
'लॉयर्स कलेक्टिव्ह' या एनजीओच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असल्याचा आरोप
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या जेष्ठ वकील इंदिरा जयसिंग व त्यांचे पती आनंद ग्रोवर यांच्या मुंबई व नवी दिल्ली येथील निवासस्थान व कार्यालयावर आज सकाळी सीबीआयने छापे टाकले. 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या एनजीओच्या माध्यमातून गोळा केलेल्या निधीत अनियमितता असून त्यांनी विधी विनियमन कायदयाचे (एफसीआरए) कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याचमुळे आज पहाटेपासून त्यांच्या घरावर व कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले.
इंदिरा जयसिंग व आनंद ग्रोव्हर हे 'लॉयर्स कलेक्टिव्हिटी' हा एनजीओ चालवितात. २००९ ते २०१४ या काळात इंदिरा जयसिंग 'ऍडिशनल सॉलिसिटर जनरल' या पदावर कार्यरत होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या एनजीओसाठी विदेशातून फंडिंग घेऊन एफसीआरए कायदयाचे उल्लंघन केले होते. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या एनजीओचे लायसन्स रद्द करत सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मानवाधिकार कार्यामुळे आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा जयसिंग यांनी आरोप केला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat