भारतीय स्थलांतरितांचे 'चलो कॅनडा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019   
Total Views |




कॅनडाची लोकसंख्या ३ कोटी, ७१ लाखांच्या आसपास आहे. या लोकसंख्येत तब्बल १२ लाख, ६० हजार भारतीय स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. नुकतीच एक ताजी आकडेवारी समोर आली असून 'एक्सप्रेस एंट्री स्कीम'नुसार कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्यामध्ये भारतीय स्थलांतरित आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

 


दहशतवाद, सीमावाद, स्थलांतर, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, भाषावाद, डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्था अशा एक ना अनेक समस्यांनी जगभरातील विविध देशांना आज ग्रासले आहे. भारत व चीन लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्नशील आहेत, तर दहशतवादाला पोसणार्‍या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. मात्र, कॅनडासारख्या देशांना वेगळ्याच समस्यांनी ग्रासले आहे. कॅनडामधील लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कमी होत जाणार्‍या लोकसंख्येने येथील प्रशासन चिंतीत आहे. कारण, घटत्या लोकसंख्येमुळे या देशात मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे. म्हणूनच कॅनडियन प्रशासन परदेशातून आलेल्या स्थलांतरितांचे मोकळ्या मनाने स्वागत करते व त्यांना नागरिकत्व बहाल करून टाकते. विशेष म्हणजे, बेकायदेशीररित्या कॅनडात घुसलेल्या स्थलांतरितांवर कारवाई न करता त्यांना स्वीकारण्याचे धोरण कॅनडाने अवलंबले आहे. यावरून कॅनडामध्ये घटत्या लोकसंख्येचा विषय किती गंभीर आहे, याची कल्पना येते.

 

कॅनडाची लोकसंख्या ३ कोटी, ७१ लाखांच्या आसपास आहे. या लोकसंख्येत तब्बल १२ लाख, ६० हजार भारतीय स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. नुकतीच एक ताजी आकडेवारी समोर आली असून 'एक्सप्रेस एंट्री स्कीम'नुसार कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्यामध्ये भारतीय स्थलांतरित आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. २०१७च्या तुलनेत २०१८ साली भारतीय स्थलांतरितांचे कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारण्यामध्ये तब्बल ५१ टक्के वाढ झाली आहे. २०१८ साली एकूण ३९ हजार, ५०० भारतीय स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. भारतीयांसोबत नायजेरियाच्या ६ हजार, ६५३ स्थलांतरितांनी कॅनडाचे कायमस्वरूपी नागरिकत्व स्वीकारले आहे, तर स्थलांतरितांमध्ये चीनचे नागरिकही मागे नसून ५ हजार, ८८५ चिनी स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

 

२०१७ साली एकूण ६५ हजार, ४२३ स्थलांतरितांनी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. यामध्ये २६ हजार, ३०० लोक फक्त भारताचे नागरिक होते, तर २०१८ मध्ये एकूण ९२ हजार स्थलांतरित कॅनडामध्ये दाखल झाले असून त्यातील ३९ हजार, ५०० नागरिक हे एकट्या भारतातील आहेत. यावरूनच स्थायिक होण्यासाठी कॅनडा ही भारतीयांची पहिली पसंती असल्याचे दिसून येते. यापूर्वी अमेरिकेकडे भारतीय स्थलांतरितांचा ओढा असायचा. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मागील दोन वर्षांत 'एच १-बी' व्हिसा मिळवण्यात असंख्य अडचणी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याच्या आशेने अमेरिकेमध्ये गेलेल्या भारतीय स्थलांतरितांना 'एच १-बी' व्हिसा मिळण्यास होणारा विलंब, ग्रीन कार्ड बॅकलॉग, पती/पत्नीला एच १-बी व्हिसासाठी मिळणारा नकार यामुळे स्थलांतरित भारतीयांनी मोर्चा कॅनडाकडे वळवला आहे.

 

जगातील दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्रफळ असलेला हा देश ३६५ दिवस शांतताप्रिय देश म्हणून जगप्रसिद्ध आहे. आजघडीला या देशामध्ये अनेक उद्योगधंदे व शेतीव्यवसाय अपुर्‍या मनुष्यबळामुळे ओस पडल्याचे दिसते. यामुळे कॅनडा सरकारने 'ग्लोबल टॅलेंट स्ट्रीम' (जीटीएस) हा नवा उपक्रम सुरू केला आहे. यानुसार जगभरातून हुशार व्यक्तींना कॅनडामध्ये नोकरीची संधी मिळणार असून येथे काम करण्याचा परवाना अवघ्या दोन आठवड्यांत मिळणार आहे. एवढंच नाही तर 'जीटीएस'अंतर्गत कॅनडामध्ये नोकरी करणार्‍या व्यक्तीला कॅनडाचे कायमस्वरूपी नागरिकत्वही मिळू शकते. यासोबतच इतर देशांतून येणार्‍या स्थलांतरितांना त्यांचा धर्म, भाषा, संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासाठी सरकारी अनुदान दिले जाते.

 

कॅनडाच्या लोकसंख्यावाढीचा विचार केल्यास, येथील विद्यापीठात दरवर्षी तीन लाख विदेशी विद्यार्थ्यांची गरज असते. त्यामुळे येथे शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारावे यासाठी पायघड्या घातल्या जातात. दुसर्‍या देशांच्या तुलनेत कमी खर्च आणि उच्च राहणीमान विद्यार्थ्यांना व नोकरदारांना खुणावत असते. यासोबतच कॅनडा विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना येथेच काम करण्याची परवानगी सरकारकडून अगदी सहजरित्या दिली जाते. एवढंच नाही, तर विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यास कायमस्वरूपी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे कॅनडाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अमेरिकेसारख्या फार जाचक अशा अटी नसून अर्जदार हा कौशल्यपूर्ण असायला हवा, एवढी एकच अट असल्याने याच जोरावर हजारो भारतीय विद्यार्थी व नोकरदार कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारताना दिसतात. त्यामुळे आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यताही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@