सीमेपलीकडच्या कुरापती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019   
Total Views |



एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याची भारताच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासंदर्भात रणनीती आखण्याची मोहीम सुरू आहे.


नुकताच भारतीय वायुदलाने केलेल्या मागणीनुसार, 'एमआय-३५' या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी रशियाशी करार करण्यात आला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कोणत्याही क्षणी प्रतिहल्ल्यासाठी तयारीत राहण्याचा निर्धार तिन्ही सैन्यदलांनी केला आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मात्र, पाकिस्तानची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र दिसले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याची भारताच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासंदर्भात रणनीती आखण्याची मोहीम सुरू आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुदलाने 'एअर स्ट्राईक' केला. त्यानंतर पाकिस्तानचे पुरते धाबे दणाणल्याचे उघड झाले. परिणामी, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा, लष्करी यंत्रणांतर्फे वेळोवेळी रणनीती बदलण्यात येत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, बालाकोट हल्ल्यानंतर सीमावर्ती भाग मजबूत करण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबद्दल मोठा खुलासा करत पाकिस्तानचा मास्टर प्लॅन उघड केला.

 

पाकिस्तान सरकारतर्फे प्रलंबित असणाऱ्या क्षेपणास्त्र, रडार आणि युद्ध सामग्रीची खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाकिस्तानतर्फे याद्वारे 'लाईन ऑफ कंट्रोल' (एलओसी) मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागातील दहशतवाद्यांचे तळ दूर हलवण्यात येत असून दहशतवाद्यांना सीमावर्ती भागांत जाण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्याकडील हत्यारेही या भागांत नेण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे दहशतवादी तळांची एवढीशी चूकही पाकिस्तानला यापुढे मोठे नुकसान पोहोचवू शकते, हे पुरते कळून चुकल्यानंतर या साऱ्या हालचालींना वेग येत आहे. या साऱ्या घटनांना पाकिस्तान भारतीय उपग्रह आणि ड्रोन्सच्या नजरेपासून लपवू पाहत असले तरी गुप्तचर यंत्रणांनी या गोष्टीची पोलखोल केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव प्रस्थापित केला होता. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून पाकिस्तानला दिला गेलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राष्ट्रीय धरण प्रकल्पांद्वारे पाकिस्तानच्या वाट्याला जाणारे पाणी रोखण्याची घोषणाही केली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेचीही मदत भारताने मिळवली होती.

 

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचा बदला घेण्यासाठी वायुदलाने जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला. त्यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत जैशच्या म्होरक्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय नौदलानेही सागरी सुरक्षा अभेद्य करून पाकिस्तानची कोंडी केली होती. दहशतवादाविरोधात कारवाई करत असल्याचे सांगून पाकिस्तान दहशतवाद्यांच्या कारवायांना तूर्त वेसण घालत आहे. मात्र, पाकिस्तान बालाकोटसारख्या घटनांपासून धडा घेईल, अशी धूसरशीही शक्यता नाही. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानतर्फे आयएसआय, हक्कानी नेटवर्क, तालिबान्यांच्या गुप्त बैठका झाल्याबद्दलही बोलले जात आहे. भारतावर पुन्हा अशा हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. जूनमध्ये तशा प्रकारच्या हालचाली झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था चोख करण्यात आली होती. त्या दृष्टीने युद्धसज्ज राहण्याची तयारीही पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान जगभरातील देशांकडून भारतीय रडार यंत्रणा भेदण्यासाठी तंत्रज्ञान खरेदी करत असल्याचीही माहिती आहे. बालाकोटसारख्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. सीमेपलीकडील हालचाली थंडावल्याचेही चित्र आहे. मात्र, ही सारी रणनीती अतिशय शांतपणे राबविण्याचा पाकचा मनसुबा आहे. या साऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्यदल सक्षम आहेतच. केंद्र सरकारतर्फे तिन्ही दलांना अत्याधुनिक शस्त्र सामग्रीसाठी तीनशे कोटी रुपयांपर्यंतची खरेदी प्रक्रिया राबविण्याची सवलत देण्यात आली आहे. भारताने राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि युद्धभूमीवरही पाकिस्तानची पुरती कोंडी केली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या या अहवालानुसार, पाकिस्तानच्या कुरापती तूर्त पडद्यामागे सुरू आहेत. मात्र, भारतीय सैन्य या साऱ्याला तोंड देण्यासाठी कायम सुसज्ज असेल, हे निश्चित!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@