चिकाटी म्हणजे काय हो?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019
Total Views |

महाराष्ट्राचे जाणते नेते म्हणवून घेणारे, केवळ राज्याचेच नाही तर, देशाचेही राजकारण कावेबाजपणाने आपल्या भोवती फिरवत ठेवण्याची धडपड करणारे वयोवृद्ध नेते शरद पवार यांना, लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झाल्यानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आठवण झाली आहे. कार्यकर्त्यांनी चिकाटी कशी ठेवावी, यासाठी त्यांनी संघ स्वयंसेवकांचा दृष्टांत दिला आहे. जनसंपर्क करताना स्वयंसेवक जसे सातत्य ठेवतात, जशी चिकाटी ठेवतात, तशी आपण ठेवली तर निवडणुकीत अपयश येणारच नाही, असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मागेही एकदा, सात-आठ वर्षांपूर्वी पवारसाहेब कार्यकर्त्यांना सांगत होते की, बारामतीसारख्या भागातील काही स्वयंसेवक खुद्द माझ्याच घरी माझ्या विरोधी उमेदवाराचे प्रचारसाहित्य घेऊन आले होते. ही िंहमत स्वयंसेवकच दाखवू शकतात. पवारसाहेबांचा हा सल्ला ऐकून, ‘थकली, भागली अन् देवपूजेला लागली’ या लोकोक्तीची उगीचच आठवण झाली. परंतु, शरद पवारांसारखा दिग्गज नेता संघ कार्यपद्धतीचे कौतुक करत आहे, म्हणून कुणीही स्वयंसेवक हुरळून जाणार नाही, हा भाग वेगळा.
 
खरेतर, आपल्या संस्कृतीत जिथून घेता येईल तिथून गुण घ्यावे असे म्हटले आहे. अगदी कट्टर विरोधकांकडून, शत्रूकडूनही काही शिकायला मिळत असेल तर शिकले पाहिजे, असे म्हटले आहे. अशी अनंत उदाहरणे आपल्या प्राचीन इतिहासात ठायीठायी आढळून येतात. अंतर्मनात कट्टर कम्युनिस्ट विचारांचे असलेल्या तुम्हीदेखील ज्या विचारसरणीचा आतापर्यंतच केवळ विरोधच केला, इतकेच नव्हे तर, ती विचारसरणी समूळ नष्ट व्हावी म्हणून सत्ता, संपत्तीचा वापर केला, कुठल्याच विधिनिषेधाचा विचार केला नाही, त्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा गुण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलावा असे सांगितल्यावरून तुमच्या उदार, निर्मळ, नितळ मनाचे लोक कौतुक करतील, असेही कदाचित तुम्हाला वाटत असेल. परंतु, पवारसाहेब, तुमच्या इतक्या प्रदीर्घ राजकारणाचा चांगलाच अनुभव असल्यामुळे एकही जण तुमचे कौतुक करणार नाही. कारण, जे पोटात आहे ते तुमच्या ओठात नसते आणि जे ओठात आहे ते तुमच्या पोटात नसते, याचा महाराष्ट्रातल्या तरी प्रत्येकाला प्रत्यक्षाप्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. ‘पोटात एक, ओठात दुसरेच’ हा तुमचा एकेकाळी यशस्वी ठरलेला गुण, आतापर्यंत अवगुण बनून, तुमचा सत्तेकडे जाणारा मार्ग अवरुद्ध करत आहे. ज्या या ‘गुणा’ने तुम्ही अनेकांच्या राजकीय प्रगतीला फास लावला, आता तोच गुण तुमच्यासाठी गळफास ठरत आहे. याची जाणीव तुम्हाला नसेल असे नाही. परंतु, आता जाणीव होऊनही हाती काहीच राहिलेले नाही.
 
पवारसाहेब, स्वयंसेवकांच्या ज्या चिकाटीचे तुम्ही एवढे कौतुक केले, ती चिकाटी कुठून येते हो? सत्तेच्या लालसेने, पैशाच्या ऊबेने की चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याच्या धाकाने? अशाने स्वयंसेवकांकडे असलेली चिकाटी येत नाही. आलेच तर गुळाला चिकटणारे मुंगळे येतात. सत्तेची ऊब नाही, अधिकारांची गुर्मी नाही, पैशाचा माज नाही... उलट, सतत हेटाळणी, िंटगल-टवाळी, सततचा संघर्ष, पदरचे पैसे खर्चून कार्य करण्याची तयारी... यामुळे ही चिकाटी येत असते. कुणा एकाला पंतप्रधान करण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री करण्यासाठी, कुणाला खासदार-आमदार करायचे म्हणून ही चिकाटी येत नसते. अशा एका विचारासाठी, जो सनातन आहे, सत्य आहे, देशहिताचा आहे, एकेकाळी विश्वगुरुपदी आरूढ असलेल्या भारतमातेला पुन्हा एकदा त्याच व तितक्याच सामर्थ्याने संपन्न करणारा आहे, ही चिकाटी येत असते. त्या विचाराला या समाजात प्रस्थापित आणि प्रतिष्ठित करण्याच्या ध्येयवेडेपणातूनच स्वयंसेवक इतक्या चिकाटीने काम करीत असतात.
 
असा कुठला विचार, असे कुठले वैचारिक पाथेय तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे की, ज्याच्या भरवशावर त्यांनी तनमनधन अर्पण करून पक्षाच्या प्रचारासाठी ही अशी चिकाटी दाखवावी? तुम्ही तर त्यांना केवळ सत्ता आणि त्या सत्तेपायी येणारे अधिकार व नंतर अनंत वाटांनी घरात येणारा पैसा, याचेच तर आमिष दाखविले आहे! हे करते वेळी तोंडाने मात्र सतत, ‘फुले-शाहू-आंबेडकर’, ‘पुरोगामी महाराष्ट्र’ याचा जप करीत राहिलात. हीही एकप्रकारे चिकाटीच म्हणावी लागेल. कार्यकर्त्यांना तुम्ही काय बोलता, याचे विशेष नसते. तुमचे आचरण विचाराबरहुकूम आहे की नाही, हे ते बघत असतात. कसे आहे तुमचे आचरण? सत्तेसाठी समाजात फूट पाडणारे, जाति-जातीत वैमनस्य निर्माण करून प्रत्येक जातीला अगतिकपणे स्वत:च्या चरणी येण्यास भाग पाडणारे, महात्मा गांधींच्या हत्येचा वापर करून एका विशिष्ट जातीला समाजातून वाळीत टाकणारे, भ्रष्टाचाराचा मार्ग प्रशस्त करणारे आणि पोटातील पाणीही न हलू देता सहकार्याचा विश्वासघात करणारे. अहो, तुमचा सहोदर पक्ष- कॉंग्रेसदेखील तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. हा माणूस केव्हा दगाफटका करेल, याची सतत भीती त्यांना असते. अशा तुमच्या ‘कर्तृत्वसंपन्न’ आचरणाकडे पाहून कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी किती काळ सातत्य दाखवायचे? जो विचार लोकांमध्ये विद्वेष पसरविणारा, फूटपाडीच्या राजकारणाचा तसेच एखाद्या स्वार्थी व क्षुद्र आमिषाचा मागे लोकांना पळविणारा असेल, त्या विचारासाठी, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्य दाखविणे फार कठिण असते. तुमचा हा विचार काही काळ चांगलाच यशस्वी झाला असेल, पण असत्याला मरण असते. सत्यच चिरंजीवी असते. सत्तेचा गुळ नाहीसा होताच आणि नजीकच्या काळात तो दिसण्याची शक्यता नसल्यामुळे या गुळाभोवती गोळा झालेले मुंगळे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना निव्वळ उपदेश करून काम भागणार नाही.
 
पवारसाहेब, खरेतर स्वयंसेवकांची चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांना शिकविण्यापेक्षा ती शिकण्याची तुम्हालाच अधिक गरज आहे. ‘राजा बोले, दळ हाले’ अशी आपल्या इथे म्हण आहे. सर्वेसर्वा असलेल्या नेत्याच्या आचरणातून जर ही चिकाटी म्हणा अथवा संघटनेसाठी आवश्यक गुण, कार्यकर्त्यांना निदर्शनास येत असेल तर, त्याचे अनुसरण करणे कार्यकर्त्यांनाही सोपे जाते. परंतु, तुमचे नेते तर, धरणे काठोकाठ कशी भरावी याचेच भलते-सलते मार्ग सांगण्याच्या मागे लागलेले दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचा उपदेश शिरोधार्ह का म्हणून मानावा?
 
तुमचा सल्ला कार्यकर्त्यांनी आचरणात आणावा यासाठी एक मार्ग आहे. मार्ग लांबचा आणि अडचणीचा आहे. पण दुसरा मार्ग नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही अनेकानेक सामाजिक पापे केलीत, त्याच्या क्षालनार्थ प्रायश्चित्त घेण्याचा मार्ग अनुसरला तर, आज नाही पण भविष्यात तुमच्या आदेशाला वजन प्राप्त होऊ शकते. या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर, वेळोवेळी, जागोजागी या मार्गावरून परावृत्त करण्याचा इतरांकडून सातत्याने प्रयत्न होईल. परंतु, तुम्हाला मात्र या मार्गालाच चिकटून राहण्याचे सातत्य दाखवावे लागणार आहे. ही चिकाटी जर तुम्ही दाखविली, तर कदाचित काही काळानंतर तुमचे कार्यकर्ते, तुम्हाला अभिप्रेत असलेली संघ स्वयंसेवकांची चिकाटी अंगी बाणवताना दिसतील. नाहीतर, तुमचा हा सांप्रतचा उपदेश, ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’प्रमाणे वार्यावर उडून गेला आहे, असेच समजा.
@@AUTHORINFO_V1@@