चल, चल रे नौजवाँ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019   
Total Views |

  

 
हरिशचंद्र काळे तसे श्रीमंत घरातले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे त्यांना हमाली करावी लागली. पण, हार न मानता त्यांनी समाजात स्वत:चे आर्थिक आणि सामाजिक स्थान निर्माण केलेे. त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास...

मूळ कोलदरे घोडेगाव पुण्याचे असलेले नामदेव काळे हे मराठा समाजातील कष्टाळू आणि तितकेच दानशूर व्यक्तिमत्त्व.
१९५०च्या दशकात नामदेव काळे यांची सर्वात मोठी रेती कंपनी मुंबईमध्ये होती. जवळ जवळ १४ गाड्या त्यांच्याकडे होत्या. पण, ‘आहे पैसा म्हणून उधळाअसे उधळेपणना नामदेव यांच्याकडे होते, ना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंकडे होते. नामदेव व्यवसायानिमित्त मुंबईत माटुंग्याला राहायचे, तर लक्ष्मीबाई घोडेगावला घरच्या शेतीभातीकडे लक्ष देत. या दाम्पत्याला एकूण १८ मुले झाली. त्यापैकी चार मुले जगली. त्यापैकी एक मुलगा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र स्वभावाने मिश्किल, मात्र वृत्तीने हरहुन्नरी. मुलांवर आपण श्रीमंत आहोत, आपण कष्ट का करायचे, असे संस्कार नव्हतेच. उलट त्या काळात घरात दोन-दोन गाड्या असतानाही आपली आई इतर शेतकरी महिलांसारखी शेतीभाती करते, हेच हरीशचंद्र यांनी पाहिलेले.

 

हरीशचंद्र यांच्या गावात शाळा नव्हती. दुसर्‍या गावात शिकण्यासाठी जाणे भाग होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी काका आणि काकूकडे माटुंग्याला पाठवण्यात आले. लहान वयात शिक्षणासाठी घर सुटले, पण आई-वडिलांच्या इच्छेला पर्याय नव्हता. वडील मुंबईला होते. तेही सकाळी कामावर जायचे ते रात्री घरी यायचे. वडील हरिश्चंद्रला एक आणा खर्च करण्याकरिता देत. परंतु, मुंबईचे जग, नवे मित्र त्यामुळे एका आण्यात भागायचेनाही. त्यातूनच मग मित्रांच्या संगतीने हरीशचंद्र लिंबू विकू लागले. एका आण्याला दोन लिंबं, एका आण्याला दोन लिंबं,’ असे म्हणत ते माटुंगा बाजारात लिंबं विकायचे.

 
एक दिवस असेच लिंबं विकण्यात तल्लीन असताना कुणीतरी त्यांच्या कानाखाली मारले. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्यांची आई होती. आई मुंबईला आली होती. ती रागारागाने म्हणत होती, “घरी लक्ष्मी पाणी भरते आणि तू लिंबू विकतोस. हे करायला मुंबईत आलास?” तेव्हापासून हरीशचंद्र यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. मात्र, आपण कधीही नोकरी करायची नाही, हेही त्यांनी ठरवले. तोपर्यंत दिवस तसे चांगलेच होते. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर हरीशचंद्र गावी आले. शेती करू लागले. कष्ट जास्त आणि नफा शून्यया परिस्थितीत शेतीव्यवसाय करू नये, असे त्यांना वाटले. मुंबईला जाऊन दुसरा काहीतरी व्यवसाय करावा असे त्यांनी ठरवले. परंतु, व्यवसाय करण्यास पैसे नव्हते. त्यावेळी त्यांच्या शेतात काम करणार्‍या भीमाबाई आणि भामाबाई या दोन महिलांनी आपल्या कोंबड्या विकून त्यांना पैसे दिले.

 
हरीशचंद्र पुन्हा मुंबईला आले. पण, मुंबईत वडिलांच्या व्यवसायाची परिस्थिती बदलत होती. नामदेव यांनी अत्यंत कष्टाने नावारूपाला आणलेला व्यवसाय अचानक तोट्यात जाऊ लागला. नामदेव यांच्यासोबत काम करणार्‍या दोघांनी संगनमत केले आणि व्यवसाय होत्याचा नव्हता झाला. हा नामदेव यांना जबरदस्त धक्का होता. ते आयुष्यात सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. आपला व्यवसाय डोळ्यांसमोर बसताना पाहून ते पूर्णपणे खचले. त्यातच भावबंदकी नको म्हणून नामदेव यांना माटुंग्याचा फ्लॅट भावाला द्यावा लागला आणि ते स्वत: डोंगरीला आले.

 
हा सगळा बदल नुकत्याच वयात आलेल्या हरीशचंद्र यांनाही पुरता हलवून गेला. पण, रडत बसण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जावे म्हणून हरिश्चंद्र यांनीही छोटा-मोठा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजचे होते. त्यांनी कोथिंबीर, कच्चा मसाला विकण्यास सुरुवात केली. पुढे उषा कंपनीमध्ये हमाल म्हणून काम करू लागले. अतिशय सचोटीने आणि जराही आळस न करता ते तिथे काम करत. तिथे पालेकर नावाचे ऑफिसर होते. त्यांनी हरीशचंद्र यांचा प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा हेरला. हरिश्चंद्र म्हणतात, “ब्राह्मण माणूस होता तो, पण त्याने मला मोठ्या भावासारखा आधार दिला. मला आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दाखवला.

खरेच होते ते. पालेकर यांनी हरीशचंद्र यांना सुचवले की, कंपनीला माल उचलण्यासाठी, वाहतुकीसाठी गाड्या लागतात. तूच हे काम कर. पुढे या कंपनीत कंत्राटी तत्त्वावर हमाल असलेले हरिश्चंद्र यांनी प्रदीप ट्रान्सपोर्टनावाची कंपनी सुरू केली. हरीशचंद्र यांची कष्टाशिवाय एकहीरुपया घ्यायचा नाही वा द्यायचा नाही, ही वृत्ती व्यवसायिक वर्तुळामध्ये प्रसिद्ध होती. तो काळ ६९८०च्या दशकाचा. त्याच काळात पुण्याहून मराठा समाजातील खूप युवक मुंबईला येत. पण, फार थोड्यांनाच मार्ग मिळे. व्यवसायानिमित्त मुंबईत फिरताना हरिश्चंद्र हे पाहत असत.

 
त्यांनी सगळ्या गाववाल्यांनी एकत्र यावे म्हणून मुंबईमध्ये जुन्नर आंबेगाव विकास मंचही संस्था स्थापन केली. संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी समाजासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यातही समाजातल्या तरुण मुलांना ते मार्गदर्शन करू लागले की, ‘आपली ओळख स्वत: निर्माण करा. त्यासाठी कष्ट करा. कष्टाला आणि प्रामाणिकतेला पर्याय नाही.आज पुण्या-मुंबईतील मराठा समाजामध्ये हरीशचंद्र काळे यांना मामाम्हणून ओळखतात. इतके त्यांचे या समाजाशी ऋणानुबंध जोडलेले आहेत. समाजातील तरुणांनी उद्योग-व्यवसाय करावा, स्वत:सोबत समाजाचे आणि देशाचेही भले करावे, अशी जागृती ते समाजात करत असतात. हरीशचंद्र म्हणतात, “समाज खूप चांगला आहे. एकोप्याने राहून एकमेकांना मदत करायला हवी, तसेच निराश न होता माणसाने नेहमी पुढे जात राहावे.” ‘रूकना तेरा काम नही। चल, चल रे नौजवाँ...!हे ७५ वर्षीय हरीशचंद्र सांगत होते.

९५९४९६९६८

 
 
  माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@