माझे गुरू: माझ्या यशाचे शिल्पकार!

    16-Jul-2019
Total Views |



नाशिकचे प्रख्यात सांधेरोपणतज्ज्ञ व दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया करणारे शल्यविशारद डॉ. सागर केळकर यांनी त्यांच्या वैद्यकीय यशामागे मोलाची भूमिका निभावणार्‍या गुरुंविषयी व्यक्त केलेले हे मनोगत...

 

दि. ६ नोव्हेंबर, १९८८. संध्याकाळची वेळ. स्थळ, गणोरकर हॉस्पिटल, नाशिक. दिवस, धनत्रयोदशीचा. फटाक्यांचा आवाज. त्या दिवशी मी माझ्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि पहिल्या गुरूला भेटलो, ते म्हणजे माझे वडील डॉ. भरत केळकर. माझे वडील मला सांगतात, जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा हातात घेतले, त्या क्षणापासून आमच्या दोघांच्या नजरेत आणि मनात एक गुरू-शिष्य या नात्याचा सन्मान जपणारा भाव होता. वैद्यकीय क्षेत्र हे माझ्या वडिलांचे प्राथमिक कार्यक्षेत्र. ते अस्थिरोगतज्ज्ञ असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत.


आता वयवर्ष ६२ गाठूनसुद्धा त्यांचा उत्साह हा २६ वर्षांच्या युवकासारखा अगदी सळसळता आहे. ते मूळचे नाशिकचे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गोव्यात आणि पुढील उच्च शिक्षण मुंबईमध्ये के.ई.एम रुग्णालयात झाले.
सुरुवातीपासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत अभ्यासू व चिकाटीचा. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत असत. त्यांनी अस्थिरोगया विषयात त्यांच्या याच गुणांमुळे विद्वत्ता प्राप्त केली.


घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असल्याने व घरी कोणीही वैद्यकीय पेशात नसल्याने पुढची वाटचाल अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करत
, त्यांनी नाशिकमध्ये स्वतःचे हॉस्पिटल उत्तमरित्या उभे केले आणि ते आजही रुग्णांना उत्तम सेवा देत आहेत. देवापेक्षा कर्माला जास्त मानणार्‍या माझ्या वडिलांनी आपल्या कार्याला कायमच प्राथमिकता दिली. त्यामुळे त्यांच्या उपचाराने बर्‍या झालेल्या रुग्णांच्या आशीर्वादाने त्यांनी जीवनाचे उच्च स्तर गाठले आहे.


नकळत वेळोवेळी माझ्या वडिलांनी गुरुचे स्थान घेऊन प्रत्येक परिस्थितीत मला योग्य मार्गदर्शन केले. एक प्रसंग जो मला नेहमी आठवतो. मी जेव्हा दहावीत होतो
, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांची (रनिंग) धावती प्रॅक्टिस सोडून त्यांचा संध्याकाळचा वेळ मला देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस मला तो दबाव वाटायचा आणि तेव्हा मला त्याचे महत्त्व समजले नाही. ते मला नेहमी म्हणायचे की, “मी येथे तुझ्यावर दबाव टाकण्यासाठी नाहीय, पण माझ्या मुलाच्या मदतीसाठी उपस्थित आहे.


आता जेव्हा मी स्वतः वडील झालो आहे आणि वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आहे
, तेव्हा हा निर्णय घेणे त्यांना किती कठीण गेले असावे, याची मला जाणीव होते आणि त्याचे कुतूहलदेखील वाटते. एक गुरुमंत्र जो माझा वडिलांनी सांगितला तो म्हणजे, “समाजात दातृत्व असे करावे की, ते एका हाताचे दुसर्‍या हाताला समजू नये आणि यामागे आपण समाजाचे देणे लागतो, हा भाव मनी कायम वसू द्यावा.


त्यांच्या समाजकार्य व वैद्यकीय कार्यामुळे वेगवेगळ्या वयोगटातील व व्यवसायातील मंडळी त्यांची शिष्य झाली आहेत व त्यांना आपल्या गुरूस्थानी मानतात. 
त्यांचे रुग्ण मला नेहमी सांगतात की, “सरांशी बोलूनच आम्हाला अर्धे बरे वाटते.ही निर्मळता प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टरने अंगी बाणवावी, हा त्यांच्यातील मोठा गुण आहे, असे मला वाटते.


एक माणूस म्हणून
, एक डॉक्टर म्हणून, एक गुरू म्हणून व एक वडील म्हणून मी त्यांच्या एक चतुर्थांश भाग जरी घेऊ शकलो, तरी मी स्वतःला भाग्यवान व यशस्वी समजेन. आमच्या परिवारात या माझ्या गुरूंना सगळ्यात मोठ्या आदराचे स्थान आहे. ते आमच्या परिवाराचे आधारस्तंभ व मार्गदर्शकही आहेत.


माझे वडील माझे सर्वात पहिले गुरू आहेतच
, मात्र सामाजिक जीवनात वावरत असतानादेखील मला काही व्यक्ती अशा भेटल्या की, त्यांचे स्थानदेखील माझ्या जीवनात वडिलांइतकेच महत्त्वाचे आहे आणि तेदेखील माझे गुरू आहेत.


अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. अतुल गावंडे यांनी आपल्या भाषणात असे सांगितले आहे की
, “एका क्रीडापटूला खेळात यशस्वी होण्यासाठी एक प्रशिक्षक आवश्यक असतो.तसेच, प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठीदेखील एक प्रशिक्षक हवा असतो आणि ती भूमिका त्या व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर येणारी व्यक्ती निभावत असते.


माझ्या काही प्रशिक्षकांपैकी एम. एस. पदवी प्राप्त करतानाचे अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश पुलाटे यांनादेखील माझ्या जीवनात वडिलांइतकेच महत्त्वाचे स्थान आहे. निःस्वार्थ व कुठलीही अपेक्षा न बाळगता फक्त विद्यार्थीहिताचा विचार करणारे शिक्षक असे आदर्श रूप डॉ. पुलाटे यांनी माझ्या मनात उभे केले.


आपल्या व्यवसायात उत्तमाची आराधना करत जागतिक दर्जाचे कौशल्य प्राप्त करणे आणि जगत्विख्यात कसे व्हावे
, याचा वस्तुपाठ माझ्यासमोर डॉ. सुधीर राव आणि माझे मार्गदर्शक डॉ. सचिन तपस्वी यांनी उभा केला.


लंडनमध्ये प्रशिक्षण घेत असताना उत्तमाचा ध्यास कसा घ्यावा
, हे डॉ. सुधीर राव यांनी मला सांगितले. तसेच, भारतात डॉ. सचिन तपस्वी यांनी एक गुरू, एक मार्गदर्शक व एक मित्रया तिन्ही भूमिकांमधील रेषा अस्पष्ट करत या तिन्ही नात्यांची जपणूक माझ्या जीवनात केली.


मी इतका भाग्यशाली आहे की
, माझा जन्मच माझ्या गुरूंच्या घरी झाला आणि माझे पितृछत्रच हेच माझे गुरुछत्र आहे. असे म्हणतात की, जेव्हा माणूस विद्यार्थी म्हणून जगण्यास तयार असतो, तेव्हा त्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर गुरू लाभत असतो, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. म्हणून आपण हा ध्यास घ्यावा की, प्रत्येक माणसाकडून आपण काहीतरी चांगले शिकावे म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काहीतरी चांगले जीवनविषयक सूत्र देऊन जाईल.

 

- डॉ. सागर केळकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat