झायराचा 'अलविदा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019
Total Views |



दंगल चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. तिने इन्स्टाग्रामच्या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉलिवूडमध्ये झायरा पाच वर्ष काम करत होती. अवघ्या १८ व्या वर्षात झायराने बॉलिवूडमधील करिअरला अलविदा केले. यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून मी भरकटले होते. पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाने माझे आयुष्य बदलले. मात्र, एवढ्या लहान वयात मी संघर्ष करू शकत नसल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच कुराणाचासुद्धा उल्लेख झायराने आपल्या पोस्टमध्ये केला. आपल्या संघर्षाबद्दल अनेक निराशाजनक गोष्टीही तिने सांगितल्या. या मानसिक समस्येवर मात करताना, झायराने तिच्यावरील पहिल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल आणि निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करताना औषधोपचारांद्वारे मदत कशी मिळवली, हे जाहीर केले. तिला प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागले, असे ती म्हणते. आपल्या धर्माच्या शिकवणीचे कारण पुढे करत हा चित्रपट संन्यास घेतल्याचे ती सांगते. यामागची खरी कहाणी तर वेगळीच आहे. जेव्हा झायरा काश्मीरला गेली, तेव्हा तिथले वातावरण बघून प्रचंड तणावाखाली आली. काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर झायरा वसीमच्या डोक्यातील यशाचा आनंद गायब होऊन त्या ठिकाणी अपराधाची भावना आली. चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर झायरा आपल्या वैयक्तिक जीवनात संघर्ष करीत होती. तिने चित्रपटात भारताचे प्रतिनिधित्व केलेले कश्मीर फुटीरतावाद्यांना नक्कीच आवडले नव्हते. त्यामुळे तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणण्यात आला. झायराने बॉलिवूड सोडण्याचे हे मुख्य कारण असू शकते. अशाच प्रकारचा दबाव सध्या पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ हिच्यावर टाकला जातोय. मूळची मुसलमान असलेल्या नुसरतने हिंदू युवकाबरोबर लग्न केले. लोकसभेत लग्नानंतर शपथविधीसाठी हिंदू वेषात आलेल्या नुसरत विरुद्ध आता इस्लामी मुल्लामौलवींकडून फतवा काढला गेला. तिच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा ठपका ठेवला जात आहे. एकूणच मुस्लीम स्त्रियांनी निरनिराळ्या क्षेत्रांत केलेले प्रतिनिधित्व इस्लामी धर्मप्रमुखांना कधीच पचले नाही. यामुळेच प्रत्येकवेळी त्यांनी याविषयी फतवे काढले, धमक्या दिल्या. विशेष गोष्ट म्हणजे इतका सगळा प्रकार होऊनही जावेद अख्तर, शबाना आजमीसारखे इस्लामची कड घेणारे आज मूग गिळून गप्प आहेत.

 

इस्लामच्या नावावर

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि 'दंगल'फेम अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तिचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. झायराने घेतलेल्या या निर्णयामुळे अभिनेत्री रवीना टंडनने तिला चांगलेच झापले. झायराने नुकतीच सोशल मीडियावर बॉलिवूडला सोडण्याची घोषणा केली. यावर रविनाने ट्विट करून तिला याविषयी सुनावले. "ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला सगळं काही दिलं, ती इंडस्ट्री अशा एखाद-दुसरा चित्रपट केलेल्यांना सोडायची असल्यास त्यांनी ती खुशाल सोडावी. परंतु, इंडस्ट्री सोडताना तिचा मान ठेवत अदबीने बाहेर पडावं... शिवाय, स्वत:चे विचारही स्वत:कडेच ठेवावेत," असे म्हणत तिनं झायराची कानउघडणी केली. दरम्यान, झायराने इस्लामच्या मार्गावरून चालण्यास एकदा नव्हे; शंभरदा अपयशी ठरल्याची भावना पक्की झाल्यानेच बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं आहे. सिनेमात काम करणे हे 'इमान'च्या विरोधात असल्याचेही तिने म्हटले आहे. हा तर कहरच झाला. अपयशाने खचून जाऊन त्याचे खापर चित्रपटसृष्टीवर फोडणे म्हणजे मूर्खपणा आहे. खाल्ल्या मिठाला तरी जागा रे... इतक्या वर्षात तिला कधीही आपण आपल्या धर्माच्या विरोधात जातोय, असे वाटले नाही. मात्र, अपयश आल्याने तिने धर्माचा आधार घेऊन चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नामांकित अभिनेते-अभिनेत्री या इस्लाम धर्मातील आहेत. झायराच्याच मतानुसार हे सगळेच आपल्या इमानपासून भरकटलेले असतील, नाही का? दुसरीकडे मानसिक तणावातून बाहेर येऊन पुन्हा चांगली सुरुवात झायरा नक्कीच करू शकली असती. मात्र, पूर्णतः ब्रेनवॉश झाल्याने ती मागे फिरली आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. जर तिने इस्लामी कट्टरपंथी आणि फुटीरतावाद्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असता, तर ती नक्कीच मुस्लीम मुलींची आणि काश्मिरी मुलींचीही रोल मॉडेल ठरली असती. पण, तिच्यावरील दबावामुळे आता तसे काही होऊ शकणार नाही. अर्थात यामुळे फुटीरतावादी आणि कट्टरपंथी नक्कीच सुखावलेत. मात्र, नवखे कलाकार किती आले, किती गेले, याचे मोजमाप कोणीच करत नाही. या चित्रपटसृष्टीत काम मिळणे ही एक सुवर्णसंधी मानली जाते. तिला लाथ मारून जाणारा नक्कीच कमनशिबी असेल. असो, तसेही तिच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला काही फरक पडत नाही, कारण शो मस्ट गो ऑन!

 
कविता भोसले 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@