सज्जनांचे रक्षक सुजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |



यं रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा।न कि: स दभ्यते जन:॥

 

(सामवेद 185)

 

अन्वयार्थ

 

(हे इन्द्र!) हे ऐश्वर्यशाली परमेश्वरा किंवा राजा! (यम्) ज्या माणसाचे (प्रचेतस:) मोठे ज्ञानी, सत्यज्ञानाने चैतन्यशाली बनलेले महान लोक (वरुण:) सद्गुणांच्या आधारावर व्यक्तींची निवड करणारे सज्जन (मित्र:) स्नेहाने सर्वांचे रक्षण करणारे सुहृज्जन आणि (अर्यमा) योग्य तो न्याय प्रदान करणारे न्यायप्रिय महान लोक (रक्षन्ति) रक्षण करतात, (स:) असा तो (जन:) माणूस (न कि: दभ्यते) कदापिही कोणाकडून ही मारला (दाबला) जाऊ शकत नाही.

 

विवेचन

 

पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून काहीतरी चांगली कामे करू इच्छिणाऱ्या लोकांकरिता हा वरील मंत्र संजीवनी देणारा आहे. ‘देव भल्यांचे रक्षण करतो’ अशी आपल्याकडे लोकोक्ती आहे किंवा ‘देव तारी त्याला कोण मारी?’ ही म्हणदेखील प्रसिद्ध आहे. या म्हणीला प्रमाण म्हणजे हा वरील मंत्राशय! अनेकांना काहीतरी समाजोपयोगी किंवा परोपकारी कार्य करावे, अशी मनापासून इच्छा असते, पण दिवसेंदिवस दूषित होत चाललेले वातावरण पाहून त्याला काहीतरी चांगले काम करावेसे वाटत नाही किंवा तसे करताना त्याला विघ्नकर्त्यांची (वाईटांची) भीती वाटते. अशावेळी वरील मंत्रभाव त्यास नवी ऊर्जा व चैतन्य प्रदान करणारा आहे. पवित्र सत्कर्म करताना दुष्टांकडून किती जरी त्रास झाला किंवा संकटे आली, तर या मंत्रात कथन केलेला प्रेरक आशय नवा उत्साह वाढविणारा ठरेल, यात शंका नाही.

 

मंत्र छोटाच, पण भाव मात्र मोठा! तसा अर्थदेखील साऱ्यांना कळेल व उमजेल असाच! ज्यांचे रक्षण करण्यास समाजातील प्रचेता, वरुण, मित्र आणि अर्यमा हे चार प्रकारचे लोक नेहमीच तत्पर असतात, त्यांना कोणीच मारू शकत नाही. अशांना कुणीही त्रस्त करणार नाही. ते आपली पवित्र कामे करण्यात यशस्वी होतातच! पण, वरील चार सज्जन उगीच कोणाचेही रक्षण करीत नाहीत, त्याकरिता गरज असते ती मनोभावे, शुद्धान्त:करणाने व आत्मीयतेने काहीतरी श्रेष्ठ काम करण्याची! जो नि:स्वार्थ भावनेने दुसऱ्यांसाठी जगतो, समाजाला योग्य ती दिशा देण्याचे व लोकोपकाराचे काम करीत असतो, त्याला सकृतदर्शनी त्रास होतो, संकटांचा त्यावर मारा होतो, अनेक विघ्ने पण येतात, हे खरे आहे. पण, अशांचे रक्षणदेखील होते, त्यांच्या मदतीला समाजातील भले लोक धावून जातात, हेदेखील तितकेच खरे आहे. कारण, याकरिता वरील मंत्र साक्षीभूत पुरावा आहे.

 

आता मंत्रातील चार लोकांविषयी विचार करूया. समाजात वरील चार लोक थोड्याबहुत प्रमाणात आढळतातच. पहिला आहे - ‘प्रचेतस् (प्रचेता)’ म्हणजेच प्रकट ज्ञानाने चेतलेला अर्थातच वैदिक विशुद्ध ज्ञानाच्या आधारे जागा झालेला ‘चैतन्ययुक्त महात्मा!’ यालाच ‘महाविद्वान’, ‘उत्तम ज्ञानी’ असेही म्हणू शकतो. दुसरा आहे - ‘वरुण’ म्हणजे केवळ श्रेष्ठ गुणांची किंमत करून त्यांनाच स्वीकारणारा. अशांकडे मत-संप्रदाय किंवा जातीभेदाचा वा उच्च-नीचतेचा भेद नसतो. असे सुजन अगदीच गुणवंतांची कदर करतात. तिसरा आहे - ‘मित्र’ म्हणजेच जो स्नेहाने प्रत्येकाचे रक्षण करण्यास तत्पर असतो आणि चौथा आहे - ‘अर्यमा’ म्हणजे असा धर्मात्मा, जो की, नि:पक्षवृत्तीने योग्य तो न्याय देणारा न्यायाधीश! अर्थात, असा माणूस जो की, कोणाचीही बाजू न घेता जे सत्य, प्रामाणिक आणि सुवृत्तीचा असेल, अशांची पाठराखण करणारा न्यायदाता!

 

काळ कोणताही असो, त्या-त्या समयी समाजात वरील चारही भल्या लोकांचा वावर असतोच! पण, ते सहजासहजी कोणाचेही रक्षण करीत नाहीत. त्याकरिता आवश्यकता असते, त्यांचा प्रिय होण्याची! त्या-त्या व्यक्तीच्या गुणांप्रमाणे आपले गुण बनवावे लागतात. आपली वागणूकही तशीच ठेवावी लागेल. आपल्या विशुद्ध व पवित्र आचरणाचा प्रभाव निर्माण झाला की, वरील चार प्रकारचे महान लोक पर्वताप्रमाणे पाठीशी उभे राहतात. छातीची ढाल करून ते आपल्या रक्षणास तत्पर असतात. आपले जीवनमान इतके प्रांजळ असावे की, लोकांमध्ये एक प्रकारचा आदर्श उभा राहावा. जगणे एवढे विशाल असावे की, जगासमोर निर्मळ प्रतिमा उभी राहावी.

 

आज आपण व्यर्थच म्हणतो की, ‘चांगल्याची दुनिया कुठे राहिली आहे?’ ‘भल्या माणसांची किंमत कोण करतो?’ ‘सगळीकडे वाईटांचे साम्राज्य वगैरे वगैरे...’ पण आपण कधी चांगले राहण्याचा किंवा तसे वागण्याचा प्रयत्न केला आहे काय? जो-जो जितका चांगला वागेल, तितका त्याचा प्रभाव वाढेल. आपले जीवन सद्गुणांनी ओथंबले की, चांगल्या लोकांची मदत मिळालीच म्हणून समजा! कोणीही असो, आपला असो की परका, जवळचा असो की दूरचा! आपल्या चांगल्या वृत्तीमुळे तो सर्वांचा प्रिय बनतो. त्याच्या मदतीला अनेक जण धावून येतात. ते आपले आशीर्वाद, शुभेच्छा आणि आंतरिक पवित्र भावना नेहमीच चांगल्या लोकांच्या पाठीशी व्यक्त करतात.

 

इतिहासात आपण डोकावून पाहिल्यास अशी असंख्य उदाहरणे पाहावयास मिळतात की, ज्यांनी पवित्र अंत:करणाने मानवीय मूल्यांना धारण केले किंवा सज्जन बनण्याचा प्रयत्न केला, अशांचे रक्षण करण्याकरिता समाजातील वरील चार प्रकारचे लोक मदतीला धावून आले. सद्गुणी सुग्रीवाच्या मदतीला श्रीराम धावून जातात. त्याचवेळी उत्तमगुणसंपन्न अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या बाजूने सुग्रीवासह सारी वानरसेना उभी ठाकते. जटायू, बिभीषण व इतरही रामांना साथ देतात, तर तिकडे महाभारतात धर्ममार्गी पांडवांना विदूर, श्रीकृष्ण व इतकेच काय तर कौरव पक्षातील भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण हे सर्व मनापासून विजयाचा आशीर्वाद देतात. काही असो दिव्यलोक भल्यांच्या पाठीशी असतातच!

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@