भारताचा सर्वात मोठा विजय; कुलभूषण जाधवच्या फाशीला स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |


 


द हेग : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) बुधवारी मोठा दिलासा मिळाला. जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. शिवाय त्यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगीही (काउन्सिलर अ‍ॅक्सेस) देण्यात आली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचेही न्यायालयाने मान्य केले. सोबतच पाकिस्तानला शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

 

या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही, तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी न्यायालयाने दिला. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या पूर्णपीठाने भारताच्या बाजूने 15 विरुद्ध 1 अशा मतांनी हा निकाल दिला. द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी निकालाचे वाचन केले. जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर अ‍ॅक्सेसही दिला आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेले आव्हान हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याच अधिकारक्षेत्रात येते, हे आज आयसीजेने स्पष्ट केले. भारताच्या याचिकेला आव्हान देताना पाकिस्तानने केलेले युक्तिवाद आयसीजेने फेटाळून लावले.

 

कुलभूषण जाधव यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना याची माहिती दिली नव्हती. त्यामुळे या खटल्यात व्हिएन्ना कराराचे कलम 36 लागू होते, हे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात सिद्ध केले. भारतीय दूतावासाच्या अधिकार्यांना जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. जाधव यांना कायदेशीर मदतही नाकारण्यात आली होती. जाधव यांच्या अटकेची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तांना 22 दिवसांनंतर दिली. या विलंबाचे कारण पाकिस्तान देऊ शकला नाही. हे सर्व मुद्दे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रभावीपणे मांडले. परिणामी व्हिएन्ना कराराच्या कलम 36 (1) नुसार, जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार पाकिस्तान जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित राहील, असा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिला.

 

पाकचा कांगावा आणि भारताची बाजू

 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांखाली एप्रिल 2017मध्ये 49 वर्षीय कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आयसीजेकडे 8 मे 2017 रोजी धाव घेतली होती. या बाबत सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दहा सदस्यीय घटनापीठाने 18 मे 2017 रोजी जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. कुलभूषण जाधव यांच्याकडून पाकिस्तानने जबरदस्तीने कबुलीजवाब वदवून घेतल्याचे भारताची बाजू मांडताना प्रख्यात विधिज्ञ हरीश साळवे यांनी म्हटले होते. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च 2016मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेतल्याचा कांगावा पाकिस्ताने केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@