा झाले होते. नंतर भारताने याचाच बदला म्हणून पाकस्थित दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. भारताच्या हल्ल्याने चवताळलेल्या पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला आपली आंतरराष्ट्रीय सीमा आणि हवाई वाहतूक क्षेत्र उल्लंघनाच्या कारणावरून आपले हवाई वाहतूक क्षेत्र संपूर्णपणे बंद केले होते. मार्च महिन्यात पाकिस्तानने आपले हवाई वाहतूक क्षेत्र आंशिक रूपात खुले केले, पण तेव्हाही भारतीय विमानांच्या उड्डाणांना बंदी घातलेली होतीच. पुढे भारतानेही पाकिस्तानला जाणार्‍या उड्डाणांसाठी आपले हवाई वाहतूक क्षेत्र प्रतिबंधित केले.

 

दरम्यान, पाकिस्तानची भौगोलिक स्थिती अशी आहे की, भारताला पाश्चात्त्य देशांत हवाईमार्गे जाण्यासाठी पाकिस्तानवरूनच जावे लागते. तसे न करता दूरचा मार्ग निवडल्यास निश्चित स्थळी जाण्याच्या वेळेत आणि विमानांच्या इंधनातही अतिरिक्त वाढ होते. उत्तर भारतातील विमानतळांवरून पाश्चात्त्य देशांत जाणार्‍या विमानांना गुजरात आणि महाराष्ट्रावरून उड्डाण करत पुढे युरोप, उत्तर अमेरिका वा पश्चिम आशियाई देशांसाठी उजवीकडे वळावे लागत असे. त्यामुळे कित्येक उड्डाणांच्या वेळेत मोठी वाढही झाली. पाकिस्तानी प्रतिबंधामुळे एअर इंडियाला आपल्या अनेक आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांच्या मार्गात बदल करावा लागला. सोबतच भारताला युरोपीय आणि अमेरिकी शहरांना जोडणारी कितीतरी उड्डाणे रद्दही करावी लागली.

 

उत्तर भारतातील दिल्ली, लखनौ, अमृतसर आदी विमानतळांवरील उड्डाणे यामुळे अधिक प्रभावित झाली. शिवाय पाकिस्तानी प्रतिबंधामुळे एअर इंडियाला २ जुलैपर्यंत ४९१ कोटींचे नुकसानही सोसावे लागले. दुसर्‍या बाजूला स्पाइसजेट, इंडिगो आणि गो एअरसारख्या खाजगी विमान कंपन्यांनाही मोठे नुकसान झेलावे लागले. दिल्ली ते शिकागो या एअर इंडियाच्या विमानाला इंधन भरण्यासाठी युरोपात थांबावे लागले. एवढेच नव्हे तर देशांतर्गत सर्वात मोठी विमान कंपनी-इंडिगोलादेखील दिल्ली ते इस्तंबूलसाठी थेट सेवा सुरू करता आली नाही.

 

प्रतिबंधांचा अर्थ

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियमांनुसार हवाई वाहतूक क्षेत्र प्रतिबंधाचे दोन मुख्य उद्देश आहेत - पहिला, विमान आणि त्यातील प्रवाशांची सुरक्षा निश्चित करणे आणि दुसरा, जमिनीवरील जनतेची सुरक्षा. याव्यतिरिक्त दहशतवाद हेही एक महत्त्वाचे कारण आहे. उदाहरणार्थ, ११ सप्टेंबर, २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपले हवाई वाहतूक क्षेत्र सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी प्रतिबंधित केले होते. हवाई वाहतूक क्षेत्रावरील प्रतिबंधाचा निर्णय संबंधित देशाकडूनच घेतला जातो. अशा हवाई वाहतूक क्षेत्राचे नियंत्रण त्या त्या देशाच्या सक्षम अधिकार्‍यांकडून करण्यात येते आणि वैमानिक तथा विमान कंपन्यांना त्या निर्देशांचे पालन करावे लागते. पाकिस्तानचे हवाई वाहतूक क्षेत्र भारतासाठी प्रतिबंधित करण्याचा अर्थ-भारतातून उड्डाण करणारी वा भारतात जाणारी वाणिज्यिक विमाने ना पाकिस्तानच्या हवाई वाहतूक क्षेत्रातून जाऊ शकणार ना तिथल्या कोणत्याही विमानतळावर उतरू शकणार.

 

स्वाभाविकच, पाकिस्तानी हवाई वाहतूक क्षेत्राचा उपयोग करणार्‍या सर्व विमानोड्डाणांना आपल्या मार्गात बदल करावे लागतील. तथापि, भारताने पाकिस्तानने प्रतिबंध हटविण्याची वा हवाई वाहतूक क्षेत्र खुले करण्याची मागणी केली होती. पाकिस्तानचे हवाई वाहतूक सचिव शाहरुख नुसरत यांनी नुकतीच हवाई वाहतुकीवर सिनेटच्या स्थायी समितीला माहिती दिली की, "भारताने पाकिस्तानशी संपर्क साधून हवाई वाहतूक क्षेत्र खुले करण्याची मागणी केली आहे. तर पाकिस्तानने उत्तरादाखल भारताला सीमेनजीकच्या हवाई तळांवरून लढाऊ विमाने हटविण्याची अट ठेवली होती. ही अट भारताने मान्य केली तरच पाकिस्तान आपले हवाई वाहतूक क्षेत्र खुले करेल."

 

दरम्यान, प्रतिबंधामुळे दररोज शेकडो प्रवासी आणि व्यापारी उड्डाणांवर विपरित परिणाम करणारे पाकिस्तानी हवाई वाहतूक क्षेत्र आता पुन्हा पहिल्यासारखे विमानांनी गजबजून जाईल. दुसरीकडे पाकिस्तानी प्रतिबंधाचा प्रभाव केवळ भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांवरच झाला असे नाही, तर पाकिस्तानवरही त्याचा विपरित प्रभाव पडला. एका अंदाजानुसार प्रतिबंधांमुळे पाकिस्तानला जवळपास १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६८८ कोटींचे नुकसान झाले. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाकडे होणारी हवाई वाहतूकही यामुळे बाधित झाली. थाई एअरवेज, एमिरेट्स, कतार एअरवेज, एत्तिहाद, गल्फ एअर, श्रीलंकन एअरलाइन्स, एअर कॅनडा, सिंगापूर एअरलाइन्स आणि ब्रिटिश एअरवेज या कंपन्यांनाही आपली विमान उड्डाणे एकतर रद्द वा पुनर्निर्धारित करावी लागली. सोबतच पाकिस्तानने हवाई वाहतुकीवरील प्रतिबंध हटविण्यामागे आंतरराष्ट्रीय दबावाचेही मोठे योगदान आहे; अन्यथा बिकट आर्थिक स्थितीतून जाणार्‍या पाकिस्तानला व त्याच्या हवाई वाहतूक क्षेत्राला त्यामुळे अधिकच आर्थिक नुकसान होऊ शकले असते.

 

उल्लेखनीय म्हणजे, हवाई वाहतूक उद्योग सातत्याने वाढणार्‍या कार्यान्वयन खर्चामुळे दबावात आहे आणि अशा प्रकारच्या अतिरिक्त बोजामुळे हे क्षेत्र अधिकच दबावाखाली आले असते. आता मात्र, भारत काही मार्गांवरील हवाई सेवा पुन्हा सुरू करू शकेल, विशेषत्वाने मध्य पूर्व आशियाई देश. उदाहरणार्थ, तेल अवीव आणि दिल्लीदरम्यान केवळ एअर इंडियाच सेवा देते. तर ‘अल एल’ ही इस्रायली हवाई वाहतूक कंपनी असून भारत व इस्रायलदरम्यान हवाई सेवा देते. परंतु, तिला मध्य पूर्वेतील अनेक देशांच्या हवाई वाहतूक क्षेत्रातून उड्डाणाला परवानगी दिलेली नाही. परिणामी, ‘अल एल’ची सेवा एअर इंडियाच्या तुलनेत वेळ आणि खर्चाच्या दृष्टीने महागडी ठरू शकते. अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे एअर इंडियाने विशिष्टीकरण प्राप्त केले आहे आणि आता ती पुन्हा एकदा या दिशेने पुढे जाऊ शकते.

(अनुवाद : महेश पुराणिक)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@