
‘मत्स्यगंधा’मधील सगळी गाणी व्यवस्थित ध्वनिमुद्रित झाली. त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्यांनी मला विचारलं, “अशोक, तू माझ्याबरोबर सहायक म्हणून राहू शकशील का? तुझी इच्छा काय आहे?” मग काय, मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार कळवला. एवढी सुवर्णसंधी कोण सोडणार? आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर राहू लागलो. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्याचे भाग्य मला लाभले. अभिषेकी बुवांमुळे मला संगीतक्षेत्रात खूप काही नवीन शिकायला, अनुभवायला मिळाले.
पं. जितेंद्र अभिषेकींना ‘संगीतातील द्रोणाचार्य’ असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. ते एक महान गायक होते. शिवाय संगीतक्षेत्रात एक ज्येष्ठ/श्रेष्ठ संगीतकार म्हणूनही काम करत होते. मधल्या काळात ‘मीरा मधुरा’, ‘ययाती’, ‘देवयानी’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि अशा अनेक नाटकांतून शास्त्रीय आणि सुगम संगीताची त्यांनी संगीतप्रेमी रसिकांना मेजवानी दिली. त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते प्रचंड मेहनत घ्यायचे. नियमितपणे आठ-आठ तास रियाज करायचे. संगीतातील नवनवीन रागांचे प्रयोग ते सातत्याने करीत असत. हे त्यांचे जणू ध्येयच होते. त्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या संगीतामुळे या संगीतक्षेत्रात खूप बदल घडून आला, नवीन क्रांती झाली. त्यांनी गीतांना दिलेल्या चाली या सहजसुंदर असल्याने आपोआप ती गीते रसिक प्रेक्षकांना आवडू लागली. त्यामुळे तरुण पिढीही त्या संगीताने न्हाऊन निघाली, वेडी झाली. लोकांमध्ये एकप्रकारे शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली.
अभिषेकी बुवांचे माझ्यावर तसे विशेष प्रेम. मला पहिले संगीत नाटकही त्यांनीच दिले. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’चे ‘आटपाट नगरची राजकन्या’ हे नाटक त्यांनी केलेल्या शिफारसीमुळे माझ्याकडे आले. त्यात ८ गाणी होती. ही सर्व गाणी सर्वांना इतकी आवडली की, नाट्यक्षेत्रात अशोक पत्की नावाचा एक तरुण मुलगा संगीतकार म्हणून आला आहे आणि तो खूप छान काम करतो, अशी माझ्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. नाट्यक्षेत्रात अशी चर्चा झाल्यामुळे माझ्याकडे अनेक निर्मात्यांचे लक्ष वेधले गेले. चांगला संगीतकार अशी माझी ओळख प्रस्थापित झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साधारण ५०० नाटकांना मी संगीत दिले आहे.
अभिषेकी बुवा मला नेहमी सांगायचे, जणू त्यांनी मला एक गुरुमंत्रच दिला, असे म्हणायला हरकत नाही. ते म्हणायचे, “अशोक, गाण्याचा मुखडा सणसणीत झाला पाहिजे, अंतरा आपोआप होतो”...आणि खरंच त्याचा फायदा मला नाटकातली गाणी व विविध विषयांवरील मालिकांची शीर्षकगीते करताना झाला. मला कधी काही अडलं नडलं की, मी बुवांना विचारायचो. अभिषेकी बुवा माझे गुरू होतेच, पण त्याहून जास्त ते मला वडीलभावासारखे होते.
एक किस्सा आठवतोय, आमचं ‘लेकुरे’चं म्युझिक रेकॉर्डिंग चालू होतं. मी बुवांना म्हटलं, “बुवा, माझं वय आता ३० वर्षे आहे. पण, अजूनपर्यंत कोकण, गोवा मी पाहिलेलं नाही.” त्यावर ते लगेच म्हणाले, “हे रेकॉर्डिंग संपलं की निघू...”आणि रेकॉर्डिंग संपल्यावर दुसर्याच दिवशी बुवा, मी आणि अरविंद मयेकर असे तिघे थेट कोकणात रवाना झालो. आठ-दहा दिवस खूप मजा केली. गोव्याला आमचा मुक्काम होता. त्यांच्यामुळे मला एक चांगला अनुभव मिळाला आणि हो, रम्य गोव्यातही आमच्या चर्चांच्या केंद्रस्थानी होते ते संगीत. आज संगीतक्षेत्रात एक ‘मेलोडियस’ संगीत देणारा संगीतकार म्हणून मला लोक ओळखतात, ते फक्त आणि फक्त अभिषेकी बुवांमुळेच! हे मी कधीच विसरू शकणार नाही आणि त्यांचे हे ॠण मी कधीच फेडूही शकणार नाही.
एखादं नवीन नाटक त्यांच्याकडे आलं की, ते निर्मात्याला सांगायचे, “पहिली अशोकची डेट घ्या, मग माझ्याकडे या. मग काम सुरू करू.” इतकं आमचं एकमेकांमधलं अंडरस्टँडिंग, जिव्हाळा, प्रेम होतं. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी आणि माझा सारा परिवार त्यांचे सदैव ऋणी आहोत.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं की, गुरुविना सर्व व्यर्थ आहे. मी एकलव्यासारखे त्यांच्याबरोबर राहून संगीताविषयी जे काही थोडंफार शिकलो, त्याबद्दल पं. जितेंद्र अभिषेकी यांचे आभार मानून त्यांना वंदन करतो...!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat