हेचि दान देगा देवा..!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |
 
 
 
इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि,

चित्तिं दक्षस्य सुभगत्वमस्मे।

पोषं रयिणामरिष्टिं तनूनां,

स्वाद्मानं वाच: सुदिनत्वमह्नाम्॥

(ऋग्वेद- २.२१.६)

 
 

अन्वयार्थ

हे (इन्द्र) परम ऐश्वर्यशाली परमेश्वरा! (अस्मे) आम्हासाठी (श्रेष्ठानि) श्रेष्ठ व उत्तम प्रकारची (द्रविणानि) धनसंपदा (दक्षस्य) दक्षतेची, कार्यतत्परतेची व बळाची (चित्तिम्) ख्याती, (सुभगत्वम्) सौभाग्य, (रयीणाम्) धनाची (पोषम्) पौष्टिकता, (तनूनाम्) शरीरांची (अरिष्टिम्) निरोगता, (वाच:) वाणीची (स्वाद्मानम्) मधुरता आणि (अह्नाम्) दिवसांची (सुदिनत्वम्) मंगलमयता (धेहि) प्रदान कर, दे!

 
 

विवेचन

खरे तर जगायला काय लागते? अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या तरी केवळ या तिन्हींमुळेच मानवी जीवन यशस्वी ठरत नाही. त्याकरिता इतरही मौलिक बाबींची गरज भासतेच! म्हणूनच एक उपासक या मंत्राद्वारे देवाकडे सात गोष्टींचे मागणे मागत आहे. त्या महान इंद्रदेवाकडे भक्त आपल्या जीवनोपयोगी साहित्याची जणू काही यादीच सादर करीत आहे. पण, इथे एक गोष्ट महत्त्वाची, ती ही की ज्याच्याकडे तो आपली याचना करीत आहे... तो दाता काय साधासुधा नाही. तो तर इंद्र आहे. संस्कृत व्याकरणानुसार इंद्र शब्द ‘इदि’ धातूने तयार होतो. ‘मोठे ऐश्वर्य, मोठी श्रीमंती’ असे त्याचे अर्थ होतात. ‘ऐश्वर्य’ म्हणजे केवळ भौतिक धन संपदाच नव्हे तर ज्ञान, बळ, उत्तम तत्त्वे, कीर्ती असेही त्याचे अर्थ होतात. त्याचबरोबरच ज्ञानाच्या अंतर्गत आध्यात्मिक, प्राकृतिक, सामाजिक ज्ञान, तर बलांच्या अंतर्गत शारीरिक-आत्मिक, मानसिक इ. प्रकारचे बळ. असा विशाल अर्थ ‘इंद्र’ शब्दात दडलेला आहे. संपूर्ण विश्वाची भौतिक व आध्यात्मिक धनसंपदा ज्यामध्ये सामावलेली आहे, असा तो परम ऐश्वर्यशाली देव, म्हणजेच देवेंद्र! हा आपल्या प्रिय भक्त याचकांना सदैव काहीना काही देण्यास तत्पर असतो. मात्र, तो याचक ‘सुपात्र’ असावा, अन्यथा पात्रहीन भिकार्‍यांची संख्या या जगात मोठ्या प्रमाणात आहे. असे हे नेहमीच हात पसरणारे दरिद्री ते महादरिद्रीच राहणार! जसा याचक सत्पात्री, तसाच दातादेखील तितकाच सुयोग्य असावा लागतो. कारण, उगीच कोणीही कोणाच्याही समोर व्यर्थ हात फैलावत नाही. ऐश्वर्य खूप आहे, पण तो जर फारच चेंगट असेल, तर काय उपयोग? म्हणूनच श्रीमंतीसोबतच मनाची उदारता व हृदयाची विशालता हवी. त्यांच्या अंतर्मनात नेहमीच दान करण्याची सद्वृत्ती रूजलेली असावी. त्याचे दानदेखील गर्व, अभिमान व प्रसिद्धीचा लवलेश नसणारे असावे.

 
 

‘परमेश्वर’ हा नुसताच ऐश्वर्यसंपन्न नाही तर तो परम म्हणजे महान, सर्वाधिक मोठा ऐश्वर्यशाली आहे. त्याकडे वेदज्ञानाचे ऐश्वर्य आहे, जे की संपूर्ण विश्वाला दु:ख-दारिद्—यापासून दूर ठेवून सुखी व आनंदी बनविते. अशा त्या महान परमेश्वराकडे याचक ज्या सात गोष्टींची याचना करतो, त्यामुळे त्या एका व्यक्तीचेच नव्हे, तर सबंध कुटुंब, समाज व समग्र राष्ट्राचेही कल्याण साधते. सर्वात अगोदर ‘श्रेष्ठानि द्राविणानि’ म्हणजेच उत्तम धनाची कामना केली आहे. श्रेष्ठ द्रव्याचा आधार असतो सत्य व प्रामाणिकपणा! भ्रष्ट मार्गाने किंवा अधर्माने मिळणारे धन नको. कारण, ते कधीही यशस्वी ठरत नाही, नाहीतर चोरांकडेही भरपूर धन आहे. मग काय त्यांचे दानधर्म सफल ठरते? कदापि नाही. वाईट मार्गाने कमवायचे आणि ते मठ-मंदिरांमध्ये अर्पण करावयाचे किंवा गोर-गरिबांना वाटप करण्याचे किंवा अन्नछत्र चालविण्याचे नाटक करावयाचे. यामुळे खरेच काय त्या धनाची सार्थकता मानली जाईल? नाहीच नाही. याकरिता देव इंद्राकडे श्रेष्ठ व पवित्र असेच द्रव्य(धन) मागितले आहे. कारण, उत्तम धनाची उत्तमच गती असते, हे मात्र नक्की.

 
 

देवेंद्राकडून मिळालेल्या श्रेष्ठ धनाचा सदुपयोग करावयाचा असेल, तर माणसामध्ये तितकीच दक्षता, तीव्रता किंवा बलसंपन्नता असावी. म्हणूनच याचक देवाकडे दक्षतेच्या ख्यातीची इच्छा व्यक्त करतो. ‘दक्षस्य चित्ति’ म्हणजेच उत्तम सजगतेची, सतर्कतेची किंवा बळाची प्रसिद्धी झाली की, त्या माणसाची समाजात ‘विशेष व्यक्तिमत्त्व’ म्हणून ओळख होते. सत्कार्यात निपुण (दक्ष व तीव्रगामी) असलेला सजग माणूसच उत्तम धनाचे रक्षण करण्यात समर्थ ठरतो. तोच बलसंपन्न मानला जातो आणि एका प्रतिष्ठित नागरिकांच्या रूपात त्याची गणना होते. भक्त ईश्वराकडे तिसरी याचना ‘सुभगत्वम्’ म्हणजेच सौभाग्यशाली होण्याची करतो. श्रेष्ठ कर्मामुळे मानवाच्या जीवनाची दिशा बदलते. त्याला सर्व गोष्टींची प्राप्ती होते. तरी पण त्याकरिता परमेश्वराच्या कृपेची गरज असतेच. याकरिताच तर सौभाग्याची कामना!

 
 

चौथी अर्चनारयीणां पोषम्।’ची अर्थात् धनाच्या पुष्टतेची! धन-पैसा-अडका ही साधने खूप मिळविली, पण ती टिकवता आली नाही तर काय उपयोग? याकरिता जे काही धन कमावले, ते पुष्टिकारक व संवर्धक बनले पाहिजे. तसेच ते चिरस्थायीदेखील असावे. याचकरिता पुष्टिकारक धनाची प्रार्थना!

 
 

पाचवी कामना आहे- उत्तम आरोग्याची? त्यासाठी ‘तनूनाम् अरिष्टिम्।’ म्हटले आहे. आमची शरीरे स्वस्थ व निरोगी असावयास हवी. रोगग्रस्त माणूस स्वत:पण काही करू शकत नाही व इतरांनाही काही करू देत नाही. कारण, त्याच्या व्याधिग्रस्त शरीराच्या चिंतेचा भार अन्यजनांना वहन करावा लागतो. याकरिता इंद्राकडे बलसंपन्न व सुदृढ शरीराची केलेली कामना तितकीच उपयुक्त ठरणारी आहे.

 
 

पुढे ‘वाच: स्वाद्मानम्’ म्हणजेच वाणीची मधुरता (गोडी) मागितली आहे. मुखाचा गोडवा प्रगतीकरिता अत्यंत मोलाचा ठरतो. आपले बोलणे सर्वांना भावणारे असावे. ऐकणार्‍यांच्या हृदयाला वेदना देणारे, मन भेदणारे आणि त्रस्त करणारे कटू बोलणे हा वाणीचा दोष आहे. या मुखदोषामुळे ‘महाभारत’ घडले. जगातील हिंसक घटना वाणीच्या दुरूपयोगाने घडल्या. आजही आपल्या देशात वायफळ बडबडणार्‍या राजकीय पुढार्‍यांच्या घसरणार्‍या जिभांमुळे समाजात दुहीचे वातावरण पसरते व जनता संघर्षाच्या आगीत होरपळतेय. तेव्हा हा मंत्राश सद्यस्थितीकरिता फारच प्रासंगिक सिद्ध होतो. हाच भाव संत ज्ञानेशांच्या वचनातही आढळतो- साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे॥ वरील सहा बाबी प्राप्त झाल्या, तर मग काय? प्रत्येक दिवस चांगला जातोच! याकरिता शेवटची कामना आहे- ‘अह्नाम् सुदिनत्वम्।’ आम्हा सर्वांचे ‘दिन’ (दिवस) हे ‘सुदिन’ होवोत. चांगले दिवस येण्यासाठी केवळ प्रार्थनेचे शब्दच नव्हे, तर कृतीसुद्धा हवी असते. येणारा प्रत्येक दिवस आनंदाने घालवावयाचा असेल, तर पहाटे उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतचा प्रत्येक क्षण सत्यज्ञानपूर्वक आचरणाने घालविला पाहिजे. शरीर, मन, बुद्धी व इंद्रियांना संयमित ठेवून आत्मा व परमात्मा यांना साक्षी मानून कर्म करीत राहिल्यास दिवस सोनियाचा ठरतो. या सातही बाबी ‘इंद्र’ सर्वांना प्रदान करो, हीच कामना!

 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य  
 
 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@