मुंबईत 'कानडी यक्षगान' सुरूच : काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार रिकाम्या हाती बेंगळुरूला परत

    10-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या संघर्षाला नवीन वळण लागले असून मुंबईतील पवईमध्ये रेनेसन्स हॉटेलबाहेर राजकीय नाट्य सुरू आहे. काँग्रेस-निजदच्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आलेल्या काँग्रेसच्या 'संकटमोचक' डी. के. शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, नसीम खान यांनादेखील सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी अखेर काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार यांना रिकाम्या हाती बेंगळुरूला पाठवले. कर्नाटकी आमदारांना भेटण्याचा निश्चय करून आलेल्या शिवकुमार यांना त्यांना न भेटताच जावे लागले.

 

कर्नाटकमधील बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डी. के. शिवकुमार आणि निजद नेते शिवलिंगे गौडा बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. मात्र शिवकुमार यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचे सांगत कर्नाटकातील आमदारांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. तसे पत्रच मुंबई पोलिसांना लिहून सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे पोलिसांनी कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी. के. शिवकुमार यांना हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मनाई करत हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली.

 

बंडखोर आमदारांची सुरक्षेची मागणी

काँग्रेस आणि निजदच्या दहा बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली. आम्ही कर्नाटकचे आमदार पवईच्या रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबलो आहोत. आम्हाला माहिती मिळाली आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, डी. के. शिवकुमार आणि अन्य नेते आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये येणार आहेत. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला त्यांना भेटायचे नाही. त्यामुळे या नेत्यांना हॉटेलमध्ये घुसण्यास परवारगी देऊ नये अशी विनंतीच आमदारांनी केली होती.

 

शिवकुमार यांचा हॉटेलबाहेर ठिय्या

सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल रेनेसन्समध्ये जाण्यापासून शिवकुमार यांना पोलिसांनी रोखले. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपवाले आम्हाला भेटू का देत नाहीत? मी माझ्या मित्रांना भेटायला आलो आहे. आम्ही सर्व एकत्र राजकारणात आलो असून त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही असे सांगत हॉटेलबाहेर ठिय्या मांडला.

 

शिवकुमार यांची काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका

शिवकुमार यांनी 2002 मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार वाचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विलासराव देशमुख यांना त्यावेळी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मुंबईहून बंगळुरूला नेले होते. त्यामुळे सर्व आमदार एकत्र ठेवण्यास काँग्रेसला यश आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने त्यांच्या पक्षाच्या आमदारांना इंदूरमध्ये नेले होते.

 

काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांचे राजीनामे

कर्नाटकमधील राजकीय घडामोडींमध्ये आता अधिकच भर पडत आहे. काँग्रेस-निजदच्या १४ आमदारांनी राजीनामे देऊन बंड केलेले असतानाच काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. के. सुधाकर आणि एम. टी. बी. नागराज या आमदारांनी काँग्रसकडे राजीनामे सोपवल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. आता बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे गणेश हूक्केरी आणि अंजली निंबाळकर हे दोन आमदार राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे.

 

राजीनामा मंजूर न केल्याने आमदार सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटक सरकार वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडून सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी १४ पैकी ९ आमदारांचे राजीनामे नियमात बसत नसल्याचे सांगत ते मंजूर करण्यास नकार दिला. यामुळे बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

लोकशाही व्यवस्थेवर काळा डाग : कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मुंबईत कर्नाटक सरकारचे मंत्री व आमदारांबरोबर पोलिसांनी केलेली धरपकड चुकीची आहे. महाराष्ट्र सरकारचे हे पाऊल या शंकेला अधिक वाव देते की भाजप घोडेबाजारास प्रोत्साहन देत आहे. हा देशाच्या लोकाशाही व्यवस्थेवर काळा डाग असल्याची टीका त्यांनी केली.

 

भाजपकडून कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने बहुमत गमावले असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजप आमदारांनी कर्नाटक विधानसभेसमोरील गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. भाजप नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

 

राज्यसभेचे कामकाज ठप्प

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारला अस्थिर करण्यामागे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप करत बुधवारीही काँग्रेसने राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँगे्रसच्या बी. के. हरिप्रसाद यांच्यासह काँगे्रस सदस्यांनी मोदी सरकार हाय हायअशा घोषणा देत वेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दुपारी बारापर्यंत तहकुब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांचा गोंधळ सुरू झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.

 

मी माझ्या आयुष्यात मुंबई आणि महाराष्ट्रात एवढे वाईट चित्र कधीही पाहिलेले नाही. महाराष्ट्र सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. डी. के. शिवकुमार यांचे हॉटेलमध्ये बुकिंग असताना त्यांना आतमध्ये का जाऊ देण्यात आले नाही?

-काँग्रेस नेते मिलिंद देवरा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat