’नई सुबह का सूरज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2019   
Total Views |

 

बाहेरील दहशतवाद आणि अंतर्गत नक्षलवाद ही भारतीय सुरक्षेसमोरील वर्तमानातील दोन मोठी आव्हाने. छत्तीसगढमधील दंतेवाडा, पत्थलगढीपासून ते महाराष्ट्रातील गडचिरोली, एटापल्ली, भामरागड अशी वनवासीबहुल क्षेत्रे प्रामुख्याने या नक्षली कारवायांच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. बंदुकीच्या जोरावर, हत्याकांड घडवून सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणे आणि सामाजिक शांततेचा भंग करत सामाजिक अस्थिरता निर्माण करणे, हेच या नक्षलवाद्यांचे प्रमुख उद्दिष्ट. सरकारविरोधी, राष्ट्रविरोधी या कारवायांना ‘क्रांतिकारी कार्य’ म्हणून किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे कार्य अशा शब्दांत हे नक्षलवादी कार्यरत असतात. समाजातील लोकांचा आणि विशेषत: तरुणवर्गाचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी हे नक्षलवादी विविध चित्रफित तयार करुन आपले कार्य असे योग्य आहे, याचा प्रचार-प्रसार करत असतात. नक्षलींची ही ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात घेऊन आता छत्तीसगढमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी ’नई सुबह का सूरज’ हा लघुपट स्वतःच निर्माण करण्याचे ठरवले आहे. या लघुपटाच्या माध्यमातून पोलीस नक्षलवाद्यांचा खरा चेहरा समजासमोर आणणार आहेत. या लघुपटात पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव हे स्वत: भूमिका साकारणार असून या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरजसिंह परिहार यांनी केले आहे. तसेच, विविध नक्षलवाद्यांच्या भूमिकादेखील या लघुपटात पोलीस कर्मचारीच साकारणार आहेत. नक्षलवादी संघटना आपल्या कार्याचा ‘प्रपोगंडा’ करत ग्रामस्थ आणि खासकरून तरुणांचे ‘ब्रेनवॉश’ करत आले आहेत. तसेच, आजवर अनेक अभ्यासकांनी विशिष्ट कालमर्यादेत राहून अभ्यास करून ‘नक्षलवाद’ या विषयावर लेखन केले आहे. मात्र, जे पोलीस रोजच नक्षलवादाचा सामना करतात आणि ज्यांना रोजच याचे बीभत्स दर्शन घडते, अशा पोलिसांकडून नेमके तथ्य या लघुपटाच्या माध्यमातून आता समोर येणार आहे. नक्षलवाद्यांच्या मोडस ऑपरेंडी’ला हा लघुपट नेमके उत्तर देणारा नक्कीच ठरेल, यात शंका नाही. अशा प्रकारे व्यवस्थेतील लोक समोर येऊन प्रबोधन करू लागले, तर नक्कीच ‘शहरी नक्षलवादा’सारख्या समस्यांना आळा घालणे शक्य होईल. त्यामुळे नक्षलवादाची ही समस्या अधिक जवळून समजून घेण्यासाठी, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा लघुपट निश्चितच एक सकारात्मक मार्ग ठरेल, यात शंका नाही.

 

रेल्वेच्या नकाशावर नाशिकचा विकास

 
दि. ५ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. रेल्वे विभागातर्फे या प्रकल्पांची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात बहुचर्चित नाशिक ते पुणे व इंदूर ते मनमाड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, नाशिकरोड येथे असणाऱ्या रेल्वे चाक दुरुस्ती कारखान्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधीदेखील देण्यात आला आहे. तसेच कल्याण-कसारा या तिसऱ्या लाईनसाठी १६० कोटी, मनमाड- जळगाव ९० कोटी तसेच इगतपुरी-मनमाडसाठी १० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. अशा विविध प्रकल्पांची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. मुळात, आधुनिक युगात विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी दळणवळणाच्या साधनांची नितांत आवश्यकता असते. व्यापारी माल असो वा प्रवासी, पर्यटन असो वा सहेतुक प्रवास यासाठी पोहोचणे आणि पोहोचविणे या साधनांची मुबलकता आहे काय, याबाबत प्रत्येक प्रवासी आणि उद्योजक दक्ष असतो. रेल्वेच्या नकाशावर नाशिकचे स्थान आधीपासून होतेच. मात्र, या स्थळाचा जीर्णोद्धार करण्याची खरी गरज निर्माण झाली होती. त्याबाबत अनेकदा विविध संघटना सातत्याने मागणीदेखील करत होत्या. मात्र, त्यास खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पात मूर्त रूप प्राप्त झाले. नाशिक ते पुणे ही रेल्वेसेवा सुरू करण्याकरिता एकूण २३१ किमी असणाऱ्या या लोहमार्गाचे १८० किमीपर्यंतचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, यावरून धावणारी रेल्वे ही देशातील पहिली हायस्पीड रेल्वे असणार आहे. त्यामुळे मुंबईइतकेच नाशिक आता पुण्याजवळ येण्यास मदत होईल. या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदींमुळे धार्मिक-सांस्कृतिक आणि आर्थिक या तिन्ही नगरींना एकमेकांशी जवळीक साधणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा नाशिकच्या अर्थव्यवस्थेला आणि त्या अनुषंगाने इतर नागरी विकासास होणार आहे. रेल्वेने केलेल्या या तरतुदींमुळे नाशिकच्या कृषी, औद्योगिक, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रास चालना मिळण्याचीदेखील शक्यता निर्माण झाली आहेच.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@