चिनी अर्थव्यवस्था ढासळली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019   
Total Views |



२२ जानेवारी २०१८ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सोलार पॅनेलवर ३० टक्के कर लावण्याची घोषणा केली. त्याच दिवशी ट्रम्प यांनी, चीनमध्ये तयार होणाऱ्या कपडे धुण्याच्या यंत्रांवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली.

 

अमेरिका आणि चीन या जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्ध हा संवेदनशील विषय बनला आहे. या दोन देशांच्या व्यापारयुद्धामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसत असली तरी जगातील छोटी अर्थव्यवस्था असणारे देश व मोठमोठ्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसतो आहे. आता असाच फटका जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला बसला असून चीनच्या आर्थिक विकासदरात (जीडीपी) ऐतिहासिक घट झाल्याचे उघड झाले आहे. चीनच्या सांख्यिकी विभागाने (एनबीएस) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर ६.२ टक्के इतका राहिला आहे. मागील २७ वर्षांतील हा निचांक मनाला जातो. यापूर्वी १९९२ मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर ६.४ नोंदवला गेला होता.

 

अमेरिकेत आयात शुल्क अधिक असल्याने चीनच्या निर्यातीत घट झाली. देशांतर्गत मागणी घटल्याने आयातीमध्येही घट झाली असून गृहनिर्माण बांधकाम आणि देशांतर्गत गुंतवणुकीचा टक्का घसरल्याने त्याचा एकूण परिणाम चीनच्या जीडीपीवर झाला असल्याचे 'एनबीएस'ने सांगितले. चीनच्या अर्थव्यवस्थेवर बोलायचे झाल्यास परदेशी चलनमूल्य भक्कम असलेला चीन हा जगातील सर्वात मोठा देश असून या देशाकडे ३.१२ ट्रिलियन परदेशी चलन आहे. जीडीपीच्या आकारमानानुसार चीन हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. याशिवाय परकीय थेट गुंतवणुकीच्या बाबतीत चीन हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. अशा या महाकाय अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या आर्थिक विकासदरामध्ये झालेली घट नक्कीच चिंताजनक असून विशेष म्हणजे २००९ साली जागतिक मंदीच्या काळातदेखील चीनच्या आर्थिक विकासदरात घट झाली नव्हती. जागतिक मंदीच्या काळात चीनचा आर्थिक विकासदर ६.४ राहिला होता. त्यामुळे चीनच्या आर्थिक दरातील घट ही चिंतेची बाब असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'एनबीएस'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि चीनमधील हे व्यापार युद्ध असेच चालू राहिले तर जगावर मंदीचे सावट उद्भवण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिवाय चीनच्या निर्यातीसह आयातीमधील घट व एप्रिल-जून या तिमाहीतील चीनच्या अशक्त आर्थिक वृद्धीचा परिणाम उर्वरित आशियावरही होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

२२ जानेवारी २०१८ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सोलार पॅनेलवर ३० टक्के कर लावण्याची घोषणा केली. त्याच दिवशी ट्रम्प यांनी, चीनमध्ये तयार होणाऱ्या कपडे धुण्याच्या यंत्रांवर २० टक्के कर लावण्याची घोषणा केली. त्यानंतर मार्च महिन्यात ट्रम्प यांनी चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या पोलादावर २५ टक्के, तर अ‍ॅल्युमिनियमवर १० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमुळे ट्रम्प प्रशासनाने तब्बल १३०० चिनी वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या ५२५ अब्ज डॉलरच्या मालावरील आयातशुल्क १० टक्क्यांवरून वाढून २५ टक्क्यांवर जाऊन पोहोचेल. अमेरिकेच्या या कारवाईला चीननेही प्रत्युत्तर देत १२८ अमेरिकन वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला. चीनच्या या प्रतिकाराचा अमेरिकेवर चीनने अपेक्षा केल्याप्रमाणे एवढा फरक पडला नाही. कारण, अमेरिकेतून चीनकडे निर्यात होणाऱ्या वस्तूंचा ओघ फार कमी असून त्या तुलनेत चीनची अमेरिकेत निर्यात फार मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच या व्यापारयुद्धाचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे सांगितले जात होते आणि सरतेशेवटी या व्यापारयुद्धामध्ये चीनलाही फटका बसला आहे. त्यामुळे आता चीनचे धाबे दणाणले असून कुरापती चीन व्यापारयुद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर लोटांगण घातल्याचे दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@