संघकामातील 'भास्कर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2019   
Total Views |



'भास्करा'संबंधी म्हटले जाते की, उगवतानादेखील तो सृष्टी प्रसन्न करणाऱ्या रंगछटा घेऊन येतो आणि जातानादेखील त्याच रंगछटा तो देऊन जातो. जाताना भास्करराव असे जीवन समृद्ध करणारे रंग देऊन गेले आहेत. त्यांच्या रंगात रंगून जाणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल!


भास्करराव मुंडले यांचे जाणे तसे अकाली होते, असे काही म्हणता येणार नाही. सात वर्षांपूर्वी त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम जोगेश्वरीच्या अस्मिता विद्यालयात झाला होता. मृत्युसमयी त्यांचे वय होते. मधुमेहाने शरीरात दीर्घकाळ वास्तव्य केले होते. त्याचा प्रभाव अधूनमधून तो दाखवत होता. परंतु, भास्कररावांच्या मनावर त्याचा प्रभाव शून्य होता. शरीरधर्माप्रमाणे भास्करराव वयोवृद्ध झाले. परंतु, मनाने ते कधीही 'म्हातारे' झालेले नव्हते. चिरतारुण्याचे वरदानच ते घेऊन आले होते. त्यांचे जीवन म्हणजे ध्येयासक्त जीवनाचा महान आदर्श होता. संघात आम्ही अनेक वेळा एक गीत गातो,

 

दिव्य ध्येय की ओर तपस्वीजीवनभर अविचल चलता है॥

सज धज कर आये आकर्षण,पग पग पर झुमते प्रलोभन

होकर सबसे विमुख बटोही,पथ पर सम्भल बढता है॥

अमरतत्त्व की अमिट साधना,प्राणों में उतसर्ग कामना

जीवन का शाश्वत व्रत लेकर,साधक हंस कण कण गलता है।

 

हे गीत भास्कराव मुंडले यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडणारे आहे. ते संघात अंधेरीच्या शाखेत आले. ज्या कालखंडात त्यांचा संघप्रवेश झाला, तो कालखंड सत्तेने संघाला 'अस्पृश्य' ठरवून टाकण्याचा कालखंड होता. त्या वेळेला संघात जाणे म्हणजे नोकरी मिळविण्यात अडचणी निर्माण करणे, जीवनाच्या प्रगतीच्या वाटा अडथळ्याच्या करणे, विरोधकांचे रोज शिव्याशाप खाणे, अशी परिस्थिती होती. भास्कररावदेखील या सर्व दिव्यातून गेले आहेत. परंतु, त्यांची ध्येयासक्ती कशानेही कमी झाली नाही. संघकामाच्या एक एक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येत गेल्या. ते मुंबई महानगराचे सहकार्यवाह झाले. तेव्हा कार्यवाह होते मनोहरपंत मुजुमदार. ते मुंबईतील मुख्य शाखेचे स्वयंसेवक आणि कार्यवाह होते. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना फारसा प्रवास करणे जमत नसे. संघरचनेत कार्यवाहाला पायाला भिंगरी बांधून फिरावे लागते. तशीही मुंबई महानगरी अफाट आहे. तेव्हा कुलाब्यापासून दहिसरपर्यंत आणि इकडे मुलुंडपर्यंत मुंबईचा विस्तार होता. भास्करराव जोगेश्वरीला सारस्वत कॉलनीत राहायला आले. जोगेश्वरी स्थानकापासून त्यांचे घर जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर होते. भाग कार्यवाह असताना आणि महानगरचे सहकार्यवाह असताना भास्कररावांनी मुंबईचा जो प्रवास केला आहे, तो आजच्या भाषेत सांगायचा तर 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स्'मध्ये नोंदवावा लागेल. महानगरपालिकेत पाणी खात्यात त्यांना नोकरी लागली. नोकरीवरून सुटल्यानंतर संध्याकाळी ५.३० पासून ते रात्री १२ पर्यंत त्यांचा प्रवास चालू असे. संघकाम म्हणजे शाखा कार्य आणि शाखा म्हणजे जनसंपर्क. मुंबई महानगरात तेव्हा लागणाऱ्या जवळजवळ २००-२२५ शाखांतून भास्कररावांचा एकदा तरी प्रवास झाला असेल. हे लिहायला आणि वाचायलादेखील फार सोपे वाटते.

 

शाखा जवळ जवळ लागत नाहीत. अंधेरीचाच विचार केला, तर पोलीस मैदानावर एक शाखा लागत असे. दुसरी शाखा मालपा डोंगरीला लागत असे, जी अंधेरी स्थानकापासून दोन-अडीच किलोमीटर आत आहे. तिसरी शाखा जे. बी. नगरला लागत असे. तीही शाखा अशीच दोन-तीन किलोमीटर दूर आहे. या शाखांचे प्रवास मी भास्कररावांबरोबर केले आहेत. भास्करराव सायकल वापरत नसत. कार्यकर्त्याला स्कूटर घेऊन देण्याची तेव्हा संघाची ऐपत नव्हती. भास्कररावांचा सर्व प्रवास पायी होत असे. ७० च्या दशकात गिरणगाव, परळ, गिरगाव येथून कार्यकर्ते उपनगरात स्थलांतरित होत होते. कुणी बोरिवलीला राहायला जाई, कुणी मुलुंडला येई, कुणी अंधेरीला येई. भास्कररावांकडे या सर्वांची नोंद असे. एकदा ते माझ्या शाखेत आले आणि मला म्हणाले, "रमेश, जे. बी. नगरला पोतनीस नावाचे आपले स्वयंसेवक आले आहेत. त्यांना भेटून यायचे आहे, तू चल माझ्या बरोबर." आम्ही दोघेही चालत चालत पोतनीसांच्या घरी पोहोचलो. भास्करराव त्यांच्या घरी आल्याचा आनंद झालाच, तसेच मी संघाच्या सूचित आहे याचादेखील त्यांना खूप आनंद झाला. असे किती कार्यकर्ते भास्कररावांनी जोडून ठेवले असतील, याची गणती करता येणे अवघड आहे. हासुद्धा एक विक्रमच आहे. माझे आणि त्यांचे संबंध फार घरगुती होते. अंधेरीच्या पोलीस मैदानावरील शाखा अनेक वेळा मी आणि अनिल भागवत नावाचा माझा स्वयंसेवक मित्र लावत असू. आम्ही दोघेही तेव्हा बालवयाचे होतो. भास्करराव कधीकधी शाखेत येत. आम्हा दोघांचे कौतुक करीत. कोसळणाऱ्या पावसातही आम्ही शाखा लावत असू. भास्करराव तेव्हा गंमतीने म्हणत, "रमेश या शाखेचा कार्यवाह आहे आणि अनिल मुख्य शिक्षक." बालवयात कुणी मुख्य शिक्षक आणि कार्यवाह होत नाही. त्याच्या जबाबदारीचे अर्थही समजत नाहीत. योगायोग असा की, आणीबाणीनंतर भास्कररावांनंतर मीच मुंबईचा सहकार्यवाह झालो. भास्कररावांची भविष्यवाणी अशा अर्थाने खरी झाली. संघकामाच्या किती बैठका मी भास्कररावांबरोबर केल्या असतील, याचा हिशोब सांगणे अवघड आहे. महानगरातील संघकामाचे संचालन करण्यासाठी जसा निरंतर प्रवास करावा लागतो, तशा निरंतर बैठका घ्याव्या लागतात. संघाच्या दैनंदिन कामाच्या संदर्भातील बैठका अतिशय कंटाळवाण्या असतात. कार्यकर्त्याच्या सहनशीलता ताणणाऱ्या असतात. ज्याला संघाची काहीही माहिती नाही, असा बाहेरचा कुणीही या बैठकांत अर्धा तासही बसू शकणार नाही. परंतु, संघ कार्यपद्धतीचे असे एक अजब वैशिष्ट्य आहे की, अशा कंटाळवाण्या बैठका अपेक्षित कार्यकर्ते कधीही चुकवत नाहीत. ते वेळेवर येतात आणि तीन-चार तास बैठकीत बसून राहतात. भास्करराव अशा बैठका तासन्तास घेत. त्यात हास्यविनोद अभावाने होई. वातावरण गंभीर राही. बैठका कमी करा, अशी कार्यकर्त्यांची ओरड राही. त्यात मीदेखील एक असे. त्यानंतर जेव्हा मी सहकार्यवाह झालो आणि बैठका घेऊ लागलो, तेव्हा भास्करावांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मला जावे लागले. संघकामाचा आत्मा कार्याच्या सातत्यात आहे. हे सातत्य राखण्यासाठी संघकामाची जबाबदारी सर्वस्व ओतून पार पाडावी लागते. प्रवास, बैठका या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहेत. अजिबात न थकता हे काम सातत्याने करत राहावे लागते. भास्कररावांनी कुठली बैठक चुकवली, एखाद्या वर्गात ते आले नाहीत, मुंबईच्या शिबिरात भास्कराव नाहीत असे कधी घडले नाही. सर्व ठिकाणी भास्करराव असत.

 

आणीबाणीनंतर त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी आली. संघाचे काम वेगळे, ते शाखाकेंद्रित आहे. विश्व हिंदू परिषदेचे काम वेगळे, ते प्रकल्पकेंद्रित आणि प्रश्नकेंद्रित आहे. उदा. रामजन्मभूमी मुक्तीचा विषय हा विश्व हिंदू परिषदेचा विषय आहे. संघकामात हयात गेल्यानंतर सर्वस्वी वेगळ्या क्षेत्राची जबाबदारी पार पाडणे तसे सोपे काम नाही. पण बघता बघता भास्करराव विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय अधिकारीदेखील झाले. त्यांच्या प्रवासाचे क्षेत्र वाढले. नवीन विषय सुरू झाले. वयपरत्वे विश्व हिंदू परिषदेच्या कामातून ते मुक्त झाले. संघकार्यकर्ता जबाबदारीतून मोकळा होतो, संघातून मोकळा होऊ शकत नाही. संघ त्याचा श्वास असतो. भास्करराव नंतर मुलीकडे घोडबंदरला राहायला आले. पूर्वी त्यांचा संपर्क पायी चालून होई, आता फोनद्वारे होऊ लागला. 'साप्ताहिक विवेक' आणि दै. 'मुंबई तरुण भारत'चे ते नियमित वाचक होते. लेख आवडला की ते लेखकाला/लेखिकेला फोन करून अभिनंदन करीत. मी तर त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेला. माझे अभिनंदन करताना त्यांना विशेष आनंद होई आणि त्यांच्या शाबासकीची थाप पाठीवर पडली की, मलाही लेखनाचे आणखी बळ प्राप्त होई. ते विवाहित होते. घरी आई, लहान भाऊ आणि मामा असत. लहान भावाला सातत्याने फीट्स येत. त्यामुळे त्याचे बाहेर जाणे फारसे होत नसे. माझे जेव्हा भास्करावांच्या घरी जाणे-येणे सुरू झाले, तेव्हा वृद्ध आई आणि वृद्ध मामा यांचे दर्शन मला होई. भास्कररावांना तीन मुली होत्या. संघकामाचे सातत्य, सतत प्रवास, बैठका, वर्ग, शिबिरे या सर्वात नोकरीची सर्व रजा संपून जात असे. मुलांसाठी, पत्नीसाठी भास्कररावांनी कसा वेळ काढला असेल, त्यासाठी काय कसरत करावी लागते, याचा अनुभव मी नंतर सहकार्यवाह झाल्यानंतर घेतला. कालौघात भास्कररावांच्या पत्नीचे निधन झाले. मुलींची लग्ने झाली, त्या आपापल्या घरी गेल्या. पत्नीच्या निधनानंतर मी भास्कररावांच्या घरी गेलो होतो, अमोलदेखील माझ्याबरोबर होता. आयुष्यात प्रथमच भास्कररावांना खूप भावुक झालेले पाहिले. ते म्हणाले, "कोणत्या अपेक्षा घेऊन तिने माझ्याशी लग्न केले असेल, मी सांगू शकत नाही. परंतु, इतक्या वर्षांत तिने कधीही संघकामात आडकाठी निर्माण केली नाही." तेव्हा मला नेहमी ऐकणाऱ्या एका वाक्याची अनुभूती घेता आली, 'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.' असे भास्करराव 'भास्करा'प्रमाणे जगून जे कुणी त्यांच्या सहवासात आले त्यांना प्रकाश दाखवून, जीवन कृतार्थ करून अस्ताला गेले आहेत. 'भास्करा'संबंधी म्हटले जाते की, उगवतानादेखील तो सृष्टी प्रसन्न करणाऱ्या रंगछटा घेऊन येतो आणि जातानादेखील त्याच रंगछटा तो देऊन जातो. जाताना भास्करराव असे जीवन समृद्ध करणारे रंग देऊन गेले आहेत. त्यांच्या रंगात रंगून जाणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@