महाराष्ट्र काँग्रेसचे 'मामा-भाचे'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019
Total Views |



मामा-भाच्याचे नाते हे आपल्याकडील नातेसंबंधात अत्यंत महत्त्वाचे नाते मानले जाते. पुराणात जरी कृष्ण-कंस या मामा-भाच्याचे नाते नकारात्मक असले तरी मुलामध्ये आई-वडिलांनंतर मामाचे सर्वाधिक गुण येतात, हे अनुवंशशास्त्रानुसार सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मामा-भाच्याच्या जोडीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये हा अनोखा योग जुळून आला आहे. आता नव्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे मामा असून तांबे हे थोरात यांचे भाचे आहेत. तांबे हे गेल्या तीन वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आता राज्य काँग्रेसची सूत्रे खऱ्या अर्थाने मामा-भाच्यांकडे आली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मामा-भाचे म्हटले की, सर्वप्रथम आठवतात ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व माजी मंत्री सुधीर जोशी यांची जोडी. या अनोख्या 'शिवसैनिक' मामा-भाचे जोडीचे एक-एक किस्से आजही चर्चिले जातात. या जोडीमध्ये पदे मिळवण्यात मामाने भाच्याला चितपट केले होते. असे म्हटले जाते की, “१९९५ मध्ये ज्यावेळी शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सज्जन व सरळमार्गी शिवसैनिक असलेल्या सुधीर जोशींना मुख्यमंत्री करायचे होते. पण सुधीरभाऊंचे मामा असलेल्या मनोहर जोशी सरांनी विविध क्लृप्त्या करून मुख्यमंत्रिपद पटकावले व भाचा असलेल्या सुधीरभाऊंचाच 'मामा' केला. त्यानंतर सुधीरभाऊंना दुसऱ्या क्रमांकाचे समजले जाणारे महसूल मंत्रीपद दिले गेले, हा भाग वेगळा. अशाप्रकारे 'मामा' मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे 'भाचे' सुधीर जोशी महसूलमंत्री होते. पुढील काळात जोशी सरांनी मुख्यमंत्रीपदानंतर केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी मोठमोठी पदे मिळवली. सुधीरभाऊंचा मात्र एक वर्षानंतर मोठा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राहुरीचे प्रसाद तनपुरे ही अजून एक मामा-भाच्याची जोडी राज्याच्या राजकारणात कार्यरत आहे. गेल्यावेळी प्रसाद तनपुरेंचा भाजपच्या शिवाजी कर्डिले यांनी पराभव केला होता. मात्र, मामाच प्रदेशाध्यक्ष असल्याने तनपुरेंची यावेळचीही विधानसभेची उमेदवारी नक्की मानली जात आहे.

 

नात्यातून 'गोत्यात' येणार?

 

'नात्यागोत्याचे राजकारण' हा महाराष्ट्र काँग्रेसचा आजतागायत 'युएसपी' राहिला आहे. देशातही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. म्हणून तर काही घराण्यांनीच राज्यावर राज्य केले असे म्हटले जाते. बारामतीचे 'पवार', सांगलीचे 'पाटील', सोलापूरातील 'मोहिते-पाटील', नगरचे विखे, काळे, कोल्हे, गडाख, लातूरचे निलंगेकर अशा काही घराण्यांनी नेहमीच राज्याच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये काहींना नात्यागोत्याचा फायदा झाला तर काहींना नात्यांनीच गोत्यात आणले. आता ज्या मामा-भाच्याच्या थोरात-तांबे या जोडीमुळे हा नात्यागोत्याचा विषय ऐरणीवर आला आहे, ते दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. एकाच जिल्ह्यात आणि एकाच कुटुंबात दोन अध्यक्षपदे जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. ज्येष्ठ काँग्रेस नेते भाऊसाहेब थोरात यांचे बाळासाहेब हे पुत्र. थोरात यांचे मोठे नातेगोते अहमदनगर जिल्ह्यात असून सर्वच नातेवाईक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भाऊसाहेबांना एक मुलगा आणि तीन मुली होत्या. त्यांचे पुत्र बाळासाहेब हे १९८५ पासून संगमनेरचे सलगपणे आमदार आहेत. विधानसभेत शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांच्यानंतर तेच ज्येष्ठ आमदार आहेत. पाटबंधारे, कृषी, शिक्षण आणि महसूल या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे. याआधी ते पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून कार्यरत होते. बाळासाहेबांच्या एक बहीण दुर्गा तांबे या सध्या संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत. त्यांचे पती डॉ. सुधीर तांबे हे विधान परिषदेवर आमदार आहेत. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित हे तांबे दांपत्याचेच चिरंजीव आहेत. माजी आमदार दिवंगत राजीव राजळे हे सुद्धा थोरात यांचे भाचे होते. थोरात यांच्या भाचेसून मोनिका राजळे या सध्या भाजपच्या आमदार आहेत. थोरात यांचे दुसरे भाचे राहुल हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. राजीव व राहुल यांचे वडील अप्पासाहेब राजळे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. बाळासाहेब थोरातांच्या तिसऱ्या बहिणीचा अरूण कडू यांच्याशी विवाह झाला. राष्ट्रवादीचे नेते असलेले कडू हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. आता बाळासाहेब थोरात हे या भल्यामोठ्या नात्यागोत्यांच्या भल्यासाठीच आपले पद वापरतात की राज्यभरातील काँग्रेसचा कोसळणारा डोलारा सांभाळतात हे आगामी काळात समजणार आहे.

 

- शाम देऊलकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@