इशरत जहाँचं काय चुकलं?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2019   
Total Views |


 


इशरत जहाँ... गुजरातच्या एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली आणि जिच्या नावे मुंब्र्यात एका 'राष्ट्रवादी' नेत्याने रुग्णवाहिका दौडवली, ही ती युवती नव्हे. ही इशरत जहाँ आहे बंगाल भाजपची नेता आणि तिहेरी तलाक प्रकरणातील एक पीडिता. २०१४ साली तिच्या नवर्‍याने दुबईवरून 'तलाक'चा तिहेरी शाब्दिक उच्चार केला आणि इशरतशी आपले नातेसंबंध एकाएकी संपवून टाकले. त्यानंतर तिहेरी तलाक विरोधी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यात याचिकाकर्त्यांपैकी एक असलेली इशरत जहाँ. त्यामुळे सुरुवातीपासूनच धर्माने मुस्लीम, त्यात भाजपची नेता आणि त्यातही 'तिहेरी तलाक'ला केलेल्या विरोधामुळे समाजातील धर्मांधांच्या डोळ्यात तिचे काम खुपत होतेच! त्यातच नुकतेच एका हनुमान चालिसा कार्यक्रमात हिजाब घालून हजेरी लावल्यानंतर इशरत आपल्या हावड्याच्या घरी परतली. पण, बघते तर काय, तिच्या घराबाहेर मुस्लीम धर्मांधांनी एकच गर्दी केली होती. तिच्या हिंदू कार्यक्रमाला हजेरी लावण्याविरुद्धचा आक्रोश त्या झुंडीच्या डोळ्यात अंगार बनून पेटत होता. 'हिंदू धर्मीयांच्या हनुमान चालिसा कार्यक्रमात तू उपस्थितीतच कशी राहू शकते,' यावरून तिला धमकावण्यात आले. घरातून धक्के मारून हाकलवून लावण्याची अरेरावीची भाषा या धर्मांधांच्या झुंडीने केली. इशरतने या भडकलेल्या समुदायाला समजावण्याचाही प्रयत्न करून पाहिला, पण सगळे व्यर्थ. अखेरीस आपल्या मुलाबरोबर एकटीनेच संसार करणार्‍या इशरतने पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तिला पोलीस सुरक्षाही प्रदान करण्यात आली. पण, मुस्लीमधर्मीय इशरतने हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला केवळ हजेरी लावली तर असे काय आभाळ कोसळले? त्यातही त्या कार्यक्रमात ती प्रत्यक्ष सहभागी होती अथवा नाही, तिने स्वत:हून हनुमान चालिसाचे पठण केले का, यासंबंधी स्पष्टता नाही. पण, या देशाची एक स्वतंत्र नागरिक म्हणून इशरतला निश्चितच अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य आहेच की... पण, डोळ्यावर झापडं लावलेल्या धर्मांधांकडून अजून अपेक्षा ती काय म्हणा? पण, या निमित्ताने इशरतच्या धैर्याचे कौतुक करावे, तेवढे कमीच. कारण, अशाप्रकारे 'सेक्युलॅरिझम'ची पोपटपंची करणार्‍यांना इशरतने आपल्या कृतीतून लगावलेली ही सणसणीत चपराक. एकीकडे 'सेक्युलॅरिझम'चे गोडवे गायचे आणि दुसरीकडे अशाच एक मुस्लीम भगिनीनेे हिंदू कार्यक्रमांत हजेरी लावली, म्हणून तिच्यावर बहिष्कारास्त्र उगारायचे, हा दुतोंडीपणा लज्जास्पदच म्हणावा लागेल.

 

आसामी मदरशांमागचे गौड'बंगाल'

 

आसाममध्ये सध्या पूरपरिस्थितीने कहर केला असून मदत आणि पुनर्वसनाचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पण, काही दिवसांपूर्वीच आसाममधून आलेल्या आणखी एका बातमीने अशीच खळबळ उडवून दिली, ज्याची बहुतांश माध्यमांना फारशी दखलही घ्यावीशी वाटली नाही. 'गोरिया मोरिया देसी जटिया परिषद' या आसामच्याच पारंपरिक मुसलमानांच्या संघटनेने आसामच्या मदरशांमधील वाढत्या कट्टरतेविषयी चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर या मदरशांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्याची मागणीही या संस्थेने गृहमंत्रालयाकडे केल्याचे एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सध्या आसाममध्ये 'एनआरसी'च्या मुद्द्यावरून वातावरण आधीच तापलेले असताना कट्टरतावाद पोसणार्‍या मदरशांवरून पुन्हा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. संघटनेच्या दाव्यानुसार, आसामच्या नदीकाठच्या भागांमध्ये अनधिकृत मदरशांची संख्या मोठी असून सरकारदरबारी त्यांची कुठलीही नोंद नाही. इतकेच नाही, तर या मदरशांना प्रामुख्याने स्थलांतरित बांगलादेशी घुसखोर मुसलमानांकडून नियंत्रित केले जाते. त्यासाठी वर्गणीही स्थानिकांकडूनच वसूल केली जाते. या मदरशांमध्ये केवळ सरकारविरोधी तरुणांची माथीच भडकावली जात नाहीत, तर समाजामध्ये तेढ निर्माण होईल, या प्रकारची शिकवणच मुलांना 'इस्लामिक शिक्षणा'च्या नावाखाली दिली जाते. आसाममधील सामाजिक सलोखा, बंधुभाव उद्ध्वस्त करणारे 'इस्लामिक शिक्षण' या मदरशांमधील तरुणांच्या मनात विषपेरणी करत असल्याचा दावाही संघटनेने केला. २०१८ साली आसाममधील मदरसा शिक्षणासंबंधी विधेयकही राज्य सरकारने पारित केले. पण, दुर्देवाने त्याची कसोशीने अंमलबजावणी न झाल्याने कट्टरवादाचे बीजारोपण करणार्‍या मदरशांनी पारंपरिक आसामी मुस्लीमच चिंताग्रस्त आहेत. म्हणजेच, मुसलमानांकडूनच मदरशांसंबंधी हे सत्य उजेडात आल्याने मदरशांमधील शिकवणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे आसाम सरकार तसेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही या संघटनेच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत, अशा मदरशांना सरकारी देखरेखीखाली आणावे, नाही तर टाळे ठोकावे; अन्यथा आसामसारख्या आधीच बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येने ग्रस्त राज्यामध्ये पुनश्च 'पारंपरिक मुस्लीम विरुद्ध स्थलांतरित मुस्लीम' अशी नवी संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@