विश्वचषक स्पर्धेतून ‘टीम इंडिया’चे पॅकअप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |


न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी मानहानीकारक पराभव


मँचेस्टर : विश्वचषक स्पर्धेतील भारत वि. न्यूझीलंड उपांत्य सामन्यात पहिल्या दिवशी पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे उर्वरित सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. भारतीय गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला २३९ धावांत रोखण्यात यश मिळाल्याने भारतीय चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली व न्यूझीलंडकडून १८ धावांनी धक्कादायक पराभव स्वीकारत भारताला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला.

 

भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला ५० षटकांत ८ बाद २३९ धावांवर रोखले. तुलनेने सोपे आव्हान मिळाल्यामुळे आणि भारतीय फलंदाजी सध्या उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने भारत न्यूझीलंडवर सहज मात करून अंतिम फेरी गाठणार, असाच अंदाज सर्वांनी बांधला होता. हा अंदाज भारतीय फलंदाजांनी पहिल्या चार षटकांतच खोटा ठरवला. मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्टच्या अप्रतिम स्पेलमुळे रोहित शर्मा, विराट कोहली व के. एल. राहुल हे तीनही आघाडीचे फलंदाज प्रत्येकी केवळ १ धाव करून तंबूत परतले. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ५ अशी केवीलवाणी झाली. त्यानंतर दिनेश कार्तिक, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे मधल्या फळीतील तिघे फलंदाज ठराविक धावांच्या अंतरावर बाद झाल्याने ३०.३ षटकांत ६ बाद ९२ अशी भारताची अवस्था झाली.

 

यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा या जोडीने ११६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु, जडेजा आणि त्यानंतर पुढच्याच षटकात धोनी बाद झाल्यावर भारत सामना गमावणार यावर शिक्कामोर्तब झाले. जडेजाने अवघ्या ५९ चेंडूत ४ चौकार व ४ षटकार खेचत ७७ धावांची संस्मरणीय खेळी केली. तसेच, धोनीनेही ७२ चेंडूत ५० धावा करत त्याला साथ दिली. परंतु, हे दोघेही बाद झाल्यावर भारताचा पराभव ही केवळ औपचारिकता बनली. त्यानंतर फर्ग्युसन आणि निशामने अनुक्रमे भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलला बाद करत भारताचा डाव संपवला. भारताने ४९.३ षटकांत सर्वबाद २२१ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजी करत १० षटकांत केवळ ३७ धावा देत ३ बळी टिपले. बोल्ट, सँटनरने प्रत्येकी २ तर निशाम, फर्ग्युसनने प्रत्येकी १ बळी घेत न्यूझीलंडच्या विजयात हातभार लावला.

 

मॅट हेन्रीलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयामुळे न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आता गुरूवारी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवण्यात येणार असून रविवार, दि. १४ जुलै रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@