एक होता ‘राजा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019   
Total Views |

 

दि.१६जुलै,२०१९ रोजी विचारवंत, साहित्यिक राजा ढाले यांच्या नावापुढे कालकथित लागले. त्यांच्या जाण्याने मानवी शाश्वत मूल्यांच्या चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. राजा ढाले एक विद्रोही कार्यकर्ता, एक लोकप्रिय नेता, तितक्याच ताकदीचा विचारवंत आणि तितकाच संवेदनशील मनाचा कवी व चित्रकारही. राजा ढालेंचा मृत्यू म्हणजे मानवतेचे गाणे बुद्धिवादातून आणि बुद्धधम्माच्या प्रेरणेतून जगणाऱ्या जातिवंत माणसाचा मृत्यू.
 
 
राजा ढाले यांच्याबाबत अनेक चित्तरकथा प्रसिद्ध आहेत. त्या सर्व कथा घटना मान्य आहेत असे नाही. मात्र, त्या घटनांमधून राजा ढाले नावाच्या बेडर आणि अफलातून आदर्शवादी व्यक्तीची प्रतिमा निखाऱ्यासारखी फुलून आली हे मान्यच आहे. मग तो प्रसंग ‘गोलपिठा’ पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी दुर्गाबाई भागवतांना प्रतिप्रश्न करतानाचा असू दे की, आपल्या आणबाण शान असलेल्या तिरंग्याबद्दल आक्षेपार्ह विधान करतानाचा असू देराजा ढाले हे राजा ढाले होते. त्यांचे स्वत:चे विचार होते आणि ते विचार सिद्धहस्त मांडणारे शब्दही त्यांचेच होते. तसेच आपण काय बोलल्यावर, काय केल्यावर, त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव त्यांना होतीच. त्यामुळेच घडून गेलेल्या घटनांवर माफीनामा मागण्याचा भेदरटपणा त्यांनी कधीही केला नाही. जे केले ते स्वीकारले आणि त्याचे परिणामही स्वीकारणारी ‘असली पँथर’ची वृत्ती त्यांच्यामध्ये होती. मात्र, ‘पँथर’ शब्द लिहितानाही राजा ढालेंचे वेगळेपण चटकन आठवले. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “चळवळ ही ‘पँथर’ची नव्हे तर माणासाची असावी.” ‘दलित पँथर’चे संस्थापक म्हणून त्यांची ओळख असली तरी राजा ढालेंचा ‘दलित’ आणि ‘पँथर’ या दोन्ही शब्दांना विरोध होता. तो विरोध नेहमी त्यांनी व्यक्त केला.
 

दलित, मूळनिवासी, बहुजन अल्पसंख्याक या शब्दांना स्वत:चा असा वेगळा संदर्भ आहे. मात्र, दुर्दैवाने या शब्दांचा, या संदर्भांचा वापरच केला जातो. या वापर करण्याच्या वृत्तीवर राजा ढाले यांनी एका मुलाखतीमध्ये चांगलेच ताशेरे ओढले. ते म्हणाले, “माणसाचे ३० लाख वर्षे पृथ्वीतलावर अस्तित्व आहे. आफ्रिकेतून तो स्वत:च्या दोन पायावर बाहेर पडला. जगभर फिरला. त्याला कुठली आलीय मूळ भूमी? या मुंबईत कोण मूळचा? त्यामुळे ‘मूळनिवासी’ ही संकल्पना ‘मत हवी’ म्हणून काढलेली आहे. ‘मूळनिवासी’ वगैरे काही नसते. कधीतरी मानववंशशास्त्राच्या दृष्टीने विचार करून बघा, म्हणजे कळेल. तसेच ‘बहुजन’ या संकल्पनेचेही आहे. जिथे जाती ‘बहुसंख्य’ आहेत तिथे कुठले आले ‘बहुजन?’ तिथे तर सगळेच ‘अल्पसंख्य.’

 

माणसाचे दु:ख आणि जगणेही ‘अल्पसंख्याक,’ ‘बहुजन,’ ‘मूळनिवासी’ आणि ‘दलित’ या चौकटीत बांधणे त्यांना कधीच आवडले नाही. कारण, त्यांची चळवळ माणसासाठीच होती. त्यामुळे माणसाच्या दु:खाला त्यांनी कोणतेही बंध बांधले नव्हते. माणूस मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा आणि लिंगाचा असू दे. तो माणूस आहे ना बस्सं. त्याच्या माणूसपणाला बांधणाऱ्या कोणत्याही दु:खाला राजा ढाले यांचा विरोध होता. ते दु:ख समूळ नष्ट करण्याची त्यांची भाषा आणि वृत्तीही होती. पण या भाषेला आणि वृत्तीला तर्कसुसंगतेची जोड होती. बुद्धिप्रामाण्य होते. त्यामुळेच सत्यकथेचे म्हणणे पटले नाही, तर ते का पटत नाही, हे सांगताना राजा ढाले यांनी केवळ वाद-विवाद केले नाहीत. ‘सत्यकथे’ची ‘सत्यकथा’ लिहिताना ‘सत्यकथे’चे ३४ वर्षांचे अंक मिळवले, ते वाचले. नुसते ‘वाचले’ नाहीत, तर त्यावर विचारमंथन केले आणि त्यातून मग ‘सत्यकथे’ला विरोध केला. हे केले म्हणून त्यांना कुणी विद्वान म्हणून पुरस्कृत करणार नव्हते की कोणतीही ‘डॉक्टरेट’ मिळणार नव्हती. पण स्वतःची भूमिका निर्दोष असावी आणि स्पष्ट असावी असा त्यांचा निर्धार होता. हा व्यासंग हा निर्धार आज समाजात दिसतो का? खेदाने म्हणावे लागेल नाहीच. याची जाणीव राजा ढाले यांना असावीच म्हणून एकदा बोलता बोलता ते म्हणून गेले होते की, मला ‘लेखक’ बनायचं आहे, म्हणून मी प्रकाशकाचे पाय चेपत बसणार नाही.

 

त्यांचे हे विचार त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचे प्रवर्तकच आहेत. त्यामुळेच ‘दलित पँथर’संदर्भात लिहिताना त्यांनी पाच पानांचे पत्र लिहिले. एका संपादकाला ते छापायचे होते. जे वाटले ते आणि जे आहे ते लिहिणार या भूमिकेतूनच ते लिहिले. त्यात कुणाचीच भीड-तमा बाळगली नव्हती. पण संपादकाने सांगितले, पत्र छान आहे. पण खूप मोठे आहे. कमी केले तर बरे होईल. राजा ढालेंनी ते पत्र परत घेतले. ते संपादकांना लिहून परत दिले. मात्र, आता ते पत्र पाच पानांचे नव्हते, तर चौदा पानांचे होते. या एका घटनेवरून राजा ढालेंचे स्वतंत्र विचार करणारी आणि व्यक्त होणारी वृत्ती प्रकर्षाने जाणवतेनामांतर असू दे की, समाजासाठी होणारे कोणतेही आंदोलन असू दे. राजा ढाले विचारांची आणि कृतीची ढाल घेऊन सदैव पुढे असायचे. त्यात त्यांना कित्येकदा त्रासच व्हायचा, पण त्यांनी माघार घेतली नाही. याबाबत ते मिश्किलपणे म्हणायचे की, माझे नाव ‘ढाले’ आहे, माझे पूर्वज लढाईमध्ये गड-किल्ल्यावर ध्वज घेऊन उभे राहायचे. त्या ध्वजासाठी धारातीर्थी पडायचे. मात्र, तो ध्वज सांभाळायला लगेच दुसरा योद्धा तयार असायचा. मीसुद्धा आंबेडकरी विचारांचा ध्वज हातात घेतलेला योद्धा आहे. याबाबतची त्यांची एक फार सुरुवातीची घटना आहे.

 

एका आंदोलनामध्ये राजा ढाले आणि त्यांच्या मित्रानी ‘वर्षा’ बंगल्यावर आंदोलन करायचे ठरवले. त्यावेळी पोलिसांनी राजा ढालेंना समज दिली. पण तरुण राजा ढालेंनी सांगितले, आम्ही तर जाणारच. पोलिसांनी नाकाबंदी केली. राजा ढाले आणि मित्र डोंगर पार करून आडवाटेने बंगल्यावर गेले. तिथे पोहोचल्यावर राजा ढाले मित्रांना म्हणाले, “तुम्ही इथेच थांबा. मी वर्तमानपत्रवाल्यांना घेऊन येतो.” आडवाटेने डोंगर पार करून ते परत आले. तिथे कुणीही नव्हते. त्यांचे सोबती मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सामोपचाराची चर्चा करण्यात रंगले होते. ही राजा ढाले यांच्या नेतृत्वाची सुरुवात होती. पण ते डगमगले नाहीत. साहित्यातून, कर्तृत्वातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार-प्रचार सुरूच ठेवला. त्यांनी जातीपातीची विषमता तशी अनुभवली नव्हती. मात्र, जातीपाती हे मानवतेचा शत्रूच आहेत. या विचारांवरच त्यांचा लढा कायम होता. ते म्हणत, “उद्या जाती मोडून पडणार आहेत. कुणाला वेळ आहे जाती बघत बसायला. पण त्यासाठी वाट बघत बसायची, घाव घालायचे नाही. हे मात्र बरोबर नाही. आज घाव घातलाच पाहिजे. स्त्रीशोषणाविरुद्धही त्यांचे मत स्पष्ट होते. त्यांनी म्हटले होते की, अन्यायाचे मूळ स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत गेले आहे. ही वृत्ती समूळ छाटली गेली, तरच स्त्रियांसाठी समाजात हा मानवतेचा विचार अंमलात येऊ शकतो. राजा ढाले यांच्या ७८ वा वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांनी त्यांचा अभीष्टचिंतनाचा सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये राजा ढाले यांनी थेट उपस्थितांना प्रश्न विचारला की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त प्रकाश आंबेडकरांचे आहेत का?” असा सवाल यावेळी राजा ढाले यांनी सभागृहाला केला. त्यावेळी सभागृहातून एकमुखाने आवाज आला “नाही.”

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत. भारतातील दलितांचे कसले शोषण होते, हे मार्क्सवाद्यांना कळत नाही. ‘मार्क्सवाद’ केवळ आर्थिक गुलामगिरी विरूद्ध असून जातीव्यवस्थेच्या विरुद्ध नाही. मात्र, केवळ आर्थिक समता असणे म्हणजे समता नाही, हे राजा ढाले म्हणाले. कारण, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला मार्क्सवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन फसवत आहे. समाजातील तरुण ‘मार्क्सवादी’ नाही, तर ‘आंबेडकरवादी’ व्हायला हवा, अशी सम्यक समष्टीची दृष्टी ढालेंकडे होती. त्या ‘सम्यक’ आणि ‘समष्टी’च्या दृष्टीतूनच राजा ढालेंनी प्रचंड आशावाद व्यक्त केला होता की,“समाजाला दिशा देणारे नेतृत्व समाजातून तयार होत आहे.” त्यांचा आशावाद प्रत्यक्षात उतरवणे हीच त्यांच्या स्मृतीला आणि विचारांना श्रद्धांजली आहे...!

 

‘दलित पँथर’चे एक संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले 

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

 

आक्रमक तरुणांची मानसिकता समजून त्यांना धीर देणारे मार्गदर्शक हरपले. राजाभाऊ ढाले आमचे वैचारिक, मानसिक आधारस्तंभ 
 
-भाई जाधव, अध्यक्ष दलित युवा पॅन्थर
 

९५९४९६९६३८

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@