सोंगट्या उलट्या का पडत आहेत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2019
Total Views |


 


शरद पवार असो, राहुल किंवा ममतादीदी सगळ्याच सोंगट्या आता उलट्या पडताना दिसत आहेत. पवारांना स्वयंसेवकांची चिकाटी भावतेय, तर दीदींना प्रशांत किशोरच्या रणनीतीची गरज भासतेय. हा सर्वस्वी मोदीदिग्विजयाचा धसका आणि आगामी काळातील राजकीय उलथापालथीची नांदीच म्हणावी लागेल.


आयुष्यभर जातीय समीकरणांवर राजकीय डावपेच खेळणाऱ्या आणि उठसूठ संघाची कागाळी करण्यात धन्यता मानणाऱ्या शरद पवारांनी चक्क संघ स्वयंसेवकांच्या चिकाटीचे कौतुक केले. पण, हे तेच ‘जाणते राजे’ आहेत, ज्यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कल्याणमधील भर सभेतअर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का?” असे अश्लाघ्य विधान केले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या २०१९च्या निवडणूक प्रचारातही संघावर तोंडसुख घेताना पवारांची जीभ अशीच घसरली. “संघाची चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल?” असे कंबरेखालचे विधान करत त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या विजयसिंह मोहिते-पाटलांना टोला लगावला. पण, गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र याच संघाच्या कार्यकर्त्यांकडून चिकाटी कशी शिकावी, याचे प्रवचन साहेबांनी दिले. ‘जाणत्या राजाचा हा दुतोंडीपणा आणि कोलांटउड्या नवीन नसल्या तरी आज शरद पवारांवर संघ स्वयंसेवकांच्या कौतुकवर्षावाची वेळ यावी, यातच सर्व काही आले. म्हणूनच, ‘आज सूर्य कुणीकडून उगवला’ ही उक्ती या बारामतीच्या साहेबांसाठी अगदी गैरलागूच!

 

संघावर, संघ स्वयंसेवकांबद्दल अशोभनीय अशी टीका करणाऱ्या पवारांना पराभवानंतर मात्र संघशक्तीचा असा एकाएकी साक्षात्कार झाला. त्यामागचे कारणही म्हणा तसेच. मावळ मतदारसंघातून पार्थ पवारांचा आणि पवार कुटुंबातील झालेला पहिला राजकीय पराभव साहेबांच्या भलताच जिव्हारी लागला. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सगळी शक्ती मावळमध्ये एकवटूनही पुत्र पार्थला काही विजयरथावर आरुढ होता आले नाही. इतर मतदारसंघांतही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मागेच पडले. मरगळलेले कार्यकर्तेही मतदारांपर्यंत पोहोचण्यात सपशेल अपयशी ठरले. म्हणूनच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चक्क संघाची संपर्कशैली आत्मसात करण्याचा सल्ला देत खुद्द साहेबांनीच त्यांचे कान टोचले, ते योग्यच! पण, स्वयंसेवकांचा जनसंपर्क, संघाची शिस्त याला खऱ्या ‘राष्ट्रवादी’ विचारांचे, मूल्यांचे शाश्वत अधिष्ठान लाभले आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हाच स्वयंसेवकांचा आचार-विचार आणि तशीच कृतिशीलता. नकारात्मकतेलाही सकारात्मकतेत परिवर्तित करण्याचे कौशल्य स्वयंसेवकांच्या अगदी रक्तातच भिनलेले. कुठल्याही नैसर्गिक आपदेत गरजूंच्या मदतीला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सर्वप्रथम धावून जाणारे संघाचे स्वयंसेवक... असे हे समर्पण आणि सत्शीलतेचे संस्कार संघात पदोपदी दिसतात. मानमरातब, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा या दुष्टचक्रातून म्हणूनच संघ मुक्त आहे. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये कुठलाही बडेजाव नाही की, मोठमोठाल्या उद्योगांतून कोट्यवधींच्या मालमत्ता आणि धनसंचयाचा लोभ नाही. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हाच संघजीवनाचा मूलमंत्र. पण, जिथे राष्ट्रवादीचे नेतेच संघाच्या चड्डीची, धरणात लघुशंकेची अविचारी भाषा वापरतात, कोट्यवधींच्या घोटाळ्यांत ज्यांचे हात आधीच बरबटलेले आहेत, तिथे कार्यकर्त्यांकडून विनम्रता, आपुलकी, सभ्यता आणि स्वार्थहीन वागणुकीची किमान अपेक्षा तरी करता येईल का? पण असो, यंदाच्या निवडणुकीमुळे साहेबांना स्वयंसेवकांच्या संघटनशक्तीचा परिचय आला, हेही नसे थोडके! खरंतर, ‘संघाचा आदर्श घ्या,’ हे सांगणारे शरद पवार हे काही या देशातील पहिले नेते नाहीत. यापूर्वी डाव्या नेत्यांनीही असेच सल्ले आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. पण, जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत नाही, तोपर्यंत संघाचे अनुकरण करणे निश्चितच सोपे नाही.

 

एकीकडे शरद पवार कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधींना कदाचित आपण अमेठीतून आपटलो असलो तरी वायनाडमधून विजयी झाल्याचे नुकतेच स्मरलेले दिसते. कारण, निकालानंतर तब्बल १५ दिवसांनी काँग्रेसच्या युवराजांनी दक्षिणेकडे विजयी कूच केले. त्यांची मनस्थितीही समजू शकतोच म्हणा. कारण, पराभूत आणि उद्विग्न मानसिकतेतून काँग्रेस अध्यक्षपदाच्या त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे भिजते घोंगडे अजूनही कायम आहेच. त्यांच्या नेतृत्वातील सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आधी हवाहवासा वाटणारा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजमुकुट आता मात्र राहुलला काटेरी म्हणून बोचायला लागला. म्हणूनच, २३ मे नंतरचे त्यांचे ‘ते पंधरा दिवस’ अपयश कसेबसे पचविण्यात गेले असावे. त्यातच युवराजांपाठोपाठ काँग्रेसमध्येही राजीनाम्यांचा एकच पाऊस पडला. मान्सूनपूर्वच तुफान आले आणि कित्येक नेत्यांनी काँग्रेसच्या ‘हाता’ची साथ सोडली. तेलंगणचे १२ काँग्रेस आमदारही चंद्रशेखर रावांच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसही विखे-पाटलांनंतर अशीच फुटीच्या वाटेवर, व्हेंटिलेटवर आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये निश्चितच काही आलबेल नाही. मात्र, असे असतानाही राहुल गांधी अखेरीस त्यांच्या विजयी मतदारसंघात सत्कार-सोहळे आणि कार्यक्रमांसाठी दाखल झाले, याला विजयोत्सव म्हणावे की पराभवावरचा उतारा, हाच प्रश्न उपस्थित होतो. धर्मनिरपेक्षतेचा आव आणत उत्तरेतील अमेठीमधून थेट दक्षिणेकडील मुस्लीमबहुल वायनाडमध्ये राहुल गांधी अनुनयाच्या जोरावरच विजयी ठरले असले तरी राजधानी दिल्लीपासून राजकीयदृष्ट्या ते तितकेच दुरावले आहेत. कारण, या मतदारसंघात देशातील बहुसंख्य ते अल्पसंख्य आणि अल्पसंख्य ते बहुसंख्य या जाती-धर्माच्या गोळाबेरजेवरच राहुलची नौका किनारी लागली. त्यामुळे अमेठीत मतप्राप्तीसाठी मठमंदिरात माथे टेकवणारे, गंगापूजेला आरती ओवाळणारे तथाकथित ‘जनुएधारी’ राहुल गांधी मात्र वायनाडमध्ये टोपी घालून हिरव्या दुवा कबूल करताना दिसले. पण, राहुल गांधींवर ‘गांधी कुटुंबीयांचा गड’ मानला जाणाऱ्या अमेठीऐवजी बाहेरचा मतदारसंघ निवडण्याची नामुष्की का ओढवली? त्यांना देशातील मुस्लीमबहुल आणि काँग्रेसलाच सर्वानुकूल ठरेल अशा मतदारसंघात प्रवेश का करावा लागला? याचेही आत्मचिंतन काँग्रेसच्या ‘बुद्धीवादी’ म्हणविणाऱ्या नेतेमंडळींनी करायला हवे. ते म्हणतात ना, ‘इच्छा परा ते येई घरा’ अर्थात आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो, तेच आपल्या वाट्याला येते. काँग्रेस आणि राहुल गांधींचीही तीच गत. पराकोटीचा मोदीद्वेष आणि भाजपबद्दलच्या असूयेवर स्वार होत राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला. पंतप्रधानांना वारंवार ‘चोर’ म्हणून अपमानित केले, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर शिंतोडे उडवले. पण, मतदारांनी मतपेटीतून या द्वेषाच्या आणि एका विशिष्ट जाती-धर्माच्या लांगूलचालनाला हद्दपार करत अमेठीच्या भूमीतून राहुल गांधींना सणसणीत चपराक लगावली. पण, ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच या युवराजांची गत. त्यामुळे वायनाडच्या अपेक्षित विजयाचा जल्लोष निलाजरेपणे साजरा करण्यासारखे काही नसले तरी अमेठीतील अपयशाचे धडे राहुलबाबांना आयुष्यभराची अद्दल घडवून गेले, हे मात्र नक्की!

 

जो मुद्दा यशप्राप्तीसाठी जंगजंग पछाडणाऱ्या राहुल गांधींचा, तोच निवडणुकीतील प्रख्यात रणनीतीकार प्रशांत किशोर आणि विजयाची आस हरपलेल्या ममतादीदींचाही! कारण, सध्या जदयुच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असलेल्या प्रशांत किशोरांनी थेट बंगालमधील भाजपच्या वाघांच्या विजयांनी खचलेल्या ममतादीदींची म्हणे भेट घेतली. आगामी प. बंगालच्या निवडणुकीसाठी आता स्वत:च्या विश्वसनीयतेवर, संघटन कौशल्यावर विश्वास गमावून बसलेल्या ममतादीदींना निवडणूक जिंकण्यासाठी रणनीतीकाराची गरज भासतेय, यातच दीदींची मनातील पराजयाची भीती प्रतिबिंबित होते. ‘मी, माझा पक्ष, माझे राज्य’ या आविर्भावात स्वत:ला ‘बंगालची वाघीणम्हणून मिरवणाऱ्या ममतादीदींची बंगालमधील भाजपच्या मुसंडीने पुरती शेळी झाली. दुसरीकडे, २०१४च्या नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून आधी कुणीही न ओळखणाऱ्या प्रशांत किशोर यांचे पुढे नाव झाले. त्यानंतर नितीशकुमारांच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही ‘किशोरनीती’ कामी आली. पण, २०१७च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला किशोर यांची राजकीय विद्वत्ता काही तारू शकली नाही. त्यानंतर यंदाच्या आंध्र प्रदेश लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला मिळालेल्या नेत्रदीपक यशामागेही किशोर यांचे ‘पॉलिटिकल इंजिनिअरिंग’ फळास आले. म्हणूनच, बंगालमधील विजय सुनिश्चित करण्यासाठी ममतांनी या प्रशांत किशोरला गळ घातली. पण, बंगालचे वातावरण आता पालटले आहे. ‘गुंडगिरी, खाबूगिरी आणि दीदीगिरीला यापुढे आता सुज्ञ बंगाली जनता कदापि जुमानणार नाही. त्यामुळे प्रशांत किशोेरांसारखे शंभर रणनीतीकार जरी दीदींनी मैदानात उतरवले तरी जनमानसातील रोष आणि जनप्रेमाचा कौल ‘कमळ’च हाती घेईल, हे निश्चित. म्हणूनच मग शरद पवार असो, राहुल किंवा ममतादीदी, सगळ्याच सोंगट्या आता उलट्या पडताना दिसत आहेत. पवारांना स्वयंसेवकांची चिकाटी भावतेय, तर दीदींना प्रशांत किशोरच्या रणनीतीची गरज भासतेय. हा सर्वस्वी मोदी दिग्विजयाचा धसका आणि आगामी काळातील राजकीय उलथापालथीची नांदीच म्हणावी लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@