वास्तवाचा विस्तव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |



मुंबईसह अन्य मोठ्या शहरांत विशेषतः पुण्यात पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारे अनेक डावे कंपू कार्यरत आहेत. प्रत्यक्षात या गटातल्या मंडळींचे धागेदोरे थेट हिंसक अशा नक्षलवादी, माओवादी, जहाल-अतिडाव्या संघटनांपर्यंत 'फ्रंटल ऑर्गनायझेशन'च्या रूपाने पोहोचलेले असतात आणि आताच्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळेसंबंधीच्या वृत्ताने हीच बाब अधोरेखित झाली.

 

पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या संतोष शेलार उर्फ 'विश्वा' या तरुणाचा शोध लागला आणि तो छत्तीसगढच्या सीपीआय-माओवादी संघटनेच्या 'तांडा एरिया कमिटी'चा डेप्युटी कमांडर झाल्याचे वास्तव पुढे आले. घरातून निघून गेल्यानंतर २०११ साली त्याचा संबंध अँजेला सोनटक्के व मिलिंद तेलतुंबडेशी आल्याचे व तिथूनच तो माओवाद्यांच्या हिंसक गटात सामील झाल्याचेही म्हटले जाते. संतोषच्या जोडीने प्रशांत कांबळे हा युवकही सीपीआय-माओवादी संघटनेत सामील झाल्याची आणि गडचिरोली-गोंदियात सक्रिय असल्याची माहिती समोर आली.

 

मंगळवारी उघडकीस आलेल्या या खळबळजनक प्रकारामुळे शहरी-जंगली नक्षलवाद, माओवाद हे विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आले आणि त्यावर चर्चाही सुरू झाली. परंतु, शहरातील झोपडपट्ट्यांत राहणारे तरुण माओवादाशी कसे काय जोडले जातात? त्यांची भरती कशी केली जाते? आणि या किडीला रोखणार कसे? हे प्रश्नही उपस्थित झाले, तर मुंबईसह अन्य मोठ्या शहरांत विशेषतः पुण्यात मानवाधिकार, संविधान, सामाजिक न्याय आदींची भाषा करत धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारे अनेक डावे कंपू कार्यरत आहेत. प्रत्यक्षात या गटातल्या मंडळींचे धागेदोरे थेट हिंसक अशा नक्षलवादी, माओवादी, जहाल-अतिडाव्या संघटनांपर्यंत 'फ्रंटल ऑर्गनायझेशन'च्या रूपाने पोहोचलेले असतात आणि आताच्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळेसंबंधीच्या वृत्ताने हीच बाब अधोरेखित झाली. कारण, संतोष शेलार माओवादाकडे ओढला गेला तो 'कबीर कला मंच' नावाच्या कथित कला-संस्कृतीविषयक काम करणार्‍या डाव्या विचारांच्या संघटनेमुळेच आणि हे सत्य सांगितले त्याची आई सुशीला शेलार यांनीच!

 

'कबीर कला मंच'ची शिक्षित, पण अर्धवट वयातील तरुणांना पीडेची जाणीव करून देऊन आपल्या प्रभावाखाली आणण्याची हातोटी विलक्षण आहे. गाव-खेड्यात, वस्ती-पाड्यावर, वनवासी भागांत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली मंचाची माणसे सातत्याने फिरत राहतात. पथनाट्ये, जलसा, पोवाडे गायनासारख्या उपक्रमांतून तरुणांना तसेच त्यातल्या कलाकारांना आपल्याशी जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शहरांमध्येही मंचाचे लोक याच पद्धतीने, तर कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नंतर मार्क्स-माओच्या नावाखाली कामे करतात. दरम्यानच्याच काळात सरकार, व्यवस्था आणि उर्वरित समाज कसा अन्यायी, अत्याचारी असून आपण त्याला बळी पडल्याच्या कहाण्या ऐकवल्या जातात.

 

मुळातच झोपडपट्ट्यांतील, ग्रामीण-दुर्गम भागांतील आणि विकासाच्या संधींपासून वंचित राहिलेले तरुण मग शिक्षण वगैरे सोडून 'कबीर कला मंच'वाल्यांच्या, 'तुमच्या दुःखावर फुंकर घालू, तुमच्यातील कलेला वाव मिळवून देऊ' सारख्या बोलण्याला फसतात. आपली कदर करणारे कोणीतरी 'जाणकार' गवसल्याच्या विश्वासावर मंचाशी जोडले गेलेले युवक मग तिथल्याच म्होरक्याच्या मागे अगदी सहजपणे चालू लागतात आणि सुशीला शेलार यांच्या बोलण्यातूनही हाच आशय व्यक्त झाला. अर्थात, 'कबीर कला मंचा'चे म्होरके असलेले सचिन माळी आणि शीतल साठे यातून आपले सावज हेरतात की, ते स्वतःच कोणाचे तरी सावज आहेत, हाही एक प्रश्न उरतोच.

 

सध्याची संतोष शेलार वा प्रशांत कांबळेची कथा वर उल्लेखलेल्या मुद्द्यांहून निराळी नाही. सुशीला शेलार यांच्या मते, "मूळच्या चित्रकार असलेल्या संतोषला 'कबीर कला मंच'वाल्यांनी अशाचप्रकारे नादी लावले आणि ब्रेनवॉश करून त्याला थेट जंगलात धाडले. "मुंबईला चित्रकला प्रदर्शनात काम करण्याची संधी आहे," असे सांगून त्याला घरच्यांपासून कायमचे तोडले." सोबतच "कबीर कला मंचचा कार्यक्रम वस्तीत घेतला नसता तर एवढं झालं नसतं, 'कबीर कला मंचा'ने माथी भडकावल्यानेच संतोष घर सोडून गेला," असेही संतोषची आई सांगते. एवढेच नाही तर संतोषच्या भावाने-संदीप शेलारनेदेखील त्याच्या माओवादी होण्यामागे 'कबीर कला मंचा'चाच हात असल्याचा दावा केला. "कबीर कला मंचाचे सचिन माळी, शीतल साठे तरुणांना फूस लावतात आणि आजही जामिनावर मोकाट असलेले हे लोक आणखी तरुणांना गोळा करून माओवाद्यांच्यात पाठवतील," असे संदीपने म्हटले.

 

वस्तुतः 'कबीर कला मंचा'चे नाव पहिल्यांदाच माओवाद्यांशी जोडले गेलेले नाही. आर. आर. पाटील राज्याचे गृहमंत्री असताना 'कबीर कला मंचा'च्या सचिन माळी, शीतल साठेसह अन्य सदस्यांना माओवादी-नक्षलवादी कारवायांवरून अटक करण्यात आली होती. पुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये 'कबीर कला मंच' माओवाद्यांसाठी 'फ्रंटल ऑर्गनायझेशन' म्हणून काम करत असल्याचे गृहमंत्रालयाने लोकसभेत जाहीर केले. ३१ डिसेंबर, २०१७ ला शनिवारवाड्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत आणि कोरेगाव-भिमातील हिंसाचारातही 'कबीर कला मंचा'चा सक्रिय सहभाग असल्याची चर्चा झाली. 'कबीर कला मंचा'ने मात्र आपला नक्षलवाद्यांशी, माओवाद्यांशी संबंध असल्याचे दरवेळी नाकारले.

 

हा झाला 'कबीर कला मंचा'विषयीचा भाग. परंतु, डाव्या विचारांच्या आणि जंगलातील माओवाद्यांशी संधान बांधलेल्या, त्यांना कार्यकर्त्यांचा पुरवठा करणार्‍या अशा कितीतरी (शहरी माओवाद्यांच्या!) संघटना राज्यासह देशाच्या निरनिराळ्या भागात सक्रिय आहेत. बुद्धीभेद करत, लाल क्रांतीचे हाकारे देत ही मंडळी सामाजिक, मानवाधिकार, पर्यावरण कार्यकर्त्यांच्या रूपात, पांढरपेशा व्यावसायिकाच्या, कलाकाराच्या, प्राध्यापकाच्या, साहित्यिकाच्या, विचारवंतांच्या चेहर्‍याखाली वावरत असतात. सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्साल्वीस, गौतम नवलखा, अरुण परेरा ही त्यापैकीच काही नावे. काही महिन्यांपूर्वी त्यांना माओवाद्यांशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्याशी संबंधित (शहरी माओवाद्यांच्या) गोटातून विरोधाच्या, निषेधाच्या आरोळ्या दिल्या गेल्या. काही काही महाभागांनी तर 'होय, मी शहरी नक्षलवादी' अशी पाटी गळ्यात अडकवत माओवाद्यांना पाठिंबा देण्याची मोहीमही राबवली.

 

रा. स्व. संघ, भाजप व मोदी सरकारला विरोध म्हणून माओवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणार्‍यांचा यात अधिकच भरणा होता. अर्थातच या सर्वांच्या शोषित-पीडितांबद्दलच्या संवेदना ठीकच, पण आपण आपल्या कृत्यातून कोणत्या राक्षसी विचाराचे समर्थन करतोय, कोणते निखारे हाती घेतोय, हेही या लोकांना कळत नसेल का? की वंचितांचा, पीडितांचा एकमेव उद्धारकर्ता, तारणहार होण्याच्या नादात ही माणसे असा प्रकार करत असावीत? एखाद्या विचारसरणीला तात्त्विक विरोध एकवेळ समजू शकतो, पण म्हणून त्यासाठी माओवाद्यांच्या समर्थनाचा मार्ग कधीही योग्य असू शकत नाही. पण, समाजातील 'प्रतिष्ठित' म्हणून समजल्या जाणार्‍या लोकांच्या या उद्योगांमुळे ज्यांना हे नेमके काय सुरू आहे, हेच माहिती नसते, तेही माओवादी, नक्षलवाद्यांना पाठिंबा देऊन मोकळे होतात.

 

बुद्धीजीवी मंडळींच्या बरोबरीनेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीही वेळोवेळी माओवाद्यांची भलामण करत नक्षलवाद्यांवरील कारवाईचे राजकारण केले. आपल्या स्वार्थापायी कोणत्या हिंसाचाराचे, घृणेचे, बीभत्सतेचे आपण समर्थन करत आहोत, हेही या लोकांना समजले नाही. सत्ताधार्‍यांना विरोध करताना विवेकाचे, जबाबदारीचे भान हरपले की, राजकारणी कोणत्या थराला जातात, त्याचाच हा दाखला. दुसरीकडे सध्या केंद्रात आणि राज्यातही राष्ट्रवादी विचारांचे सरकार सत्तेत असल्याने जंगली आणि शहरी माओवाद्यांविरोधात ठोस कारवाई होईल, हे खरेच. तसेच राष्ट्र खिळखिळे करण्याच्या उद्देशाने कारवाया करणार्‍यांचा सफाया होणार, त्यांची पाळेमुळे खणून काढली जाणार, हेही नक्कीच. परंतु, समाजानेही या विस्तवाविरोधात उभे राहणे गरजेचे आहे.

 

प्रामुख्याने आई-वडिलांनी आपल्या मुलांचा संबंध माओवादी-नक्षलवादी विचारांच्या संस्था, संघटनांशी तर नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. माओवादी विचाराविरोधात सार्वजनिक ठिकाणी, महाविद्यालयांत-विद्यापीठांत, विविध कार्यक्रमांत जनजागृतीचे कार्यक्रमही केले पाहिजेत. कारण, जोपर्यंत सरकारबरोबरच समाजही या विषवल्लीविरोधात एकजुटीने उभा राहत नाही, या भयाण संकटाचा सामना करत नाही, तोपर्यंत संतोष शेलार वा प्रशांत कांबळेसारखे तरुण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतच राहतील, जे संबंधित युवकांच्या परिवाराच्या तसेच समाजाच्या आणि देशाच्याही हिताचे ठरणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


पुण्यातील ‘तो’ बेपत्ता तरूण बनलाय नक्षलवादी !

@@AUTHORINFO_V1@@