दहशतवादाविरोधात आम्ही एकत्र लढणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2019
Total Views |



कोलंबो : दहशतवादाविरोधात आम्ही एकत्रितरित्या लढणार आहोत, असा निर्धार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेला गेले, यावेळी त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. श्रीलंकेची राजधानी कोलंबोत नरेंद्र मोदींनी ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांती मृतांना चर्चमध्ये जाऊन श्रद्धांजलीही वाहिली. तसेच मोदींनी राष्ट्रपती भवनात अशोकवृक्षाचे रोपटेही लावले.

 

दरम्यान, नरेंद्र मोदींनी कोलंबोतील इंडियन हाऊसमध्ये भारतीय समुदायालाही संबोधित केले. ते म्हणाले की, “आज जगात भारताची स्थिती मजबूत असून त्याचे श्रेय जगाच्या कानकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांनाच आहे. जगाच्या कुठल्याही प्रदेशात गेल्यास भारतीयांबद्दल कोणीही तक्रार करताना दिसले नाही,” असेही यावेळी मोदींनी सांगितले. दुसरीकडे श्रीलंकेत गेल्यानंतर कोलंबो विमानतळावर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्याव्यतिरिक्त विरोधी नेते महिंदा राजपक्षे व तमिळ राष्ट्रीय आघाडीच्या नेत्यांशीही चर्चा केली.

 

आंध्रात रॅली; तिरुपतीत पूजा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी श्रीलंका दौऱ्यानंतर आंध्र प्रदेशाला भेट देत एका रॅलीला संबोधित केले. सोबतच पंतप्रधानांनी तिरुमला तिरुपती मंदिरात जाऊन पूजा-अर्चनाही केली. नरेंद्र मोदींबरोबर यावेळी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीही उपस्थित होते. दरम्यान, मंदिरात जाण्यापूर्वी मोदींनी एका सभेला संबोधित केले. ते म्हणाले की, “देशसेवेचे कितीतरी मार्ग आणि पद्धती आहेत. त्यातलाच एक प्रकार सरकार हा आहे, पण ज्यांच्याकडे सरकार नाही, ते त्या माध्यमातून व लाखो कार्यकर्ते आपापल्या परीने देशाची सेवा करत आहेत. काही लोक निवडणुकांतील निकालांच्या प्रभावातून बाहेर आले नाही, ही त्यांची मजबुरी आहे. पण आमच्यासाठी निवडणुकांचा अध्याय संपला आहे आणि १३० कोटी देशवासीयांच्या सेवेचा अध्याय सुरू झाला आहे.” सोबतच,“देशासमोर सध्या दोन मोठ्या संधी आहेत, त्यापैकी एक म्हणजे २०१९ हे महात्मा गांधींच्या जयंतीचे १५० वे वर्ष आहे. तर दुसरी म्हणजे २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १३० कोटी देशवासी एक पाऊल चालले तर १३० कोटी पावलांनी देश पुढे जाईल आणि ही संधी आपल्या सर्वांना साधायची आहे.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@