भारतीय जनमताची पाकला धास्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2019   
Total Views |



‘जुम्मे के दिन’ म्हणजेच शुक्रवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिल्याचे वृत्त प्रसारित झाले. या पत्रान्वये इमरान खान यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काश्मीर मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.


भारतीय उपखंडात आणि जागतिक पटलावर कायमच चर्चेत राहणारे देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान. या दोन देशांतील वाद आणि पाकच्या भूमीवर असणारे दहशतवादाचे साम्राज्य यांची चर्चा कायमच जगभर चर्चिली जात असते. पाकिस्तानची भूमी ही ‘पाक’ असून येथे कोणताही दहशतवाद पोसला जात नाही, अशी भूमिका पाक सरकार अगदी अलीकडच्या काळापर्यंत घेत होते. तसेच, पाकपुरस्कृत दहशतवादाचा आम्हाला खूप त्रास होत आहे, हे भारताने जगाला टाहो फोडून अनेकदा सांगितले. मात्र, ९/११च्या घटनेनंतर महासत्तेला ‘दहशतवाद’ नावाची संकल्पना आहे आणि ती संहारक आहे, याची कल्पना आली आणि त्याची किंमतही मोजावी लागली. या सर्व बाबींची आज चर्चा करण्याचे कारण म्हणजे ‘जुम्मे के दिन’ म्हणजेच शुक्रवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिल्याचे वृत्त प्रसारित झाले. या पत्रान्वये इमरान खान यांनी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काश्मीर मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

पाकिस्तानचा मागोवा घ्यायचा झाल्यास आपल्याला सन २०१४ पूर्वीची स्थिती, सन २०१४ मधील स्थिती आणि सन २०१८-१९ मधील स्थिती अशा अंगाने या स्थितीचा विचार करणे आवश्यक ठरते. सन १९४७ ते २०१४ या काळात पाकच्या कोणत्याही दुष्कृत्याचा आपण केवळ निषेध केला. जेव्हा पाकचे नापाक पाय या भारतभूला स्पर्श करण्यासाठी सीमेवर सरसावले, तेव्हा आपण नक्कीच त्याचा सामना करत विजय संपादित केला. मात्र, पाकच्या छुप्या हल्ल्यांबाबत आपली भूमिका ही केवळ नेमस्थपणाचीच राहिली, यात दुमत असण्याचे कारण नाही. सन २०१४ मध्ये बहुमताचे शासन सत्तेत आले तेव्हादेखील एक चांगला शेजारधर्म म्हणून आपण संबंध सुधारण्याकरिता पाकसमवेत स्मितहास्य केले. मात्र, आपल्या हास्याला आपले भय समजण्याचीच चूक पाकने केली आणि २०१८-१९ मध्ये उरी आणि बालाकोटच्या रूपाने आपला खरा रंग पाकने दखविला. त्यानंतर झालेल्या कार्यवाहीतून पाकला नव्या भारताची चांगली ओळख झाली. या सर्व घटनांना धावता परामर्श करण्याचे कारण पाकच्या आताचा भूमिकेशी संबंधित आहे. भारतात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि प्रचंड जनाधार असलेले शासन भारतात ३० मे रोजी सत्तेवर आले. त्यामुळे या प्राप्त जनाधाराची भीती आता पाकला वाटत असल्याचेच द्योतक म्हणजे इमरान यांचा प्रस्ताव आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जनशक्तीचा आशीर्वाद लाभल्याने भारत येणाऱ्या काळात आपण जर काही आगळीक केली तर, त्याचे उत्तर पूर्वीपेक्षा अधिक कणखरपणे देईल, याची खात्री पाकी नेतृत्वाला झाल्याने त्यांनी आता चर्चेचे पालुपद पुढे केले आहे.

 

तसेच, चर्चेचा हा प्रस्ताव म्हणजे इमरान सरकार दहशतवादाला रोखण्यात, त्यावर अंकुश प्राप्त करण्यात कमी पडत असल्याचेदेखील द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, इमरान सरकारला पक्के ठाऊक आहे की, आपल्या नियंत्रणाबाहेरील दहशतवादी घटकांनी जर पुन्हा काही आगळीक केली तर, त्याची किंमत पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात यापुढे चुकवावी लागण्याची शक्यता आहे. त्यातच, आज पाक सामाजिक आणि आर्थिक विवंचनांनी ग्रासला गेला आहे. त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी आव्हाने हे आज पाकसमोर उभे ठाकलेले एक मोठे आव्हान आहे आणि पाकच्या या सर्व स्थितीशी दहशतवादी घटकांना कोणतेही सोयरसुतक नाही, याचीदेखील कल्पना एव्हाना पाक सरकारला आली असावी. त्यामुळे दहशतवादावर आपली पकड मजबूत करता येणार नाही, याची खात्री झाल्यानेच भारताला चर्चेस आमंत्रित करायचे आणि पाक भूमीवरून होणाऱ्या आगळिकीमुळे भारताने कोणतीही प्रभावी मोहीम उघडू नये यासाठी भारताला चर्चेत गुंतवायचे हेच पाकचे यामागे धोरण असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, दहशतवाद थांबल्याशिवाय आणि काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय चर्चा नाही, अशी भारताने भूमिका स्वीकारली आहे. या सर्व घटनाक्रमावरून भारतीय लोकशाहीची ताकद आणि भारतीय जनमताची पाकला असलेली धास्ती नक्कीच दिसून येते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@