कुराणच्या प्रती वाटण्यास 'तिचा' नकार

    16-Jul-2019
Total Views |

 
 
झारखंड : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी झारखंडमधील न्यायालयाने एका तरुणीला कुराणच्या पाच प्रती वाटण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्यास रिचा भारती या तरुणीने नकार दिला असून न्यायालयाचा हा निर्णय अयोग्य असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मिडियावरही न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी रिचा भारती या तरुणीला रांचीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. कुराणच्या पाच प्रती वाटण्याची अट न्यायालयाने जामीनासाठी ठेवली. मात्र, तरुणीने कुराणच्या प्रती वाटण्यास नकार दिला.
 

आपण कुराणच्या प्रती वाटणार नाही. आज कुराणच्या प्रती वाटायला सांगत आहेत. उद्या इस्लामचा स्वीकार करण्यास सांगतील. त्यामुळे आपण न्यायालयाचे आदेश पाळणार नसल्याचे रिचाने म्हटले. तसेच या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे रीचाने सांगितले. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी रिचाला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते. हिंदुत्त्ववादी संघटनांनी आणि स्थानिकांनी पोलिसांच्या या कारवाईचा विरोध केला होता. त्याविरोधात शनिवारी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनही केले होते. त्यानंतर रिचाला लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. तिला रांचीतील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

  

न्यायमहानगर दंडाधिकारी मनीष सिंह यांनी रिचा भारतीला जामीन मंजूर करत कुराणच्या पाच प्रती वाटण्याचे आदेश दिले होते. त्यातील एक प्रत अंजुमन इस्लामिया कमिटीला तर इतर चार प्रती वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजला वाटण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामिया कमिटीला प्रत द्यावी आणि त्याची पावती न्यायालयात सादर करावी, असे आदेशात म्हटले होते. १५ दिवसात कुराणच्या प्रती वाटल्याची पावती सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तसेच असे न केल्यास तिचा जमीन रद्द करण्यात येईल असेही न्यायालयाने सांगितले. न्यायालयाचे हे आदेश पाळण्यास रिचाने नकार दिला आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat