दुःशासनाचा वध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |



 

अर्जुनाचे व वृषसेनाचे निकराचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाने एक तीक्ष्ण बाण सोडून वृषसेनाचा वध केला. दु:शासनाच्या पाठोपाठ वृषसेनाचेही कलेवर राधेयाला पाहावे लागले. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारांचा ओघ सुरू झाला.

 

अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, “कृष्णा, मला आता राधेयकडे घेऊन चल. जसा तू माझा सारथी आहेस, तसा शल्य राधेयचा सारथी आहे. तो आणि राधेय दोघेही तेजस्वी आणि उमेदपूर्ण दिसत आहेत. मला लवकर घेऊन चल.” कृष्णाने रथ राधेयकडे वळवला. शल्याने तो रथ आपल्या दिशेने येताना पाहिला. युधिष्ठिराच्या सांगण्यावरून इतके दिवस शल्य राधेयशी उपरोधाने बोलून त्याचा सतत अपमान करत होता. आता मात्र त्याला राधेयचा खूप आदर वाटत होता. कारण, त्याने पाहिले की दुर्योधनासाठी राधेय आपले प्राण पणाला लावून लढत होता. तो राधेयला म्हणाला, “राधेया, आता अर्जुनाचा वध करण्याची तुझी प्रतिज्ञा पूर्ण होण्याची वेळ आली आहे, असे दिसते. कारण तो पाहा, अर्जुन विळीने गवत कापावे तसा आपल्या सैन्याचा संहार करत आपल्याकडेच वेगाने येत आहे. तूच असा एकमेव योद्धा आहेस, जो या जगात अर्जुनाला हरवू शकतोस. या अर्जुनाला आणि कृष्णालाही तू ठार मारू शकतोस, हे मला ठाऊक आहे. तू भीष्म, द्रोण, कृप आणि अश्वत्थामा या सर्वांहून श्रेष्ठ आहेस आणि अशा महान वीरांचे सारथ्य मला करायला मिळाले म्हणून मला तुझा अभिमान वाटतो.”

 

शल्याचे हे बोल ऐकून राधेय कृतज्ञतेने भारावून गेला. त्याचे डोळे पाणावले. तो शल्याला म्हणाला, “तुमची प्रशंसा हाच माझा फार मोठा सन्मान आहे. तुम्ही मला जगातील सर्वात सुखी माणूस केले आहेत. मी तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. मला माहीत आहे, अर्जुन महान योद्धा आहे. तरीही मी आज त्याचा वध करण्याचा प्रयत्न अवश्य करेन. त्वरित मला त्याच्या समोर ने.” परंतु, दुर्योधन राधेयवर लक्ष ठेवून होता. त्याने आपल्या भावांना काही योद्ध्यांसह राधेयच्या मदतीसाठी पाठवले. त्यामुळे लढाईला सार्वत्रिक स्वरूप आले. भीमही आघाडीवर आला. सात्यकीने राधेयपुत्र सुसेन याचा वध केला. राधेयने धृष्टद्युम्नाच्या मुलाला ठार केले. आता पांचाल राजे राधेयवर चालून आले. खरेतर राधेय व अर्जुन या दोघांना एकमेकांशी भिडायचे होते, पण आता ते शक्य नव्हते म्हणून दोघेही नाराज झाले.

 

सार्वजनिक युद्ध सुरू होते. दु:शासन आघाडीवर होता. भीमाने त्याला गाठून द्वंद्वयुद्ध सुरू केले. दोघेही भयंकर संतापलेले होते. ते निकराने एकमेकांशी लढू लागले. भीम म्हणाला, “दु:शासना, तुझे युद्धकौशल्य दाखव. मला खूप दिवसांनी ही नामी संधी चालून आली आहे.” यावर दु:शासनही उद्धटपणे हसून म्हणाले, ‘’तू समोर आलास हे चांगलेच झाले. मला तुझ्याशी लढायचेच होते. ती संधी चालून आली म्हणून मीही खूश आहे!” भीमाने द्युताची आठवण करून दिली. “मला अजून ते दृश्य आठवते. तू तुझ्या या पापी हातांनी द्रौपदीचे केस धरून तिला खेचत दरबारात आणलेस. त्या घटनेपासून मी तुझा व फक्त तुझाच विचार करतो आहे. मला तुझ्या नरडीचा घोट घ्यायचा आहे. तुझे पापी हात उखडून टाकायचे आहेत.” दु:शासन उत्तम धनुर्धारी होता. त्याने भीमाने फेकलेल्या भाल्याचे बाणांनीच दोन तुकडे केले. भीमाच्या धनुष्याचे तुकडे केले. भीम संतापला. त्याने गदा हाती घेऊन एक प्रहार करून दु:शासनाचे घोडे ठार केले. गदेचा दुसरा प्रहार रथावर केला आणि दु:शासन जमिनीवर पडला! जवळ असलेल्या दुर्योधनाकडे पाहून भीमाला अधिक चेव आला आणि तो म्हणाला,“होय, मला हे तुझ्या समक्षच करायचे आहे.” सिंह जसा हत्तीला पकडतो तशी भीमाने दु:शासनाची मान पकडली आणि तो दु:शासनाला म्हणाला, “तुला सर्व आठवते आहे ना, मग तुला माझी प्रतिज्ञा पण आठवत असेल. तुझी छाती फाडून मी तुझे रक्त पिणार आहे. पाहूच आता, कोण मला थांबवतो ते!” भीमाने दु:शासनाला जमिनीवर फेकले. त्याच्या मानेवर पाय ठेवून तो उभा राहिला व त्याचा उजवा हात शरीरापासून उखडून फेकून दिला! “ज्या हाताने या दु:शासनाने द्रौपदीचे केस धरून तिला फरफटत आणले, तोच हा हात मी उखडून टाकलाय! द्रौपदीची प्रतिज्ञा मी आज पूर्ण केली. तिला हा हात उखडलेला पाहायचा होता.” पुढे भीमाने गदेचा प्रहार करून दु:शासनाची छातीच फोडली. मग त्याने आपले ओठ त्याच्या जखमेवर लावून तो दु:शासनाचे रक्त प्यायला. दु:शासन अजून जीवंत होता. भीम त्याचे रक्त पीत होता, हे दृश्य खूप भयानक होते. भीम म्हणाला, “आजवर मी खूप पेयं प्यायलो आहे. परंतु, त्या सर्वांमध्ये हे चवदार पेय आहे.” दु:शासनाच्या रक्ताबरोबर त्याचे प्राणही बाहेर आले. हे दृश्य बघून राधेय हेलावून गेला, पण त्याला शल्याने धीर दिला.

 

इतक्यात राधेयचा पुत्र वृषसेन अर्जुनाच्या समोर आला. अर्जुनाचे व वृषसेनाचे निकराचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाने एक तीक्ष्ण बाण सोडून वृषसेनाचा वध केला. दु:शासनाच्या पाठोपाठ वृषसेनाचेही कलेवर राधेयाला पाहावे लागले. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारांचा ओघ सुरू झाला. परंतु, काही काळातच त्या शोकाची जागा आत्यंतिक क्रोधाने घेतली. त्याने शल्याला सांगितले की, “माझा रथ अर्जुनाच्या रथासमोर घे!” लढायला आरंभ करण्यापूर्वी तो शल्यास म्हणाला, “आज मी जिंकणारच... परंतु, जर मारला गेलो तर तू काय करशील?” शल्य गहिवरून म्हणाला, “तू जिंकणार याची मला खात्री आहे, पण जर तू मारला गेलास, तर कृष्ण व अर्जुन यांचा सूड घेऊन मी दोघांनाही ठार मारीन!” नेमका हाच प्रश्न तिकडे अर्जुनाने कृष्णाला विचारला. कृष्ण म्हणाला, “एक वेळ सूर्य आकाशातून खाली पडेल, पण तू हरणार नाहीस! अग्नी आपली उष्णता सोडेल, पण तू हरणार नाहीस! तू जर राधेयकडून मारला गेलास, तर खात्री बाळग मी माझ्या हातांनी शल्य व राधेय या दोघांना ठार मारेन. मी या जगाचा क्रोधाने नाश करेन. पण असं काही होणारच नाही, याची मला खात्री आहे.” दोन्ही सारथी व दोन्ही योद्धे एकमेकांसमोर आले. दोन्ही योद्ध्यांनी स्मित करून एकमेकांचे स्वागत केले. युद्ध करण्यास ते सिद्ध झाले.

 

(क्रमश:)

 
 
- सुरेश कुळकर्णी 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@