इतिहास नव्हे वास्तव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2019
Total Views |



आणीबाणीनंतरचे देशातील सामाजिक, राजकीय परिवर्तनही समजून घ्यावे लागेल आणि त्यात संघाला, त्या वास्तवाला अव्हेरून चालणार नाही. म्हणूनच नागपूर विद्यापीठाने पदवीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेल्या संघाच्या इतिहासाला विरोध करणे, हा देशाचाच इतिहास नाकारण्यासारखे ठरते.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बीएच्या (इतिहास) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आणि एकाएकी वादाला तोंड फुटले. कोणत्याही चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय लागलेल्या काँग्रेसने विद्यार्थ्यांना संघाचा इतिहास शिकवण्यावरून गदारोळ माजवला. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांपासून त्यांच्या प्रवक्त्या आणि युवानेत्यांनीही विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात आकांडतांडव सुरू केले. काँग्रेसचीच दुसरी आवृत्ती असलेल्या देशी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनेही विद्यापीठापुढे निदर्शने करत संघावरील पाठ वगळण्याची आणि कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान शून्य आहे, संघ विभाजनकारी आहे. मात्र, केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आल्याने आता संघाच्या प्रचारासाठीच विद्यापीठाने हे काम केल्याचे विरोधकांनी म्हटले.

 

सोबतच संघकार्याच्या इतिहासाच्या पुस्तकातील समावेशाने महापुरुषांचा अवमान होत असल्याचे तारेही काही महाभागांनी तोडले. वस्तुतः रा. स्व. संघावरील या सर्वच आक्षेपांना, आरोपांना काडीचाही आधार नाही किंवा कोणताही पुरावा नाही. मात्र, काँग्रेसने कायमच समाज विविध गटांत विखुरलेला कसा राहील, हेच पाहिले व ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या तत्त्वाने सत्ता राबवली. अशा प्रवृत्तीच्या पक्षाला, त्याच्या नेत्यांना अवघ्या हिंदू समाजाला एकजूट करणार्‍या संघाचे वावडे असणारच ना? म्हणूनच आज ही सगळीच मंडळी संघाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील समावेशावरून गळे काढताना दिसतात. परंतु, कोणत्याही समाजाचा, देशाचा इतिहास त्यातल्या छोट्या-मोठ्या सर्वच व्यक्ती, संस्था, संघटना, राजसत्ता, धर्मसत्ता, प्रबोधनकार, विचारवंतांनी भरलेला असतो आणि तो जाणून घेण्याचा अधिकार वर्तमानातल्या प्रत्येकाला असतो.

 

वास्तविक, इतिहासाचा अभ्यास माणूस आणि मनुष्यजातीने केलेल्या उन्नतीची माहिती करून घेण्याच्या दृष्टीने मौल्यवान ठरतो. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भूतकाळाचा इतिहास जाणून घेणे अतिशय गरजेचे असते. तसेच भूतकाळाच्या अध्ययनातून माणसाला केवळ आपला बहुमोल वारसाच नव्हे तर झालेल्या चुका, तत्कालीन कुप्रथांचीही माहिती होते. इतिहासाबद्दल जगातील प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासकांनीही आपापली मते मांडली आहेत. फ्रेडरिक यॉर्क पॉवेल, ए. एल. राऊज, चार्ल्स फर्थ, हेन्री पिरेन यांसारख्या इतिहासकारांनी इतिहासाला सामाजिक शास्त्र मानले व सामाजिक, राजकीय, आर्थिक तथा सांस्कृतिक विकास त्यातला महत्त्वाचा घटक समजला, तर आर. जी कॉलिंगवूड यांनी संपूर्ण इतिहास हा विचारधारांचा इतिहास असल्याचे म्हटले. दुसरीकडे मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, पशु-पक्ष्यांना भविष्याची चिंता नसते, पण माणूस विचार करताना भावी पिढीच्या सुखद भविष्याची कल्पना करतो. भारतीय ऋषीमुनींनी वेद, पुराणादी महाकाव्ये, तथा इतिहासाची रचना स्वतःच्या सुखासाठी नव्हे, तर भावी पिढीच्या सुखद भविष्यासाठीच केली. म्हणजेच इतिहास भूतकाळ आणि वर्तमानाला जोडणार्‍या एका सेतूचे कार्य करतो, हेही इथे दिसते. हा झाला इतिहासाचे महत्त्व, गरज याबद्दलचा भाग.

 

परंतु, जगाचा इतिहास पाहता त्याला काही निश्चित असे संदर्भ असल्याचेही समजते. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, बोल्शेविक क्रांती यासारख्या फ्रान्स, अमेरिका आणि रशियातील क्रांत्या तिथल्या तिथल्या संदर्भाने घडलेल्या असतात. सदर ‘क्रांत्या चर्च विरुद्ध विचारवंत’, ‘विचारवंत विरुद्ध राजसत्ता’ किंवा ‘चर्च विरुद्ध राजसत्ता’ अशा तीन श्रेणींत घडल्याचे दिसते. तसेच जगातील सर्वच बंड या तीन घटकांभोवतीच फिरताना दिसतात. याव्यतिरिक्त ज्या क्रांत्या झाल्या, त्यांचा पाया डाव्या विचारांचा वा कार्ल मार्क्सने मांडलेल्या मतांचा होता. कृषी संस्कृतीतून यांत्रिकीकरणाकडे आणि तिथून औद्योगिक क्रांतीकडे जगाची वाटचाल झाली, पण या प्रवासात मानवी श्रमांचे मूल्य अत्यल्प होत गेले. इथूनच भांडवलशाहीचा उदय झाला आणि त्याद्वारे होणारे मानवी शोषण अधोरेखित करण्याचे काम डाव्या विचारवंतांनी केले. याचा अर्थ डाव्या विचारवंतांना शोषणाचे, शोषितांचे सर्वच प्रश्न सोडवता आले, असे नव्हे. मात्र, मानवी शोषणाचा मुद्दा अत्यंत समर्पक शब्दांत मांडला तो मार्क्सने, तोही ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात, हे खरेच. म्हणूनच डावी विचारसरणी पटो अथवा न पटो, त्याचे स्थान मात्र नाकारता येत नाही. त्यामुळे या क्रांत्या शिकवाव्या की शिकवू नये, हा स्थळकाळाचाच प्रश्न म्हटला पाहिजे.

 

राज्यासह देशात आज विद्यापीठीय अभ्यासक्रमात रा. स्व. संघाचा इतिहास शिकवावा की शिकवू नये, यावरून वाद घातला जात असल्याचे दिसते. तथापि, १९४७ आधी भारतात ब्रिटिश राजवट होती आणि नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर नव्या भारताची वाटचाल सुरु झाली. परंतु, या कालखंडात तीन टप्प्यांनी देशाच्या सामाजिक व राजकीय जीवनात प्रचंड घुसळण केली. त्यातला पहिला टप्पा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा, दुसरा टप्पा आणीबाणीचा आणि तिसरा टप्पा श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा होय. उल्लेखनीय म्हणजे, आणीबाणी आणि नंतरच्या श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचा नैसर्गिक परिणाम म्हणूनच आज देशांतले सत्तांतर झाल्याचे दिसते. लोकशाहीच्या निकषावर सपशेल फसलेले डावे-समाजवादी मात्र या सर्वच प्रवाहांना भिन्न भिन्न करून या घटनेकडे पाहतात. परंतु, ‘समाज’ म्हणून विचार करताना समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास आदी विषय या एकाच घटनाक्रमाचे आयाम असल्याचे लक्षात येते.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ते आजचे राजकीय स्थित्यंतर, भाजपचा उदय-उत्कर्ष आणि काँग्रेसचा अपकर्ष. संघाचे शैशव ते तारुण्य. या घटना परस्परपूरक आणि ३०-४० वर्षांतल्या कालखंडात घडलेल्या वा विकसित होत असल्याचे दिसते. म्हणूनच डाव्यांच्या क्रांत्या किंवा युरोपीय पुनर्जागरण, फ्रेंच, अमेरिकन, रशियन क्रांती, दुसरे महायुद्ध, त्यानंतर झपाट्याने बदललेली जगाची सामाजिक-राजकीय परिस्थिती याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले पाहिजे, याबाबत दुमत नाही. पण, त्याचबरोबर ९०-९५ वर्षे टिकलेल्या वा सातत्याने वर्धिष्णू होत असलेल्या एका संघटनेच्या प्रवाहाकडे आणि तिने निर्माण केलेल्या कंपनांतून झालेल्या परिवर्तनाकडे कानाडोळा करणे किंवा तिला अनुल्लेखाने मारणे, हे योग्य नाही. मात्र तसे करणे हीच या देशातल्या इतिहासकारांची परंपरा राहिल्याचे दिसते.

 

इथल्या पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमांत फ्रेंच वा बोल्शेविक क्रांत्या शिकवण्याला देशातल्या हिंदुत्वनिष्ठांनी कधी फारसा विरोध केला नाही. मात्र, संघाचा इतिहास नकोच, हा जो आताचा गदारोळ सुरू आहे, त्यामागे दांभिक मनोवृत्तीची बीजे दडलेली आहे आणि या दांभिक मनोवृत्तीला द्वेषाचीही किनार आहे. या द्वेषाला बळी ठरलेला जिवंत, रसरशीत इतिहास, जो आपल्या पुस्तकात कधी शिकवला नाही, तो म्हणजे मराठ्यांचा इतिहास! राष्ट्र रक्षणाच्या विलक्षण भावनेने भारावून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरही अठरापगड जातीतल्या लोकांना एकत्र येत मराठा साम्राज्य टिकवले, वाढवले.

 

तत्पूर्वी हरिहर आणि बुक्कराय या बंधूंनी विद्यारण्य स्वामींच्या मार्गदर्शनात विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन केले. मात्र, हा संपूर्ण इतिहास आपल्या देशातल्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलाच जात नाही. त्याचे कारण या सगळ्याच राजसत्तांनी विध्वंसक इस्लामी आक्रमकांशी केलेला झगडा! असा इतिहास मुस्लीमविरोधी होण्याची शक्यता वाटल्यानेच देशात कधीही शिकवला गेला नाही. त्यामुळे देशाचा प्रवास समजून घ्यायचा तर या राष्ट्रीय क्रांत्या समजून घेण्याला पर्याय नाही. तसेच आणीबाणीनंतरचे देशातील सामाजिक, राजकीय परिवर्तनही समजून घ्यावे लागेल आणि त्यात संघाला, त्या वास्तवाला अव्हेरून चालणार नाही. म्हणूनच नागपूर विद्यापीठाने पदवीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेल्या संघाच्या इतिहासाला विरोध करणे, हा देशाचाच इतिहास नाकारण्यासारखे ठरते. अखेरीस पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात तसे - आपल्याला इतिहासाकडून प्रेरणा घेऊन भविष्याकडील वाटचाल, असा प्रवास करायचा असेल तर आधी आपला इतिहास समजला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि तो शिकलाही पाहिजे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@