हवाईमार्ग भारताला भोवला...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jul-2019   
Total Views |



भारतीय संघ ११ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोनपैकी एका सामन्यामध्ये भारताला विजय हवाय. इंग्लंड आणि न्यूझीलंड यामधील जो संघ जिंकेल, तो उपांत्य फेरी गाठेल. इंग्लंड जर हरला तर भारत तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासह उपांत्य फेरीसाठी सरस धावगतीच्या आधारे पात्र ठरेल.


यजमान इंग्लंडने विश्वचषकातील भारताविरुद्धची मॅच ३१ धावांनी जिंकली. तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडला विश्वचषकामध्ये भारतावर विजय मिळवता आलाय. पण, भारताच्या या पराभवाचे पोर्स्टमार्टम केलं तर एकच कारण समोर येतेय आणि ते म्हणजे भारताला हवाईमार्ग भोवला. होय, या संपूर्ण मॅचमध्ये इंग्लंडने १३ षट्कार लगावले. त्या तुलनेत भारताकडून धोनीचा एकमेव षट्कार वगळला तर भारताचं विमान उडालंच नाही. १३ चेंडूंमधील हे ७८ धावांचं ??? भारताच्या पराभवास कारणीभूत ठरले. इंग्लंडच्या फलंदाजांनी तर रिव्हर्सस्वीपवरही षट्कार वसूल केला. विराटनंही याची जाहीर कबुली दिली. भारताची सामन्यामध्ये जिंकण्याची ईर्ष्या दिसली नाही. या सामन्यामध्ये भारताने ऋषभ पंतलाही संधी दिली होती. पंत यष्टीरक्षक आहे पण, तो संघात होता तो फलंदाज म्हणून. पंत आणि धोनी दोघेही टीमपेक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळले, असेच म्हणावे लागेल. पंत स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, पण धोनीपेक्षा धावा जास्त बनवणे, हेच त्याचे एकमेव ध्येय दिसले. दोनदा तर तो धावचीत होताहोता वाचला. समोर रोहित शर्मासारखा स्थिरावलेला आणि शतकाच्या उंबरठ्यावर उभा असणाऱ्या फलंदाजांसोबत मोठी भागीदारी उभारण्यापेक्षा उतावळे शॉटस् मारण्यास पंतने जास्त प्राधान्य दिलं. क्रिकेट हा टीम गेम आहे. जर अधिकाधिक स्ट्राईक पंतने रोहितला दिला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, पण पंत आक्रमक झाल्यावर रोहितचाही संयम सुटला आणि विकेटमागे झेल देऊन तो तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक आणि पंत यामध्ये कोण जोरात धावा करतो, यामध्ये शर्यत लागली आणि सारा बेत फसला.

 

धोनी जेव्हा खेळायला मैदानात आला, तेव्हा भारताची अवस्था ४ बाद, २२६ होती. भारताला विजयासाठी ६५ चेंडूंमध्ये ११२ धावा हव्या होत्या. या ६५ चेंडूंपैकी ३१ चेंडू धोनीने खेळले आणि त्याने ३१ चेंडूंमध्ये ४२ धावा काढल्या. प्रति षटक साडेदहाची धावगती हवी असताना सिंगल्स आणि दुहेरी धावा काढण्याचा धोनी आणि केदार जाधवचा आटापिटा मनाला यातना देणारा होता. विशेषतः हाती विकेट असताना आणि पराभव समोर उभा ठाकला असताना बेभान होऊन लढणे अपेक्षित असते, ऑलिम्पिकचा जनक बॅरेन पिअर द कुबर्तिन म्हणाला होता की, “खेळात हार किंवा जीतपेक्षाही महत्त्वाची असते ती म्हणजे तुम्ही लढत कशी दिली याला.” या सामन्यामध्ये भारताने लढत दिली पण त्यात झुंजारपणा दिसला नाही. रमतगमत भारत सामना हरला... आणि म्हणूनच मग पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बसत अली जे म्हणाला, त्याला उगाचंच महत्त्व प्राप्त होतं. यंदाच्या विश्वचषकामध्ये गणितं अशी काही जुळून आली होती की, पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश भारताच्या कृपेवर अवलंबून असणार आहे. जर भारत जिंकला असता तर इंग्लंडचे फक्त ८ गुणच झाले असते आणि न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा सामना इंग्लंडने जिंकला असती तरी त्यांचे फार तर १० गुण झाले असते. अशा स्थितीत शेवटचा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून पाकिस्तान ११ गुणांसह उपांत्य फेरीचा चौथा संघ म्हणून पात्र ठरला असता आणि गुणतालिकेत विजयाने आणि उर्वरित बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचे सामने जिंकून भारत नंबर एकसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला असता. अशावेळी भारताला उपांत्य फेरीमधील चौथ्या क्रमांकावरील पाकिस्तानशी मुकाबला करावा लागला असता आणि भारताला नेमकं हेच नको होतं. म्हणून, पाकिस्तानचा काटा काढण्यासाठी भारत जाणीवपूर्वक हरणार, अशी भविष्यवाणी बसित अलीने केली होती.

 

बसित अली खुश असेल, कारण आतापर्यंतच्या ६ सामन्यांमध्ये अपराजित राहणारा भारतीय संघ नेमका च का हरला, असे प्रश्न आता उपस्थित केले जातील. त्यासाठी न्यूझीलंडच्या १९९२ च्या विश्वचषकामधील पराभवाचेही उदाहरण देता येईल. उपांत्य फेरी स्वतःच्या देशात खेळायला मिळावी म्हणून न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध तेव्हा जाणीवपूर्वक हरला होता. बसीत अलीनेही याच सामन्याचं उदाहरण दिलं होतं. असो. भारत हरलाय, हे सत्य आहे. पण अजूनही भारताचे दोन सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीमधील आपला प्रवेश नक्की केलाय. भारतीय संघ ११ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोनपैकी एका सामन्यामध्ये भारताला विजय हवाय. इंग्लंड आणि न्यूझीलंड यामधील जो संघ जिंकेल, तो उपांत्य फेरी गाठेल. इंग्लंड जर हरला तर भारत तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासह उपांत्य फेरीसाठी सरस धावगतीच्या आधारे पात्र ठरेल. अशा स्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेशमधील सामन्याला खूप महत्त्व येईल. जर पाकिस्तान जिंकला तर ११ गुणांसह तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासाठी त्यांचा दावा सरस धावगतीच्या आधारे कायम राहील पण हरला तर मग बांगलादेशला सेमीफायनलसाठी पुढच्या सामन्यामध्ये भारताला नमवावे लागेल. अशा स्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीनच देशांना नेट रनरेटची गरज भासेल, म्हणून असेल कदाचित भारताने धावगती ठिकवून ठेवण्यासाठी सावध खेळ केला असावा. अर्थात मनाचं समाधान करण्यासाठी हे वाक्य असले तरी भारत भारतासारखा खेळला नाही, हेच खरे...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@